Thursday, 30 May 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 30.05.2024 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 30 May 2024

Time: 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ३० मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या 

·      राज्यात इयत्ता तिसरी ते बारावी अभ्यासक्रम आराखड्याचा मसुदा राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून प्रसिद्ध

·      लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांनी चुकीच्या माहितीवर आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचं मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांचं आवाहन

·      काँग्रेसकडून राज्याचा दुष्काळ पाहणी दौरा जाहीर-३१ मे रोजी छत्रपती संभाजीनगरातून प्रारंभ

·      लातुरात गुटखा कारखान्यावर धाड, सुमारे तीन कोटी रुपयांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

आणि

·      वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं शेतीसाठी ड्रोन द्वारे फवारणी अभियान

 

सविस्तर बातम्या

राज्यात इयत्ता तिसरी ते बारावी अभ्यासक्रम आराखड्याचा मसुदा राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं प्रसिद्ध केला आहे. यामध्ये राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २०२३ मधल्या तरतुदी विचारात घेतल्या असून, त्यात राज्याच्या अनुषंगानं अंशत: बदल केले आहेत. पहिली ते दहावी मराठी आणि इंग्रजी भाषा अनिवार्य, सहावीपासून हिंदी, संस्कृत आणि इतर भारतीय किंवा परदेशी भाषा शिकण्याचा पर्याय, तर अकरावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमात दोन भाषांचा समावेश असेल. तिसरी ते आठवीपर्यंत पूर्व व्यावसायिक कौशल्यशिक्षण, तर नववीपासून विशेष व्यावसायिक शिक्षणाची सोय उपलब्ध होणार आहे. गणित आणि विज्ञान विषयांचे दोन स्तरावरचे अभ्यासक्रम उपलब्ध करण्याचा विचार यात मांडला आहे. आंतरविद्याशाखीय शिक्षणांतर्गत पर्यावरण शिक्षणाचा समावेश प्रस्तावित आहे. भारतीय प्राचीन ज्ञान, आणि नैतिक मूल्यांचं शिक्षण, शारीरिक आणि मानसिक आरोग्य, शैक्षणिक आणि व्यावसायिक मार्गदर्शन, शैक्षणिक तंत्रज्ञान, इत्यादी बाबींचा यामध्ये समावेश केला आहे. संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या या मसुद्याबाबत सर्व समाज घटक, शिक्षक, पालक, शिक्षण तज्ज्ञ, शैक्षणिक संस्था तसंच इत्यादी संबंधितांनी येत्या तीन जूनपर्यंत अभिप्राय नोंदवावेत, असं आवाहन परिषदेनं केलं आहे.

****

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठीच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस आहे. या टप्प्यात सात राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या ५७ मतदारसंघांसाठी परवा एक जून रोजी मतदान होणार आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या गेल्या शनिवारी पार पडलेल्या सहाव्या टप्प्यात ५८ मतदारसंघांमध्ये ६३ पूर्णांक ३७ शतांश टक्के मतदान झालं.

****

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांनी मतदारांना चुकीच्या माहितीवर आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. लोकांच्या विविध शंकांचं समर्थन करण्यासाठी, निवडणूक ‍विभागाच्या संकेतस्थळावर सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यात आली आहेत. त्या तपशीलाचा, तसंच आयोगानं वेळोवेळी जारी केलेल्या पत्रकांचा आढावा घेवून मतदारांनी नि:संशय रहावं, असं त्यांनी ट्वीट संदेशात म्हटलं आहे.

****

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामना दैनिकाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांना मानहानीची कायदेशीर नोटीस बजावली आहे. लोकसभा निवडणुकीत पैशाचा वापर केल्याचा आरोप केल्याबद्दल ही नोटीस पाठवण्यात आली असून, येत्या तीन दिवसात राऊत यांनी जाहीर माफी न मागितल्यास सामना दैनिका विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

****

पुण्याच्या पोर्शे कार अपघात प्रकरणी ससून रुग्णालयाचे दोन डॉक्टर आणि एका शिपायाला निलंबित करण्यात आलं आहे. या तिघांना निलंबित करण्याचा प्रस्ताव पोलिसांनी काल आरोग्य विभागाला पाठवला होता. दरम्यान, या प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीच्या जामीन अर्जावरची सुनावणी न्यायालयानं परवा एक जूनपर्यंत स्थगित केली आहे.

****

या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत

****

काँग्रेस पक्षानं राज्याचा दुष्काळ पाहणी दौरा जाहीर केला असून, उद्या ३१ मे पासून या दौऱ्याला सुरुवात होत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. उद्या छत्रपती संभाजीनगर इथून या दौऱ्याला प्रारंभ होणार आहे.

दरम्यान, पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी चौकशीसाठी स्थापन विशेष तपास अधिकारी डॉ. पल्लवी सापळे यांच्यावरच भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असल्याची टीका पटोले यांनी केली. या प्रकरणी सीबीआय चौकशीच्या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला. काँग्रेस पक्ष विधान परिषदेच्या दोन जागा लढवणार असून, दोन जूनला उमेदवारांची घोषणा केली जाईल असंही पटोले यांनी स्पष्ट केलं.

****

लातूर पोलिसांनी बनावट गुटखा तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकून सुमारे तीन कोटी रुपयांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला. औद्योगिक वसाहत परिसरातल्या कोंबडे ॲग्रो एजन्सीच्या गोदामावर पोलिसांनी धाड टाकून ही कावाई केली. या प्रकरणी मुख्य आरोपी विजय केंद्रे आणि दोन परप्रांतियांसह एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी याबाबत अधिक माहिती दिली.

 

यामध्ये तीन करोड पाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. त्यामध्ये गुटख्याचा मुद्देमाल त्याचबरोबर वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे वाहन व गुटख्याच्या पॅकिंगसाठी लागणारे साहित्य जप्त केलेलं आहे. त्यामध्ये सात आरोपी असून, पुढील कार्यवाही होत आहे. 

****

अल्पवयीन मुलांकडून होणारे अपघात रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाच्या बैठकीत ते काल बोलत होते. अल्पवयीन मुलांकडून होणारं मद्यप्राशन तसंच वाहन चालवण्यासारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी संयुक्त पथकं स्थापन करुन परमिट रुम, बियरबार, मद्यविक्री दुकानं, तसंच वाहनांची तपासणी करावी, यासोबतच पालक आणि मुलांचंही प्रबोधन करावं, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. 

****

धाराशिव जिल्हा परिषदेचं कामकाज आता ई - ऑफिस प्रणाली द्वारे सुरू झालं असून, कागदविरहित कामकाज करणारी धाराशिव ही मराठवाड्यातली पहिली जिल्हा परिषद ठरली आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर...

 

धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मैनक घोष यांच्या संकल्पनेतून ई-ऑफिस प्रणालीद्वारे जिल्हा परिषदेचं कामकाज सुरू होण्यास प्रारंभ झाला आहे. यामुळे फाइल्स प्रलंबित राहण्याचं प्रमाण शून्यावर येणार असून, चालू तारखेतच काम होणार असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या कामात गतीमानता येणार आहे. ई-ऑफिस प्रणाली मुळे कागदांचा अपव्यय कमी होऊन अभिलेखे वर्गीकरण आणि जतन करण्याचा भार देखील कमी होणार आहे. या ई-ऑफिस प्रणाली कामकाजामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची काम जलदरीत्या पूर्ण होऊन गतीमान प्रशासनाचा सुखद अनुभव जिल्हावासियांना मिळणार आहे.

- देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, धाराशिव

****

परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि वाव गो ग्रीन, या कंपनीच्या संयुक्त विद्यमाने ‘ड्रोन तंत्रज्ञान आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमांतर्गत, शेतीसाठी ड्रोन द्वारे फवारणी अभियान राबवण्यात येत आहे. शेतकऱ्यांना अत्यंत अल्प दरात, भाडेतत्त्वावर फवारणीसाठी ड्रोन उपलब्ध करून देण्यात येत असून, अनेक गावांमध्ये ड्रोन फवारणी प्रात्यक्षिक करण्यात येत आहे. येत्या हंगामात शेतकऱ्यांनी शेतीकामांसाठी विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध यंत्रांचा वापर करण्याचं आवाहन, प्राध्यापक डॉ. स्मिता सोळंकी यांनी केलं आहे.

****

लातूर जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरु झाली असून, जिल्ह्यात बियाणे विक्रीवर नियंत्रण ठेण्यासाठी, तालुका आणि जिल्हास्तरावर भरारी पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी विशिष्ट बियाण्यांचा आग्रह न धरता, उपलब्ध चांगल्या कापूस बियाण्यांचाही वापर करावा, असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. टी. जाधव यांनी केलं आहे.

****

बीड जिल्ह्यात कृषी निविष्ठा तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना योग्य दर्जाची कृषी बियाणं, खतं आणि कीटकनाशकं, योग्य वेळी आणि योग्य किमतीत मिळण्यासाठी तसंच तालुका निहाय पुरवठा होणाऱ्या या निविष्ठांची विक्री सुरळीतपणे होण्यासाठी हा कक्ष कार्यरत असेल.

****

धाराशिव तालुक्यातल्या पोलीस पाटील नूतनीकरणाच्या एका प्रकरणात, अधिकारी, मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांविरोधात बेकायदेशीरपणे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करत, विविध संघटनांच्या वतीने धाराशिव तहसील कार्यालयासमोर काल धरणे आंदोलन करण्यात आलं. कोणतीही शहानिशा न करता तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना केलेली अटक ही चुकीची असून, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरोधात तत्काळ गुन्हे दाखल करावेत, या आशयाचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं.

****

परभणी इथं मोटार सायकल चोरी करणाऱ्या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. आरोपीकडून आतापर्यंत बीड, परळी, लातूर, मरूड, बार्शी-सोलापूर जिल्ह्यातून चोरलेल्या २० मोटार सायकली जप्त करण्यात आल्या असून, न्यायालयानं त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं विशाल धम्म मेळावा आणि प्रसिद्ध गायक अजय देहाडे यांच्या बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम पार पडला. तथागत भगवान गौतम बुद्धांची व्यक्तिरेखा साकारणारे, धम्मपद यात्रेचे शिल्पकार गगन मलिक यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

नैर्ऋत्य मोसमी पाऊस येत्या २४ तासात केरळात दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. दरम्यान येत्या दोन दिवसात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. काल राज्यात ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक ४६ पूर्णांक सात अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. नागपूर तसंच वर्धा इथं पारा ४५ अंशांवर, चंद्रपूर, यवतमाळ तसंच गोंदिया इथं पारा ४४ अशांवर होता. मराठवाड्यात परभणी इथं ४२, बीड ४१ पूर्णांक सात, छत्रपती संभाजीनगर इथं ४० तर धाराशिव इथं ३९ पूर्णांक तीन अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

****


 

 

No comments: