Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 28 May 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २८ मे २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· दहावी परीक्षेचा निकाल जाहीर-राज्यभरातून ९५ पूर्णांक ८१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
· पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी ससून रुग्णालयातल्या दोन डॉक्टरांसह तिघांना अटक
· छत्रपती संभाजीनगर इथं लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण
आणि
· देशभरात यंदा जून ते सप्टेंबरदरम्यान १०६ टक्के पावसाची शक्यता
सविस्तर बातम्या
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मार्च महिन्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. यावर्षी निकालात गेल्या वर्षीपेक्षा सुमारे दोन टक्के वाढ झाली असून, ९५ पूर्णांक ८१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९९ पूर्णांक एक शतांश टक्के इतका लागला असून, नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ९४ पूर्णांक ७५ टक्के इतका लागला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातून ९५ पूर्णांक १९ टक्के तर लातूर विभागातून ९५ पूर्णांक २७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुणे ९६ पूर्णांक ४४ टक्के, कोल्हापूर ९७ पूर्णांक ४५, अमरावती ९५ पूर्णांक ५८, नाशिक ९५ पूर्णांक २८ तर मुंबई विभागाचा निकाल ९५ पूर्णांक ८३ टक्के इतका लागला आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागात बीड जिल्ह्याचा सर्वाधिक ९७ पूर्णांक ४० टक्के निकाल लागला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा ९५ पूर्णांक ५१, जालना ९४ पूर्णांक ९९, परभणी ९३ पूर्णांक ०३ तर हिंगोली जिल्ह्याचा निकाल ९२ पूर्णांक २२ टक्के लागला आहे.
लातूर विभागात लातूर जिल्ह्याचा सर्वाधिक म्हणजे ९६ पूर्णांक ४६ टक्के निकाल लागला असून, धाराशिव जिल्ह्याचा ९५ पूर्णांक ८८ तर नांदेड जिल्ह्याचा ९३ पूर्णांक ९९ टक्के निकाल लागला आहे.
निकालाच्या टक्केवारीत यंदाही मुली पुढे असून मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक २१ टक्के इतकं आहे. तर मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण ९४ पूर्णांक ५६ टक्के इतकं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे. शिंदे यांनी आपल्या संदेशात यशस्वी विद्यार्थ्यांना वाटचालीसाठी शुभेच्छा देत, इतर विद्यार्थ्यांना नव्या उमेदीने पुन्हा सुरुवात करण्यास सांगितलं आहे.
दरम्यान, या निकालासंदर्भात गुणपडताळणी तसंच उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी इच्छुकांना आजपासून येत्या ११ जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.तर छायाप्रत घेतल्यानंतर पाच दिवसांच्या आत पुनर्मुल्यांकनाचा अर्ज करता येणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या मिटमिटा तसंच यशोधरा कॉलनी इथल्या माध्यमिक शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी सर्वांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
लातूर मनपाच्या पीएमश्री सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक ९ चा निकाल १०० टक्के लागला आहे. मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी सर्वांचं अभिनंदन केलं आहे.
****
पुण्याच्या पोर्शे कार अपघात प्रकरणी पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयातले डॉ अजय तावरे आणि डॉ श्रीहरी हरनोळ, यांच्यासह अतुल घटकांबळे या कर्मचाऱ्याला अटक केली आहे. अल्पवयीन मुलाच्या रक्त नमुन्यामध्ये अदलाबदल केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या तिघांना काल न्यायालयात हजर केलं असता, ३० मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. १९ मे रोजी रात्री हा आरोपी मद्याच्या अंमलाखाली भरधाव चालवत असलेल्या कारची धडक बसून दोन तरुण अभियंत्यांचा मृत्यू झाला होता.
****
विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अभिजित पानसे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मनसेचे सरचिटणीस शिरीष सावंत यांनी ही घोषणा केली. विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जून रोजी मतदान होणार आहे.
****
इंडियन ऑईल कंपनीनं, भारतीय सेनेला काल हायड्रोजन इंधनावर चालणारी अत्याधुनिक बस प्रदान केली. लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे आणि इंडियन ऑईलचे अध्यक्ष एस.एम वैद्य यांच्या उपस्थितीत दिल्लीत राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळ एका कार्यक्रमात यासंबंधीच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
****
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी येत्या चार जूनला होणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं बीड बायपास परिसरातल्या एमआयटी महाविद्यालयाच्या इमारतीत औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठीची मतमोजणी होणार आहे. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या दिवशी सकाळी आठ वाजता टपाली मतमोजणीनं मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. प्रशासनानं मतमोजणी होणाऱ्या इमारतीला तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था केली आहे. ७० पोलीस अधिकारी, ५०० पोलीस कर्मचाऱ्यांसह केंद्र तसंच राज्य सुरक्षा दलाचे पोलिसही बंदोबस्तासाठी तैनात असल्याचं स्वामी यांनी सांगितलं. या दिवशी या इमारतीजवळच्या वाहतुकीत बदल केले जाणार असल्याची, तसंच प्रत्यक्ष मतमोजणी आधी, तीन जूनला मतमोजणीची रंगीत तालीम केली जाणार असल्याची माहितीही स्वामी यांनी यावेळी दिली.
****
लातूर जिल्ह्यातल्या जल जीवन मिशन योजनेच्या कामांना गती देण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणांनी समन्वयानं कामं करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या आहेत. पाणी टंचाई उपाययोजना आणि जल जीवन मिशनच्या कामांचा आढावा घेण्यासाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत त्या काल बोलत होत्या. पूर्ण होत आलेली बहुतांश कामं येत्या सात दिवसात पूर्ण करावीत असा आदेश देत, यापुढे या योजनेचा दैनंदिन आढावा घेतला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पाणी टंचाईच्या अनुषंगानं करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी घेतला.
****
नांदेड जिल्ह्यात काल तीन महिलांचा पैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाला. किनवट तालुक्यात काल दुपारी ही दुर्घटना घडली. दरम्यान, मुदखेड तालुक्यात ट्रॅक्टर ट्रॉली पुलावरून कोसळून एका १३ वर्षीय मुलाचा मृत्यू तर दोघे जखमी झाले. पार्डी-राजवाडी पुलावर काल सकाळी ही दुर्घटना घडली.
****
दुष्काळी अनुदान देण्याच्या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातल्या ताकतोडा इथल्या शेतकऱ्यांनी काल मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केलं. दुष्काळी अनुदान आणि अतिवृष्टीची नुकसान भरपाई संदर्भात जोपर्यंत शासनाकडून ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे.
****
देशात यंदाच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबरदरम्यान १०६ टक्के पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी नैऋत्य मौसमी पावसासंबंधीचा दुसऱ्या टप्प्यातला अंदाज काल जाहीर केला, त्यावेळी ही माहिती दिली. नैऋत्य मौसमी पाऊस मध्य आणि दक्षिणी द्वीपकल्पीय भागात सामान्य पातळीपेक्षा जास्त, वायव्य भागात सामान्य आणि ईशान्य भारतात सामान्य पातळीपेक्षा कमी पडेल, असा अंदाज महापात्रा यांनी वर्तवला. जून महिन्यातला पाऊस सामान्य राहील, असंही त्यांनी सांगितलं.
****
दरम्यान, राज्यात काल तुरळक ठिकाणी पाऊस झाला. विदर्भात काही ठिकाणी आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ झाली, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किंचित घट झाली. राज्यात काल सर्वाधिक ४७ पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमान ब्रम्हपुरी इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात परभणी आणि बीड इथं ४१, नांदेड ४० पूर्णांक आठ, तर छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव इथं सरासरी ३७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं.
मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
****
नांदेड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने काल विष्णुपुरी इथं काळेश्वर घाट परिसरात मान्सून-२०२४ पूर्वतयारी-पूर परिस्थिती शोध तसंच बचावाबाबत रंगीत तालीम घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.
****
सोलापूर जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पावसात जवळपास एक हजार ११४ हेक्टर शेती पिकांचं नुकसान झालं, तर वीज पडून तसेच इतर कारणामुळे दोघांचा मृत्यू झाला. तसंच १४ जनावरं दगावली आहेत. जिल्ह्यात जवळपास एक हजार २६९ घरांची पडझड झाली आहे.
****
बीड जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांमुळे झालेल्या शेतीपिकं आणि पशुधनाच्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांनी आपल्या अशा नुकसानाबद्दल तहसीलदार किंवा नायब तहसीलदारांशी संपर्क साधावा, असं आवाहन बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केलं आहे.
आमदार संदीप क्षीरसागर यांनी काल नुकसान झालेल्या शेतपिकांची पाहणी केली. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करुन मदत देण्याची सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी केली.
****
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. धाराशिव इथं जयोस्तू प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं अभिवादन कार्यक्रम तसंच नारीशक्ती सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या ४५ महिलांना गौरवण्यात येणार आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या ऐंशी दिव्यांग व्यक्तींना काल अत्याधुनिक कृत्रिम हात, पाय आणि कुबड्यांचं नि:शुल्क वाटप करण्यात आलं. बीडच्या रोटरी क्लब आणि मुंबईच्या रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला.
****
No comments:
Post a Comment