Tuesday, 17 September 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 17.09.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 17 September 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: १७ सप्टेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज ध्वजारोहण झालं. मराठवाड्याचा अनुशेष भरुन काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. ते आपल्या भाषणात म्हणाले...

गेल्या वर्षी आम्ही  राज्य मंत्री मंडलाची बैठक छत्रपती संभाजीनगरला घेतली ४५ हजार कोटी पेक्षा जास्त काम आणि प्रकल्प सुरू केले १६ सष्टेंबर २०२३ ला २९ निर्णय व २६घोषणा  करण्यात आल्या या पैकी  २९ हजार कोटीची कामे पुर्णत्वाकडे चालली आहेत उरर्वरित काम प्रगती पथावर आहेत हे फक्त कागदावर ठेवलेल नाही तर यांची अंमल बजावणी सुरू झाली आहे.

या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या विविध विकासयोजनांच्या कामांचं लोकार्पण केलं. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी शासकीय रुग्णालयातील सुपर स्पेशालिटी विभागाची पाहणी करुन डॉक्टरांशी संवाद साधला.

हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

***

जालना इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते, बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते, परभणी इथं पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते, तसंच धाराशिव इथं पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. नांदेड इथं पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते तर हिंगोली इथं पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आणि लातूर इथं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं.

***

हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर इथं चित्रकार दिलीप दारव्हेकर आणि कुटुंबियांनी कळमनुरी तालुक्यातल्या ५२ स्वातंत्र्य सैनिकांची रांगोळीतून भव्य चित्रकृती रेखाटली आहे.

***

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्ली इथं आठव्या भारतीय जल सप्ताहाचं उद्घाटन केलं. भारतीय प्राचीन धर्मग्रंथांनी हजारो वर्षांपूर्वी जलसंधारणाचा उल्लेख केला असल्याचं मुर्मू यांनी यावेळी बोलताना नमूद केलं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान अमृत सरोवरांची निर्मिती करण्यात आली आणि अनेक जलकुंभांचं पुनरुज्जीवन करण्यात आल्याचा उल्लेख राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात केला. चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात चाळीस देशांतल्या दोनशे प्रतिनिधींसह सुमारे चार हजार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात, जलक्षेत्रात काम करणारे शंभरहून अधिक स्टार्टअप्स आपापल्या संकल्पना मांडतील.

***

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाला आज शंभर दिवस पूर्ण झाले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं देशाची सुरक्षा व्यवस्था मजबूत केली असून सुरक्षित भारत निर्माण करण्यास मदत केली आहे, असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. सरकारनं तिसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या शंभर दिवसांत पंधरा लाख कोटी रुपयांच्या विविध विकासयोजनांना मंजूरी दिली आहे आणि काम सुरु केलं आहे, तसंच पायाभूत सुविधांसाठी तीन लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरु केले आहेत, असं शहा यांनी सांगितलं.

***

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नवे मुख्यमंत्री म्हणून मंत्री आतिषी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आहे. दिल्लीच्या आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे.

***

दहा दिवस चाललेल्या गणेशोत्सवाची आज, अनंत चतुर्दशीला सांगता होत आहे. मुंबईत विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या आहेत. महापालिकेनं गणेश मूर्ती विसर्जनासाठी २०४ कृत्रिम तलाव तयार केले आहेत.

छत्रपती संभाजीनगर शहरात आठ विहिरींमध्ये आणि एका नैसर्गिक तलावासह सात कृत्रिम तलावांमध्ये घरगुती गणेशमूर्तींचं विसर्जन करण्याची सोय महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आली आहे. निर्माल्य दान करणाऱ्या नागरिकांना महापालिकेकडून अर्धा किलो सेंद्रीय खताचं पाकीट भेट म्हणून दिलं जाणार आहे.

नांदेड, जालना आणि हिंगोली जिल्ह्यात श्री गणेश विसर्जनासाठी प्रशासनानं तयारी केली आहे. तर, धाराशिव जिल्ह्यात आज सुमारे एक हजार गणेश मूर्तींचे विसर्जन होणार आहे.

***

पंचेचाळीसाव्या बुद्धीबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताची आगेकूच सुरु आहे. हंगेरीविरुद्ध भारताच्या पुरुष संघानं ३-१ असा विजय मिळवत पुढची फेरी गाठली. तर, महिला संघानं अर्मेनियावर विजय मिळवला. बुद्धीबळ ऑलिम्पियाडमध्ये पुरुष आणि महिला संघानं सलग सहा विजयांची नोंद केली आहे. स्पर्धेत अजून सात फेरींचा खेळ बाकी आहे.

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.05.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 01 May 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्र...