Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 24 September 2024
Time: 01.00 to
01.05 PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २४ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापनात पारदर्शकता आणि जबाबदारी
निश्चित करण्यात कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखापाल यांची भूमिका महत्त्वाची असल्याचं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. आज नवी दिल्लीत
सर्वोच्च लेखा संस्थांच्या आशियाई संघटनेच्या १६ व्या बैठकीचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या
हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. कॅग
कार्यालय नैतिक आचरणाच्या आदर्श संहितेचं पालन करतं, ज्यामुळे त्याच्या कामकाजात प्रामाणिकतेचा स्तर सर्वोच्च असल्याचं
राष्ट्रपतींनी नमूद केलं. चार दिवसांच्या या परिषदेत सर्वोच्च लेखा संस्थांच्या महत्त्वपूर्ण
भूमिकेवर चर्चा केली जाणार आहे.
****
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज आणि उद्या
छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत आहेत. आगामी विधानसभा निडवणुकीच्या अनुषंगाने ते
पक्ष कार्यकर्त्यांशी तसंच अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
हे देखील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज छत्रपती संभाजीनगर इथं येत आहेत.
****
यंदा साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून
सुरू होणार आहे. त्यानुसार साखर कारखान्यांनी आणि आयुक्तालयानं कार्यवाही करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.
आगामी सण, आणि राज्य विधानसभा निवडणुका लक्षात
घेऊन, ऊस गळीत हंगाम सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून गाळप हंगामाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. केंद्र
सरकारनं यंदा उसाचा रस, साखर सिरप, तसंच इथेनॉल निर्मितीसाठी परवानगी दिली आहे. साखर उद्योगाशी
संबंधित असलेल्या डिस्टिलरी प्रकल्पांमधील रेक्टिफाइड स्पिरिट आणि ईएनए अल्कोहोलवरील
शुल्काबाबत देखील यावेळी चर्चा करण्यात आली. खांडसरी उद्योगांना मान्यता आणि गुळ उत्पादन
नियंत्रणाबाबत सरकारकडे अहवाल सादर करण्यात आला असून, त्यानुसार मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असं पवार यांनी सांगितलं.
****
यंदा देशभरात ११ कोटी चार लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर
खरीप पिकांची पेरणी झाली आहे. त्यापैकी चार कोटी १३ लाख हेक्टर क्षेत्र भाताच्या पिकाखाली
असल्याचं केंद्र सरकारनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. यंदा एक कोटी २८ लाख
हेक्टर क्षेत्रावर कडधान्य, एक कोटी ९२ लाख हेक्टरवर तृणधान्य, तर १ कोटी ९३ लाख हेक्टरवर गळीत पिकांची पेरणी झाली आहे. ५७
लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर ऊसाची लागवड झाली आहे.
****
येत्या दहा नोव्हेंबरला होणाऱ्या टीईटी, अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी ऑनलाइन
अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी अंतिम मुदत येत्या ३० तारखेपर्यंत आहे. महाराष्ट्र
राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी ही माहिती दिली. या परीक्षेशी
संबंधित सर्व शासननिर्णय, इतर तपशील राज्य परीक्षा परिषदेच्या mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
****
शासन शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे, असं राज्याचे महसूल मंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री
राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. त्यांनी जिल्ह्यातल्या शिवापूर परिसरात शेत
पिकांच्या नुकसांनीची पाहणी केली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. नुकसानग्रस्त
शेतकरी बांधवांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान, पीक विमा कंपनीने गत वर्षी खरीप हंगामात पंचनामे न करताच प्रकरणे
अपात्र ठरवल्याच्या तक्रारी आहेत, त्याबाबत राज्यस्तरावरील यंत्रणेसमवेत पुढील दोन ते तीन दिवसांत
बैठक घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासनही विखे पाटील यांनी शेतकऱ्यांना दिलं आहे.
****
नांदेड इथल्या प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील
कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. महसुली बदली धोरण रद्द करावं, सप्टेंबर २०२२ मध्ये मंजूर झालेल्या आकृतीबंधाची अंमलबजावणी
करावी, सेवा प्रवेशोत्तर नियम शिथिल करावेत, यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांच्या
मागण्यांबाबत कार्यवाही होत नाही, तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी दिली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्री इथं तहसील कार्यालयात
आज दोन जणांनी तहसीलदारांची खुर्ची पेटवून दिली. या प्रकरणी पोलिसांनी मंगेश साबळे
आणि वसंत बनसोड या दोघांना ताब्यात घेतलं असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याचं, फुलंब्री पोलिस ठाण्याकडून सांगण्यात आलं. मराठा आरक्षणाच्या
मागणीसंदर्भात हे आंदोलन करण्यात आल्याचं वृत्त आहे.
****
लातूर शहर महानगरपालिका हद्दीतील मालमत्ता करावर आकरण्यात
आलेल्या व्याजाच्या शास्तीवर १०० टक्के सवलत देण्यात येत आहे. २८ सप्टेंबरपर्यंत ही
सवलत उपलब्ध असून, मालमत्ताधारकांनी या
सवलतीचा लाभ घेण्याचं आवाहन महापालिकेनं केलं आहे.
****
मुख्यमंत्री युवा कार्य आणि शिक्षण योजनेअंतर्गत बीड इथं
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज तसंच परवा २६ तारखेला विशेष मेळाव्याचं आयोजन करण्यात
आलं आहे. युवकांनी या मेळाव्याचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****s
No comments:
Post a Comment