Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 02 November 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
• आज बलिप्रतिपदा-विक्रम संवत २०८१ ला प्रारंभ-लक्ष्मीपूजनाचा सोहळा काल उत्साहात साजरा
• देशभरात वस्तू आणि सेवा कर महसुलात ऑक्टोबर महिन्यात नऊ टक्के वाढ
• राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाबाबत दोन हजार ६२ तक्रारी प्राप्त
• सोलापूर जिल्ह्यात चौघांचा तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू
आणि
• न्यूझीलंडविरुद्ध मुंबई कसोटीच्या पहिल्या डावात भारत १४९ धावांनी पिछाडीवर
****
बलिप्रतिपदा अर्थात दिवाळीचा पाडवा आज साजरा होत आहे. विष्णूचा पाचवा अवतार असलेल्या वामनाने तीन पावलं भूमीचं दान मागून राक्षसांचा राजा बलि याला पाताळात पाठवल्याची आख्यायिका आजच्या सणामागे सांगितली जाते. गोवर्धन पूजाही आज केली जाते. विक्रम संवत २०८१ अर्थात व्यापारी वर्गाच्या नव्या वर्षाला आजपासून प्रारंभ होत आहे, पाडव्यानिमित्त सर्वत्र विशेष खरेदीचा प्रघात आहे. घरांसह वाहनं, आभुषणं, आणि इतर साहित्य खरेदीकडे नागरिकांचा कल दिसून येतो.
दीपोत्सवात सर्वाधिक मानाचा लक्ष्मीपूजनाचा सण काल साजरा झाला. लक्ष्मीपूजनासाठी कमळासह विविध प्रकारची फुलं, नैवेद्यासाठी नाना तऱ्हेची पक्वान्नं, पूजेसाठी फडे-केरसुण्या, लक्ष्मीला अर्पण करण्याची शुभचिन्हं आणि सौभाग्यालंकार, तसंच विविध पूजा साहित्यानं सजलेल्या बाजारपेठा, खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांच्या विशेषत: महिलांच्या गर्दीनं काल फुलून गेल्या होत्या. काल सायंकाळी घरोघरी पारंपरिक पद्धतीनं लक्ष्मीपूजन करण्यात आलं. आकर्षक आणि सुबक रांगोळीच्या पार्श्वभूमीवर मंद तेवणाऱ्या पणत्या, विद्युत रोषणाईच्या झगमगत्या माळा, नाना तऱ्हेचे आकाशदिवे, आणि आकाश व्यापून टाकणाऱ्या नयनरम्य आतिषबाजीने आसमंत उजळून गेला .
****
शिर्डीमधे साईबाबा संस्थानच्या वतीनं सालाबादप्रमाणे याही वर्षी दिवाळीनिमित्त साईबाबांच्या समाधी मंदिरात लक्ष्मी कुबेर पूजन, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते करण्यात आलं. काल दिवाळीनिमित्त साईबाबांची मूर्ती हिरेजडीत सुवर्ण अलंकारांनी सजवण्यात आली होती.
पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही मंदिर समितीनं विविध फुलांच्या माध्यमातून आकर्षक आरास केली होती.
****
वस्तू आणि सेवा कर महसूल ऑक्टोबर महिन्यात नऊ टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमधे एक लाख ७२ हजार कोटी रुपये महसूल वस्तू आणि सेवा करापोटी मिळाला होता. तो यंदा एक लाख ८७ हजार कोटी रुपयांच्या पलिकडे गेला आहे. देशांतर्गत खरेदी विक्री व्यवहारांमधे वाढ झाल्यामुळे करमहसुलात वाढ झाली असल्याचं सरकारी पत्रकात म्हटलं आहे.
****
नमो ड्रोन दिदी योजनेच्या संचालनाबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. या योजनेचं संचालन केंद्रीय स्तरावर अधिकार प्राप्त समितीकडे देण्यात आलं आहे.
****
१९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात काल ६२ रुपयांनी वाढ झाली. कालपासून हे नवे दर लागू झाले. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मात्र कोणतीही वाढ किंवा कपात झालेली नाही.
****
राज्यभरात आचारसंहिता भंगाबाबत सी-व्हिजिल ॲपवर आतापर्यंत एकूण दोन हजार ६२ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी दोन हजार ५९ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. याच कालावधीत विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत आतापर्यंत सुमारे २३४ कोटी ४९ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
****
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांसाठी प्रचाराची मोर्चेबांधणी केली आहे. महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध ठिकाणी प्रचारसभा होणार असून, त्यातली पहिली सभा येत्या आठ नोव्हेंबरला धुळ्यात होणार आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी देखील सहा नोव्हेंबर रोजी राज्यात प्रचार दौऱ्यावर येत असून, ते नागपूर आणि मुंबईमध्ये आयोजित कार्यक्रमांना हजेरी लावतील असं कॉँग्रेसतर्फे सांगण्यात आलं आहे.
****
मुंबादेवी विधानसभा मतदार संघातल्या शिवसेनेच्या उमेदवार शायना एन.सी यांच्याबद्दल कथित आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात काल गुन्हा दाखल करण्यात आला. नागपाडा पोलीस ठाण्यात शिवसेनेनं तक्रार नोंदवल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.
****
मुंबईतल्या माहिमचे महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे सदा सरवणकर यांनी, आपण निवडणूक लढवण्यावर ठाम असून कदापि माघार घेणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. ते काल पत्रकारांशी बोलत होते. माहिमचे मनसे उमेदवार अमित ठाकरे यांना भारतीय जनता पक्षानं पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा आपण प्रयत्न केला, मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही, असं सरवणकर यांनी सांगितलं.
****
येत्या २० नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी केलं आहे.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
****
रेल्वे तिकीट आरक्षणाचे नवीन नियम कालपासून लागू झाले. आता रेल्वे तिकिटांचं आरक्षण १२० दिवसांऐवजी प्रवासाच्या ६० दिवस आधी करता येणार आहे. मात्र, ३१ ऑक्टोबरपर्यंत झालेली आरक्षणं कायम राहणार आहेत. या नवीन आरक्षण प्रणालीमुळे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार आणि संग्रह कमी होईल, तसंच तिकिटं रद्द होण्याचं प्रमाण कमी होण्यासही मदत होईल, असं रेल्वे विभागानं म्हटलं आहे.
****
दक्षता जनजागृती सप्ताह सध्या पाळला जात आहे. २८ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या सप्ताहात भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी या निमित्तानं सतर्क राहून, भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची निर्भयपणे माहिती देण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उप अधीक्षक सुरेश नाईकनवरे यांनी केलं आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे आवाहन करण्यात येते की, दिनांक २८ आक्टोबर २०२४ ते ३ नोहेंबर २०२४ या कालावधीमध्ये दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये आपले शासकीय काम असेल आणि त्यासाठी कुणी आपल्याला लाच मागत असेल तर तात्काळ आपण लाच लुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्याशी संपर्क करावा. अशा प्रकारची कुठल्याही प्रकारे लाच देणे किंवा लाच घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. तरी मी सर्वांना आवाहन करतो की अशा प्रकारे कुणी लाच मागत असेल तर तात्काळ संपर्क करावा.
****
सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यात चार ऊसतोड मजुरांचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. माढा इथल्या जगदाळे वस्तीवर यवतमाळ जिल्ह्यातून आलेल्या ऊसतोड मजुरांपैकी २४ ते २६ वर्ष वयोगटाले काही जण काल दुपारी अंघोळीसाठी खैराव इथं सीना नदीवर गेले होते, त्यावेळी ही दुर्घटना घडली. याबाबत माहिती मिळताच, माढा पोलिस घटनास्थळी दाखल झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही दोन तरुणांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. लासूर स्टेशन परिसरात ही दुर्घटना घडली. अनुक्रमे १७ आणि १८ वर्षाच्या या दोघा भावांपैकी एक जण पाय घसरून विहिरीत पडला, त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुसरा भाऊही बुडाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात पहिल्या डावात भारत १४९ धावांनी पिछाडीवर आहे. मुंबईत वानखेडे मैदानावर काल सकाळी सुरु झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेला पाहुणा संघ २३५ धावांत सर्वबाद झाला. रवींद्र जडेजानं पाच, वॉशिंग्टन सुंदरने चार तर आकाशदीपने एक बळी घेतला. काल पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा, ऋषभ पंतच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाच्या चार बाद ८६ धावा झाल्या होत्या. शुभमन गील ३१ तर ऋषभ पंत एका धावेवर खेळत आहे. दरम्यान या मालिकेतले पहिले दोन्ही सामने जिंकून न्यूझीलंडनं २-० अशी विजयी आघाडी घेतलेली आहे.
****
आय पी एल अर्थात इंडियन प्रीमियर लीगच्या २०२५ हंगामासाठी हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधारपदी पुन्हा नियुक्ती झाली आहे. २०२४ च्या आय पी एल हंगामासाठी रोहित शर्माऐवजी हार्दिक पांड्याला कर्णधारपद दिलं होतं. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सनं पाच वेळा आय पी एल चं विजेतेपद पटकावलं आहे.
****
दिवाळीच्या आपल्या आनंदात सर्वांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं करण्यात येतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या वतीनं, वंचितांना दिवाळी फराळ वाटप उपक्रम लोकसहभागातून राबवण्यात आला. छत्रपती संभाजीनगर इथल्या नागरिकांनी स्वेच्छेने जमा केलेली फराळाची पाकिटं जवळपास पाचशे कुटुंबांपर्यंत पोहोचवण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर इथं अन्न वाचवा समितीच्या वतीने दिव्यांग तसंच अंध व्यक्तींना मिठाई आणि कपडे वाटप करून दिवाळी साजरी करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर इथं निवडणूक बंदोबस्तासाठी तैनात असलेले केंद्रीय निमलष्करी दलाचे सुमारे दोनशे महिला- पुरुष पोलिसांसोबत पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी काल दिवाळी साजरी केली.
****
दिवाळी तसंच छटपूजेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती संख्या पाहता, मध्य रेल्वेनं मुंबईहून गोरखपूर, दानापूर, छपरा, तसंच काझीपेठसाठी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. आज आणि उद्या या गाड्या सोडण्यात येणार आहेत.
****
No comments:
Post a Comment