Thursday, 2 January 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.01.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 02 January 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.

****

पंतप्रधान विमा योजनेच्या आर्थिक तरतुदीत वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करण्याकडे वाटचाल सुरू - मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

नववर्षाच्या पहिल्या दिवशी दोन वेगवेगळ्या अपघातात मराठवाड्यातल्या आठ भाविकांचा मृत्यू

ज्येष्ठ साहित्यिक सुधीर रसाळ आणि संजय आर्वीकर यांना विदर्भ साहित्य संघाचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

आणि

वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमाअंतर्गत हिंगोली आणि नांदेडमध्ये वाचन उपक्रमांचं आयोजन

****

डीएपी खतांवर प्रतिटन साडे तीन हजार रुपये विशेष अनुदान पुढे चालू ठेवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे. शेतकऱ्यांना डीएपी खताच्या ५० किलोच्या पोत्यावर एक हजार ३५० रुपये अनुदान मिळेल, त्याकरता केंद्रीय अर्थसंकल्पात तीन हजार ८५० कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल घेण्यात आला. या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान विमा योजना तसंच पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना सुरू ठेवण्यावर मंत्रिमंडळानं शिक्कामोर्तब केलं. या योजनेसाठीच्या आर्थिक तरतुदीत वाढ करण्यात आल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले...

‘‘प्रधानमंत्री फसल बीमा योजना उसका एनहांसमेंट उसके अलोकेशन को एनहान्स किया गया। 69,515 करोड किया गया। और ये जिस तरह का अभी तक का अनुभव आया है, जिस तरह से इस स्कीम मे युटीलायजेशन, जिस तरह से रिस्पॉन्स मिला है, जैसे किसानों के जीवन में जो रियल परिवर्तन आया है इस स्कीम से उसके कारण इस ॲलोकेशन को एनहांस किया गया है।’’


गेल्या आठ वर्षांच्या काळात पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना एक लाख ७० हजार कोटी रुपये वाटप करण्यात आलं असल्याची माहितीही वैष्णव यांनी दिली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळानं नव्या वर्षातला पहिला निर्णय शेतकरी हिताचा घेतल्याचं नमूद केलं आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांची पीकं अधिक सुरक्षित होतील, आणि नुकसानाची भीती कमी होईल, असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

****

गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करण्याचं स्वप्न साकारण्याकडे वाटचाल सुरू झाल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल गडचिरोलीत लॉईड्स मेटल कंपनीच्या डी आर आय प्रकल्पाच्या कोनशीलेचं अनावरण तसंच विविध उपक्रमांचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. गडचिरोली जिल्ह्यात सर्वार्थाने मोठं परिवर्तन दिसून येत असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं. ते म्हणाले...

‘‘कोणसरीचा हा जो प्रकल्प, ज्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री असताना मी केलं होतं, आता त्याच्या पहिल्या फेजचं उद्घाटन या ठिकाणी करतोय. अनेक प्रकल्पांचा आज उद्घाटन भूमिपूजन होत आहे. दहा हजार लोकांना रोजगार मिळालाय. पाच हजारांना अजून दहा महिन्यांमध्ये काम पूर्ण झाल्यानंतर रोजगार त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, ते आपल्याला पाहायला मिळतंय आणि आपलं जे स्वप्न आहे की, गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करायचं, त्याकडे वाटचाल आपली सुरू झाली आहे.’’


मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लॉईड्स मेटल कंपनीची शाळा, रुग्णालय, कर्मचारी निवासस्थानं, जिमखाना आणि बालोद्यान आदी उपक्रमांचं उद्घाटन यावेळी करण्यात आलं. 

दरम्यान, अहेरी ते गर्देवाडा या बस सेवेला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर ही बससेवा सुरू होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.

‘‘मला अतिशय आनंद आहे कारण हा जो सगळा भाग आहे, या भागांमध्ये वर्षानुवर्ष धुळणवळणाची साधनं नव्हती. रस्ते नव्हते. आणि माओवाद्यांचा डॉमिनन्स असलेला असा हा भाग होता. आपल्या पोलिसांनी अतिशय चांगलं काम करत त्यांचा डॉमिनन्स संपवलाय. आणि आपल्या सगळ्या विभागांनी या ठिकाणी प्रशासनाने चांगलं काम केलं. रस्त्याचे काम असेल पीडब्ल्यूडी ने केलेलं पुलाचं काम असेल याच्यामुळे थेट आता छत्तीसगडला आपण जोडले गेलो आहोत. आणि ७५ वर्षानंतर पहिल्यांदा फर्स्ट सेवा या भागामध्ये सुरू होतेय. लोकांना एक मोठी सुविधा मिळते.’’


नक्षल चळवळीच्या नेत्या ताराक्का आणि त्यांच्या दहा सहकाऱ्यांनी काल आत्मसमर्पण केलं. या सर्वांच्या पुनर्वसनाची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. नक्षल चळवळीचा बिमोड करणाऱ्या सी सिक्स्टी जवानांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

गडचिरोली पोलीस दलाला पाच बस, १४ चारचाकी आणि ३० दुचाकींचं वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. जिल्ह्यातल्या विविध विकास कामांची त्यांनी यावेळी पाहणी केली.

****

कृत्रिम बुद्धीमत्ता - आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावं, यासाठी राज्याचं पहिलं एआय धोरण तयार करण्याचे निर्देश, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री विधीज्ञ आशिष शेलार यांनी दिले आहेत. काल आपल्या विभागाचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उद्योग, व्यवसाय उभे राहतील, तरुणांना रोजगार मिळतील आणि तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्र सक्षमपणे स्पर्धा करु शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

****

पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत १५ रुपयांनी कपात केली आहे. मुंबईत आता १९ किलो वजनाचं एलपीजी सिलिंडर एक हजार ७५६ रुपयांना मिळेल. घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नाही.

****

नववर्षाच्या पहिल्या दिवशी देवदर्शनासाठी जातांना झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात मराठवाड्यातल्या आठ भाविकांचा मृत्यू झाला.

जालना जिल्ह्यात धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर महाकाळा इथं, नादुरुस्त झाल्यामुळे उभ्या असलेल्या ट्रकला छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी भरधाव कार मागून धडकल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातले चार जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले. काल दुपारी हा अपघात घडला. मृतांमध्ये दोन महिलांसह एका ११ वर्षीय मुलीचा समावेश आहे. या अपघातातले सर्वजण अक्कलकोटहून छत्रपती संभाजीनगरला परतत होते. जखमींना छत्रपती संभाजीनगर इथं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अन्य एका अपघातात सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोटमधल्या मैंदर्गी इथं भाविकांची चारचाकी गाडी आणि ट्रकची धडक होऊन चार भाविकांचा जागेवरच मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातले हे सर्व भाविक अक्कलकोटहून गाणगापूरला दर्शनासाठी जात होते.

****

विदर्भ साहित्य संघाच्या राज्यस्तरीय आणि अन्य वाङ्‌मय पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. यामध्ये कुसुमानिल स्मृती समीक्षा पुरस्कार संजय आर्वीकर यांच्या ‘आत्मप्रकाश` या ग्रंथाला, तर स्वर्गीय गोपाळराव मुकुंदराव देशपांडे स्मृती संपादन पुरस्कार सुधीर रसाळ आणि वसंत पाटणकर यांच्या ‘वाङ्मयीन युगांतर आणि श्री. पु. भागवत` या ग्रंथास प्राप्त झाला आहे. येत्या १४ जानेवारीला हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

****

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यात केळीगव्हाण इथल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं, आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते काल लोकार्पण झालं. पाच मेगावॅट क्षमतेच्या या सौर ऊर्जा प्रकल्पातून परिसरातल्या सहा गावांमधल्या अकराशे कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा केला जाणार आहे.

****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं आजपासून दोन दिवसीय विद्वत परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेत अहिल्याबाईंच्या कार्यावर प्रकाश टाकणारी तज्ज्ञांची व्याख्यानं, तसंच नाट्य प्रयोग सादर केले जाणार आहेत.

****

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देवगिरी प्रदेशाचं एकोणसाठावं प्रदेश अधिवेशन आजपासून लातूर इथं सुरु होत आहे. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन होईल. तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात उद्या शुक्रवारी दुपारी शहरातून शोभायात्रा काढली जाणार आहे. या अधिवेशनात सहभाग घ्यावा, असं आवाहन स्वागत समिती अध्यक्ष प्रमोद मुंदडा यांनी केलं आहे.

****

“वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत हिंगोली इथं शासकीय जिल्हा ग्रंथालयात वाचन कार्यशाळा आणि ग्रंथ प्रदर्शनाचं काल जिल्हा सांख्यिकी उपसंचालक एस. एम. रचावाड यांच्या हस्ते उद्घाटन झालं. हा उपक्रम येत्या १५ जानेवारीपर्यंत वाचन पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत सामूहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण आणि कथन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.

‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाअंतर्गत नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आज सामूहिक वाचन करण्यात येणार आहे.

****

धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगाम २०२३ मध्ये बनावट पिक विमा भरणाऱ्या किती शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात आली, याची सविस्तर माहिती देण्याची मागणी आमदार सुरेश धस यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना केली आहे. यासंदर्भात त्यांनी काल एक निवेदन देऊन, गुन्ह्यांची माहिती, अपहाराची रक्कम याविषयी नव्याने माहिती देण्याची मागणी केली.

****

परभणी इथं जिंतूर मार्गावर तबलिगी इज्तेमा सुरु असल्यामुळे परभणी शहर वाहतूक मार्गात तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. वाहनधारकांनी पर्यायी वळण मार्गाचा वापर करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

****

बीड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती मार्फत ‘100 दिवसांचे लक्ष्य अंतर्गत’ विद्यार्थ्यांना त्रुटी पुर्ततेसाठी तसंच तयार असलेले जात वैधता प्रमाणपत्र समिती स्तरावरून निर्गमित करण्यासाठी विशेष मोहिम आयोजित करण्यात आली आहे. या विशेष शिबीराचा जास्तीत जास्त अर्जदारांनी लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयानं केलं आहे. 

****

देशाच्या उत्तर भागात दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने रेल्वेगाड्या उशीराने धावत आहेत. दिल्लीहून सुटणाऱ्या किंवा तिथे पोहोचणाऱ्या बावीस गाड्या दोन तासांपर्यंत उशीराने धावत आहेत, अशी माहिती रेल्वे व्यवस्थापनाने दिली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 10 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...