Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 02 January 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०२ जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या गडचिरोली दौर्याबाबत समाज माध्यमावर टाकलेल्या पोस्ट वर पंतप्रधानांनी ही प्रतिक्रिया दिली. गडचिरोली जिल्ह्यातली विकासकामं, अहेरी ते गर्देवाडा बस सेवेला प्रारंभ, ११ नक्षलवाद्यांचं आत्ममसर्पण यावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदी यांनी, दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाच्या विकासामुळे जीवन सुलभतेला निश्चितच चालना मिळेल आणि आणखी प्रगती साधण्याचा मार्ग मोकळा होईल, असं नमूद केलं.
****
जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवाकर संकलन, डिसेंबर महिन्यात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत सात पूर्णांक तीन दशांश टक्क्यांची वृद्धी नोंदवून एक लाख ७६ हजार कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. डिसेंबर २०२३ मध्ये एकूण जीएसटी संकलन एक लाख ६४ हजार कोटी इतकं होतं. डिसेंबर २०२४ मध्ये केंद्रीय जीएसटी संकलन ३२ हजार ८३६ कोटी रुपये आणि राज्य जीएसटी संकलन ४० हजार ४९९ कोटी रुपये झालं. एकात्मिक जीएसटी संकलन ४७ हजार ७८३ कोटी रुपये झालं असून उपकर ११ हजार ४७१ कोटी रुपये इतका आहे.
****
देशभरात एकंदर वार्षिक भूजल पुनर्भरण १५ अब्ज घन मीटरनं वाढलं असल्याचा अहवाल, केंद्रीय जलशक्ती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल प्रकाशित केला. एकंदर वार्षिक भूजल पुनर्भरण ४४६ अब्ज घन मीटर राहिलं. त्यापैकी २४५ अब्ज घन मीटर पाण्याचा सर्व कामांसाठी वापर करण्यात आला. ईशान्य राज्यांमधल्या शंभर टक्के भूजल सिंचनासाठी सर्वोत्कृष्ट आहे. विभाग, जिल्हा आणि तालुकास्तरावरील साडेसहा हजारांहून अधिक जलनमुन्यांपैकी ७३ टक्के नमुने सुरक्षित आढळून आल्याचं अहवालात म्हटलं आहे.
****
भारतीय हवाई दलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांनी काल पदभार स्वीकारला. लढाऊ विमानाचे वैमानिक म्हणून भारतीय हवाई दलात डिसेंबर १९८६ मध्ये ते रुजू झाले होते. ३८वर्षांच्या आपल्या सेवा कारकिर्दीत, मिश्रा यांनी महत्त्वाच्या विविध पदांवर काम केलं.
****
राज्यातल्या जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार असल्याचं सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितलं. काल यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणामार्फत पुरवण्यात आलेल्या औषधांच्या नमुन्यांची त्रयस्थ पद्धतीने तपासणी करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. राज्यात शासकीय रुग्णालयांमध्ये स्वच्छता, रुग्णांना मिळणाऱ्या जेवणाचा दर्जा उत्तम असावा, आयुष्मान कार्डच्या वितरणाला गती द्यावी, कर्करोगाचं निदान आणि तातडीने उपचार मिळण्यासाठी जिल्हास्तरावर तपासणी मोहीम राबवावी, आदी सूचना आबिटकर यांनी दिल्या.
दरम्यान, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ काल आपल्या विभागाचा पदभार स्वीकारला.
****
मुंबई शहरातलं वायू प्रदूषणाचं प्रमाण पूर्ण नियंत्रणात येत नाही तोपर्यंत ई विभागातल्या बांधकाम प्रकल्पांवरचे निर्बंध कायम ठेवण्यात येणार असल्याचं, महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागानं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे. भायखळा परिसरात सुरु असलेल्या बांधकाम प्रकल्पांची पाहणी केल्यानंतर महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी हे निर्देश दिल्याचं पत्रकात म्हटलं आहे.
****
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देवगिरी प्रदेशाचं एकोणसाठावं प्रदेश अधिवेशन आजपासून लातूर इथं सुरु होत आहे. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन होईल. तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात उद्या शुक्रवारी दुपारी शहरातून शोभायात्रा काढली जाणार आहे. या अधिवेशनात सहभाग घ्यावा, असं आवाहन स्वागत समिती अध्यक्ष प्रमोद मुंदडा यांनी केलं आहे.
****
नायलॉन मांजामुळे होणारे अपघात लक्षात घेता नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शहरातल्या ७४ मांजा विक्रेत्यांवर प्रथमच हद्दपारीची कारवाई करण्यात आली. गेल्या काही दिवसात नायलॉन मांजामुळे अनेक जण जखमी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. नायलॉन मांजा बाळगणाऱ्या आणि विक्री केल्या प्रकरणी ३२ जणांविरुद्ध आत्तापर्यंत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
****
‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाअंतर्गत नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आज सामूहिक वाचन करण्यात येणार आहे. १५ जानेवारी पर्यंत राबवण्यात येणार्या या पंधरवड्यात वाचन जनजागृतीसाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
****
सांगली जिल्ह्यात विटा इथं फटाके गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीत एका महिलेचा होरपळून मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले. काल दुपारी ही घटना घडली. अग्निशम दल आणि नागरीकांच्या सामुहिक प्रयत्नामुळे ही आग आटोक्यात आणण्यात यश आलं. आगीचं कारण अद्याप कळू शकलं नाही.
****
No comments:
Post a Comment