Wednesday, 12 November 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.11.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 12 November 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १२ नोव्हेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      दिल्ली स्फोट प्रकरणाचा तपास वेगानं सुरू-मुंब्र्यात एटीएसकडून एकाला अटक

·      प्रशासकीय अधिकाऱ्यांनी राज्याची विकासगाथा पुढे नेण्याची जबाबदारी सार्थपणे सांभाळावी-मुख्यमंत्र्यांचं आवाहन

·      येत्या बालदिनी साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार प्रदान सोहळा-सुरेश सावंत यांच्या आभाळमाया या कवितासंग्रहाला गौरवण्यात येणार

·      जालना महापालिकेच्या झोपडपट्टी PR कार्ड सर्वेक्षण कामाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

आणि

·      छत्रपती संभाजीनगर मनपा शाळेच्या १० विद्यार्थ्यांची इस्रो दौऱ्यासाठी निवड

****

दिल्ली स्फोट प्रकरणाचा तपास वेगानं सुरू आहे. राष्ट्रीय तपास संस्था - एनआयए आणि सुरक्षा यंत्रणांनी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र तसंच जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामा आणि कुलगामसह अनेक ठिकाणी मोठी कारवाई केली. या छाप्यात मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली असून, श्रीनगरमधला डॉक्टर तजामुल मलिक याला ताब्यात घेण्यात आलं आहे. कुलगाममध्ये प्रतिबंधित संघटना जमात-ए-इस्लामी या संघटनेच्या ठिकाणांवर छापा टाकण्यात आला. या स्फोटात वापरण्यात आलेली कार गेल्या १० ते १२ दिवसांपासून फरिदाबादच्या अल-फलाह विद्यापीठाच्या वाहनतळावर उभी होती, असं चौकशीदरम्यान समोर आलं आहे. तपास अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे.

 

दरम्यान, या कार स्फोटाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या स्फोटात वापरण्यात आलेली कार अमित नावाच्या डीलरकडून खरेदी करण्यात आली होती, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणातली संशयित डॉ शाहीन शाहीद हिचा भाऊ परवेझ अन्सारी याच्या लखनौमधल्या घरावर उत्तप्रदेश एटीएसने कारवाई केली असून तिथून मोबाईल फोन्स सह इतर यंत्रसामुग्री जप्त केली. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक- एटीएसने मुंब्रा इथून एका संशयिताला अटक केली आहे. त्याच्या घरातून अनेक इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल उपकरणं जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या वस्तूंचा तपास केला जात असल्याचं एटीएसनं सांगितलं.

****

दरम्यान, जम्मू काश्मीर मधे सोपोर इथं पोलिसांनी जमात ए इस्लामी या दहशतवादी संघटनेशी संबंधित २५ ठिकाणांवर छापेमारी केली. यात दस्तऐवज, डिजिटल उपकरणं आणि इतर साहित्य जप्त केल्याचं पोलिसांनी सांगितलं.

****

दरम्यान, भूतान दौऱ्यावरून परतलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत दाखल होताच, विमानतळावरून थेट लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात जाऊन कार स्फोट प्रकरणातल्या जखमींची विचारपूस केली. जखमींवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशीही पंतप्रधानांनी संवाद साधत, जखमींच्या प्रकृतीचा आढावा घेतला. यानंतर आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात पंतप्रधानांनी, या प्रकरणातल्या दोषींवर कडक कारवाईचा संदेश दिला.

****

आज जागतिक न्यूमोनिया दिवस पाळला जात आहे. प्रत्येक बालकाचं न्यूमोनिया पासून रक्षण करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. बालपणातला न्यूमोनिया हा आजार हाताळण्यासाठी केंद्रसरकारनं मजबूत आरोग्य प्रणाली, जनजागृती आणि प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून प्रभावी यंत्रणा उभारल्याचं नड्डा यांनी सांगितलं.

****

आज सार्वजनिक प्रसारण सेवा दिवस आहे. १९४७ मधे फाळणीनंतर भारतात आलेल्या विस्थापितांना याच दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ऑल इंडिया रेडियोवरुन संबोधित केलं होतं. या ऐतिहासिक भाषणाची आठवण म्हणून १२ नोव्हेंबर हा दिवस सार्वजनिक प्रसारण सेवा दिन म्हणून पाळण्यात येतो.

****

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी राज्याच्या विकासगाथेला पुढे नेण्याची जबाबदारी सार्थपणे सांभाळावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आज २०२४ च्या भारतीय प्रशासकीय सेवेतील आठ परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. समाजातील शेवटच्या घटकाचं कल्याण हे ध्येय ठेवत त्यांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याची ताकद प्रशासनात असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं.

****

सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था गटात नवी मुंबई महानगरपालिकेला देशात प्रथम पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारांसाठी देशभरातून प्राप्त ७५१ प्रस्तावांतून स्वतंत्र निर्णायक मंडळानं पारदर्शक स्कोअरकार्ड पद्धतीनं विजेत्यांची निवड केली. यात स्थानिक स्वराज संस्था गटात नवी मुंबई महानगरपालिकेनं पहिला क्रमांक पटकावला.

****

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज कोल्हापूर इथं करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेऊन विधिवत कुंकुमार्चन पूजा केली. या पूजेनंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते त्यांना अंबाबाईची मूर्ती, शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रामनाथ कोविंद यांनी मंदिराच्या इतिहासाबाबत माहिती जाणून घेवून समाधान व्यक्त केलं. यावेळी पद्मश्री डॉ.विकास महात्मे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

****

आज राष्ट्रीय पक्षी दिवस साजरा होत आहे. प्रसिद्ध भारतीय पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा करण्यात येतो. या काळात बुलडाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणांवरुन विविध पक्षी दाखल होतात. पक्षी संवर्धनासाठी कार्य करणारे कलाध्यापक संजय गुरव यांनी तयार केलेल्या कृत्रिम घरट्यामध्ये हे पक्षी पहावयास मिळत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

साहित्य अकादमीचे बालसाहित्यासाठीचे पुरस्कार परवा १४ तारखेला बालदिनी नवी दिल्लीत प्रदान केले जाणार आहेत. पन्नास हजार रुपये आणि ताम्रपट असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. हिंदी भाषेसाठी सुशील शुक्ला यांच्या एक बटे बारा या पुस्तकाला तर मराठी भाषेसाठीचा पुरस्कार सुरेश सावंत यांच्या आभाळमाया या कवितासंग्रहाला जाहीर झालेला आहे.

****

आपलं सरकार लोकाभिमुख योजना राबवून विकासाला चालना देत असल्याचं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज परभणी इथं शिवसेनेच्या मेळाव्याला संबोधित करत होते. सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख करत शिंदे यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली.

दरम्यान, जालना महापालिकेच्या अंतर्गत ४२ झोपडपट्टी धारकांना देण्यात येणाऱ्या मालमत्ता पत्रक PR कार्ड सर्वेक्षण कामाचा शुभारंभ आज शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलतांना शिंदे म्हणाले

बाईट - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

****

हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर इथले सामाजिक कार्यकर्ते तथा छत्रपती शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. कृष्णराव पाटील जरोडेकर यांना यावर्षीचा संत नामदेव जीवन गौरव पुरस्कारप्रदान करण्यात आला. नांदेडच्या सचखंड गुरुद्वाराचे संत बाबा बलविंदरसिंघजी यांच्या हस्ते आज हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह नानक साई फाऊंडेशनचे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे उपस्थित होते. नांदेड इथल्या नानक - साई फाउंडेशनच्या वतीनं हा पुरस्कार दिला जातो.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका शाळेतल्या १० विद्यार्थ्यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटर ला भेट देण्यासाठी निवड झाली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून सातव्या इयत्तेत शिकणाऱ्या अकराशे विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली होती, त्यातून या १० विद्यार्थ्यांची निवड झाली. हे विद्यार्थी उद्या विमानाने केरळला रवाना होतील, या विद्यार्थ्यांची आयुक्तांनी आपल्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. अशीच परीक्षा यंदा सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्याबाबत आयुक्तांनी शिक्षण विभागाला सूचना केल्या आहेत.

****

लातूर जिल्ह्यातील एकल महिलांना शासकीय योजनांचा लाभ देवून स्वावलंबी करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विशेष मोहीम राबवली जाणार आहे. पुढील तीन महिन्यात या अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यासाठी तसंच कृती कार्यक्रम निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या सूचनेनुसार सर्व शासकीय विभाग प्रमुखांसाठी कार्यशाळांचं आयोजन करण्यात येणार आहे.

****

नगर परिषद तसंच नगर पंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तसंच पैठण इथं प्रत्येकी एक तर वैजापूर नगर परिषदेसाठी दोन उमेदवारी अर्ज प्राप्त झाले.

****

बीड जिल्हा कोषागार अंतर्गत निवृत्ती वेतन घेणारे निवृत्ती वेतन धारक तसंच कुटुंबनिवृत्तीवेतन धारक यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत हयात प्रमाणपत्र सादर करण्याचं आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी यांनी केलं आहे. जीवन प्रमाण या संकेत स्थळावर जावून ऑनलाईन पध्दतीनंही हयात प्रमाणपत्र सादर करता येईल असंही कोषागार अधिकाऱ्यांनी कळवलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं आज मेनोपॉज आणि हाडांची ठिसुळता विषयावर इंडियन मेडिकल असोसिएशनची कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत अनेक ज्येष्ठ डॉक्टरांनी सहभाग नोंदवून महिलांच्या आरोग्यविषयक जाणिवा वाढण्याचा संकल्प केल्याचं वृत्त आहे.

****

राज्यात आज जळगाव इथं सर्वात कमी ९ पूर्णांक एक अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. त्या खालोखाल गोंदिया, यवतमाळ आणि नाशिक इथं सुमारे साडे १० अंश तापमान नोंदवलं गेलं. मराठवाड्यात बीड इथं ११ पूर्णांक पाच अंश, धाराशिव १३ अंश तर छत्रपती संभाजीनगर आणि परभणी इथं १३ पूर्णांक चार अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं तापमान पुढील काही दिवसांत ८ अंश सेल्सिअसपर्यत खाली घसरण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 30 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...