Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 12 November 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ नोव्हेंबर २०२५ सकाळी ७.१० मि.
****
· दिल्ली कार स्फोट प्रकरणी सहभागी असणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा पंतप्रधानांचा
इशारा,
घटनेचा तपास एनआयकडे
· राष्ट्रीय जल पुरस्कार जाहीर-राज्य श्रेणीमध्ये महाराष्ट्राला प्रथम क्रमांक
· धाराशिव जिल्हा बँकेला ७४ कोटी रुपये भागभांडवल देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय; बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्तीसही मान्यता
· हिंगोली जिल्ह्यात जलप्रकल्पांसाठी २१४ कोटी रुपये मंजूर
आणि
· विविध महापालिकांची प्रभाग आरक्षण सोडत जाहीर, छत्रपती
संभाजीनगरमध्ये ११५ पैकी ५८ जागा महिला नगरसेवकांसाठी राखीव
****
दिल्ली कार स्फोटाच्या कटात सहभागी असणाऱ्यांविरोधात
कठोर कारवाईचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. भूतानचे चौथे राजे जिग्मे
सिंग्ये वांगचुक यांच्या ७०व्या वाढदिवसानिमित्त राजधानी थिंफू इथं झालेल्या विशेष
कार्यक्रमात ते काल बोलत होते. या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत पंतप्रधानांनी, आमच्या यंत्रणा या कारस्थानाच्या मुळापर्यंत जाऊन गुन्हेगारांना शोधून काढतील, असं सांगितलं.
बाईट- पंतप्रधान नरेंद्र मोदी
दरम्यान, भारत
आणि भूतान यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या एक हजार २० मेगावॅट क्षमतेच्या पुनात्सांग
चू जलविद्युत प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते काल
झालं.
****
दिल्ली कार स्फोट प्रकरणाचा तपास राष्ट्रीय
तपास संस्था - एनआयए कडे सोपवण्यात आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री
अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी झालेल्या उच्चस्तरीय सुरक्षा
आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकरणातला प्रत्येक आरोपी शोधून काढण्याचे
निर्देश शहा यांनी दिले.
**
या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांना कोणत्याही
परिस्थितीत शिक्षा होणारच, अशी ग्वाही संरक्षणमंत्री राजनाथसिंह
यांनी दिली. ते काल नवी दिल्लीत एका बैठकीत बोलत होते. तपास यंत्रणा या घटनेचा सखोल
तपास करत असून,
त्या तपासाचे निष्कर्ष लवकरच खुले केले जातील, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, या
प्रकरणातल्या एका संशयिताच्या वडिलांना जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा इथून चौकशीसाठी
ताब्यात घेण्यात आलं आहे.
****
सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांची घोषणा
काल करण्यात आली. विविध दहा श्रेणींसाठी दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांत राज्य श्रेणीमध्ये
महाराष्ट्राला प्रथम क्रमांक जाहीर झाला आहे. जल शक्ति मंत्री सी.आर.पाटील यांनी ही
माहिती दिली. येत्या अठरा तारखेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार
प्रदान केले जाणार आहेत.
****
नाशिक,
नागपूर, धाराशिव जिल्हा बँकांना ८२७ कोटी रुपये
भागभांडवल देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. यात नाशिक जिल्हा बँकेला
६७२ कोटी,
नागपूर जिल्हा बँकेला ८१ आणि धाराशिव जिल्हा बँकेला ७४ कोटी
रुपये देण्यात येणार आहेत. धाराशिव जिल्हा बँकेची स्थिती सातत्याने खालावत असल्याने
या बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्यासाठी सहकार आयुक्तांना निर्देश
देण्यासही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
राज्यातल्या न्यायालयांचा परिसर तसंच न्यायाधीश
निवासस्थानांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त आठ हजार २८२ सुरक्षा रक्षक नियुक्तीला, तसंच पाचव्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या अहवालातील शिफारशींचा कालावधी आणखी एक
वर्षासाठी वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
हिंगोली तालुक्यातला डिग्रस साठवण तलाव प्रकल्प
आणि त्यासाठीच्या ९० कोटी ६१ लाख रुपयांच्या तरतुदीस मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या
प्रकल्पातून हिंगोली तालुक्यातल्या डिग्रस, लोहगाव
आणि दाटेगांव या गावातली ६०३ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. हिंगोली जिल्ह्याच्या
सेनगांव तालुक्यातल्या सुकळी साठवण प्रकल्पासाठी १२४ कोटी ३६ लाख रुपयांची तरतूद करण्यासही
मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
****
लोक सेवा प्रसारण दिवस आज साजरा होत आहे.
१२ नोव्हेंबर १९४७ या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आकाशवाणीवरुन केलेल्या
ऐतिहासिक संबोधनाचं स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
****
छत्तीसगढ-महाराष्ट्र सीमेवरच्या बस्तर, बिजापूर आणि गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या जंगलात काल सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांच्या
चकमकीत सहा नक्षलवादी ठार झाले. जिल्हा राखीव सुरक्षा रक्षक, कोब्रा कमांडो आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत
राज्य कृषी विभागाच्या नवीन बोधचिन्हाचं तसंच 'शाश्वत
शेती - समृद्ध शेतकरी' या नवीन घोषवाक्याचं अनावरण केलं. उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे,
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यावेळी
उपस्थित होते. बोधचिन्ह स्पर्धेचे विजेते भुसावळचे वीरेंद्र पाटील आणि घोषवाक्य स्पर्धेतल्या
विजेत्या परभणीच्या सिद्धी देसाई, यांचा यावेळी सत्कार करण्यात
आला.
****
राज्यातल्या अनेक महानगरपालिका निवडणुकीसाठीची
आरक्षण सोडत काल काढण्यात आली. छत्रपती संभाजीनगर महापालिकेतल्या ११५ नगरसेवकांपैकी
५८ जागा महिलांसाठी राखीव तर इतर मागास प्रवर्गासाठी ३१, अनुसूचित
जातीसाठी २२ आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी २ जागा आरक्षित झाल्याची घोषणा मनपा आयुक्त
तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी केली...
बाईट- मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत,छत्रपती
संभाजीनगर
**
परभणी महानगरपालिकेतल्या १६ प्रभागांसाठी
अनुसूचित जाती,
अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि
सर्वसाधारण- महिला तसंच सर्वसाधारण प्रवर्गांचं आरक्षण काल जाहीर झालं.
लातूर महानगरपालिकेच्या एकूण ६९
जागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आलं. यातील ३५ जागा महिलांसाठी
आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.
जालना इथं महापालिका आयुक्त आशिमा मित्तल
यांच्या अध्यक्षतेखाली १६ प्रभागातल्या एकूण ६५ नगरसेवक पदांसाठी आरक्षण निश्चित करण्यात
आलं.
दरम्यान, आगामी
निवडणूक काळात जालना जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक
कारवाईचा भाग म्हणून, अकरा जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात
आलं. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली.
**
नांदेड महापालिकेच्या आरक्षण सोडतीनुसार, एकूण ८१ नगरसेवकापैकी ४१ महिला नगरसेवक राहतील. महापालिका आयुक्त डॉक्टर महेशकुमार
डोईफोडे यांनी आरक्षण सोडतीबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले...
बाईट- महापालिका आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोईफोडे,नांदेड
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या
पदवी अभ्यासक्रमाची परीक्षा कालपासून सुरू झाली. यासाठी विद्यापीठाने ३३ भरारी पथकांची
नियुक्त केली आहे. तीन लाख ५५ हजार विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या
पदवी परीक्षाही कालपासून सुरू झाल्या. सुमारे एक लाख वीस हजार विद्यार्थी विविध शाखांच्या
परीक्षेत सहभागी झाले आहेत.
****
बीड जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षक
आणि परिवेक्षीय यंत्रणेची तालुकास्तरीय ‘विनोबा भावे ॲप’ कार्यशाळा काल बीड इथं पार
पडली. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी ॲपचा प्रभावी वापर करावा, अशी सूचना बीडच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी
यावेळी केली.
****
जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातल्या सुखापुरी
मंडळात बिबट्याचा वावर आढळून आला आहे. या भागातल्या शेतकरी आणि ऊसतोड मजुरांना सावधगिरी
बाळगावी तसंच बिबट्या दिसल्यास तात्काळ वनविभागाला कळवण्याचं आवाहन प्रशासनानं केलं
आहे.
****
दृष्टीबाधित महिलांच्या पहिल्या टी- ट्वेंटी
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला कालपासून नवी दिल्लीत सुरुवात झाली. काल पहिल्या सामन्यात
भारताने श्रीलंकेचा १० खेळाडू राखून पराभव केला.
****
राज्यात काल जळगाव इथं सर्वात कमी ९ पूर्णांक
पाच अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. नाशिक इथं १० पूर्णांक सात अंश, बीड - ११ पूर्णांक चार, छत्रपती संभाजीनगर - १२ पूर्णांक
चार,
तर परभणीत १३ पूर्णांक पाच अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
दरम्यान, येत्या
दोन दिवसात राज्यात सर्व ठिकाणी हवामान कोरडं राहील, मात्र
कोकणात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता हवामान विभागानं
व्यक्त केली आहे.
****
No comments:
Post a Comment