Wednesday, 12 November 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 12.11.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 12 November 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १२ नोव्हेंबर २०२ सकाळी .०० वाजता

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बोत्सवानामध्ये दाखल झाल्या आहेत. अध्यक्ष डुमा बोको यांनी विमानतळावर राष्ट्रपतींचं स्वागत केलं. आज राष्ट्रपती गॅबरोन इथं बोत्सवानाचे अध्यक्ष बोको यांच्याशी महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. या बैठकीत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, ऊर्जा, कृषी, आरोग्य, औषधनिर्माण, संरक्षण आणि नागरिकांमधील संबंध बळकट करण्यावर चर्चा होणार आहे. तसंच अनेक महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती बोत्सवानातील संसद सदस्यांना संबोधित करतील, भारतीय समुदायाशी संवाद साधतील आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देतील.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भूतान दौऱ्याच्या दुसऱ्या आणि अंतिम दिवशी थिंफू इथल्या चांगलिमेथांग स्टेडियममध्ये आयोजित कालचक्र अभिषेक सोहळ्यात सहभाग घेतला. तसंच त्यांनी भूतानचे चौथे राजा जिग्मे सिंग्ये वांगचुक यांची भेट घेतली आणि भारत-भूतान संबंध अधिक दृढ करण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं. दोन्ही नेत्यांनी ऊर्जा, व्यापार, तंत्रज्ञान आणि संपर्क क्षेत्रातल्या सहकार्यावर चर्चा केली, तसंच ॲक्ट ईस्ट धोरणांतर्गत गिलेफू माइंडफुलनेस सिटी प्रकल्पातील प्रगतीचंही कौतुक केलं.

****

लोक सेवा प्रसारण दिवस आज साजरा होत आहे. १२ नोव्हेंबर १९४७ या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आकाशवाणीवरुन केलेल्या ऐतिहासिक संबोधनाचं स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो.

****

दिल्ली कार स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या नागरीकांच्या कुटुंबियांना दिल्ली सरकारने प्रत्येकी दहा लाख रुपये, ते गंभीर जखमींना दोन लाख रुपये मदत जाहिर केली आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली. 

****

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसर्या आणि शेवटच्या टप्प्यात काल ६६ पूर्णांक ९१ शतांश टक्के मतदानाची नोंद झाली. या टप्प्यात एक हजार ३०२ उमेदवारांचं राजकीय भविष्य मतपेटीत बंद झालं. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची मोजणी परवा १४ तारखेला होणार आहे.

****

देशातली आरोग्यसेवा परवडणारी करणं सरकारचं प्राधान्य असल्याचं, वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीतील सीआयआय च्या २२ व्या वार्षिक आरोग्य शिखर परिषदेत ते बोलत होते. त्यांनी आरोग्य आणि जीवनविम्यावरचा जीएसटी १८ टक्क्यांवरून शून्य टक्क्यांवर आणल्याने नागरिकांना दिलासा मिळाल्याचे सांगितलं.

****

धाराशिव जिल्हा सहकारी बँकेला नवसंजीवनी देण्यासतठी राज्य सरकारने ७४ कोटी रुपयांचं अर्थसहाय्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याबद्दल आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले. ऑक्टोबर महिन्यात आपण स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे बँकेला अतिवृष्टी आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर तातडीने आर्थिक मदत करावी, अशी पत्राद्वारे मागणी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने बँकेला अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली.

****

दिव्यांगांना सक्षम बनवण्यासाठी लातूर जिल्हा प्रशासन कटीबद्ध असल्याचं प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी केलं आहे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्यातर्फे संयुक्तपणे आयोजित, दिव्यांगांप्रती जाणीव जागृती, या कार्यशाळेत त्या काल बोलत होत्या. प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी दिव्यांगांसाठी संवेदनशीलतेनं काम करून आपली जबाबदारी पार पाडावी, तसंच दिव्यांगांसाठीच्या आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचनाही त्यांनी यावेळी दिली. लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्यासह प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्य़ा कालच्या दुसऱ्या दिवशी वैजापूर नगरपरिषदेत एक उमेदवारी अर्ज दाखल झाला. जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली. 

****

गोव्यात सुरू असलेल्या फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या चौथ्या फेरीतल्या पहिल्या सामन्यात सर्व भारतीय खेळाडूंनी आपापले सामने बरोबरीत संपवले. आर. प्रज्ञानंदा, अर्जुन एरिगैसी, पी. हरिकृष्णा, आणि कार्तिक वेंकटरमणन यांचा यामध्ये समावेश आहे. 

****

आयएसएसफ जागतिक नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात भारताच्या ऐश्वर्य प्रतापसिंह तोमर यानं रौप्य पदक जिंकलं. हे त्याचं पहिलंच जागतिक स्पर्धेचं पदक आहे. १० मीटर एयर पिस्तुल मिश्र सांघिक प्रकारात सम्राट राणा आणि इशा सिंग यांनीही रौप्य पदक जिंकलं. या स्पर्धेत भारत पदक तालिकेत तीन सुवर्ण, पाच रौप्य आणि तीन कांस्य पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

****

दृष्टीबाधित महिलांच्या पहिल्या टी- ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला कालपासून नवी दिल्लीत सुरुवात झाली. काल पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा १० खेळाडू राखून पराभव केला. श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करत, १४ व्या षटकांत सर्वबाद ४१ धावा केल्या, भारतीय संघानं एकही फलंदाज न गमावता तीन षटकांत हे लक्ष्य साध्य केलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.05.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 May 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपत...