Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 13 November 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
दिल्ली कार स्फोटप्रकरणी एनआयकडून विविध ठिकाणी छापे, देशवासियांच्या
रक्षणाप्रती सरकारच्या दृढ संकल्पाचा केंद्रीय मंत्रिमंडळाकडून पुनरुच्चार
·
रत्ने आणि आभूषणे क्षेत्रासाठी राज्य शासनाचं नवीन धोरण
जाहीर
·
जालना महापालिकेच्या झोपडपट्टी PR कार्ड सर्वेक्षण
कामाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ
·
साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार प्रदान सोहळा उद्या
- नांदेडच्या सुरेश सावंत यांना आभाळमाया कवितासंग्रहासाठी पुरस्कार
आणि
·
छत्रपती संभाजीनगर मनपा शाळेच्या १० विद्यार्थ्यांची इस्रो
दौऱ्यासाठी निवड
****
दिल्ली
स्फोट प्रकरणी तपास यंत्रणांनी काल देशभरात अनेक ठिकाणी छापेमारी केली. राष्ट्रीय तपास
संस्था - एनआयए आणि सुरक्षा यंत्रणांनी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र तसंच जम्मू-काश्मीरमधल्या
पुलवामा आणि कुलगामसह अनेक ठिकाणी टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त
केली असून, श्रीनगरमधून डॉक्टर तजामुल मलिक याला ताब्यात घेतलं आहे.
काल फरीदाबाद
इथूनही पोलिसांनी एक कार जप्त केली. दिल्ली स्फोट प्रकरणातल्या मुख्य संशयिताशी या
गाडीचा संबंध असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
दरम्यान, दिल्ली स्फोटात
वापरण्यात आलेली कार गेल्या १० ते १२ दिवसांपासून फरिदाबादच्या अल-फलाह विद्यापीठाच्या
वाहनतळावर उभी होती, असं चौकशीदरम्यान समोर आलं आहे. तपास अधिकाऱ्यांनी
या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. या स्फोटाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.
ही कार अमित नावाच्या डीलरकडून खरेदी करण्यात आली होती, त्याला
पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणातली संशयित डॉ शाहीन शाहीद हिचा भाऊ परवेझ
अन्सारी याच्या लखनौमधल्या घरावर उत्तर प्रदेश एटीएसने कारवाई केली असून, तिथून मोबाईल फोन्स सह इतर यंत्रसामुग्री जप्त केली.
महाराष्ट्र
दहशतवादविरोधी पथकानं मुंब्रा इथून एका संशयिताला अटक केली. त्याच्या घरातून अनेक इलेक्ट्रॉनिक
आणि डिजिटल उपकरणं जप्त करण्यात आली.
**
दरम्यान, जम्मू काश्मीर
मधल्या कुलगाम आणि सोपोर इथं पोलिसांनी जमात- ए - इस्लामी या दहशतवादी संघटनेशी संबंधित
२५ ठिकाणांवर छापेमारी केली. यात दस्तऐवज, डिजिटल उपकरणं आणि
इतर साहित्य जप्त केल्याचं पोलिसांनी सांगितलं.
****
भूतान दौऱ्यावरून
परतलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिल्लीत दाखल होताच, विमानतळावरून
थेट लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात जाऊन कार स्फोट प्रकरणातल्या जखमींची विचारपूस
केली. यानंतर आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात पंतप्रधानांनी, या प्रकरणातल्या दोषींवर कडक कारवाईचा संदेश दिला.
****
काल केंद्रीय
मंत्रिमंडळाच्या बैठकीत या स्फोटाची तीव्र शब्दांत निंदा करण्यात आली. मंत्रिमंडळाने
दोन मिनिटं मौन पाळून, या घटनेतल्या मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. राष्ट्रीय सुरक्षेप्रती
सरकारची वचनबद्धता, तसंच देशवासियांच्या रक्षणाप्रती सरकारच्या
दृढ संकल्पाचा मंत्रिमंडळाने पुनरुच्चार केला. केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी
वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले..
बाईट - माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव
****
रत्ने आणि
आभूषणे क्षेत्रासाठी राज्य शासनानं नवीन धोरण जाहीर केलं आहे. मंत्रिमंडळानं मंजूर
केलेल्या या धोरणाचा शासननिर्णय काल जारी झाला. या क्षेत्रात पुढच्या पाच वर्षांच्या
कालावधीत एक लाख कोटी रुपये गुंतवणूकीसह पाच लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट सरकारने
ठेवलं आहे.
****
प्रशासकीय
अधिकाऱ्यांनी राज्याच्या विकासगाथेला पुढे नेण्याची जबाबदारी सार्थपणे सांभाळावी, असं आवाहन,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. काल २०२४ च्या भारतीय प्रशासकीय
सेवेतल्या आठ परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली,
त्यावेळी ते बोलत होते. समाजातल्या शेवटच्या घटकाचं कल्याण हे ध्येय
ठेवत त्यांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याची ताकद प्रशासनात असल्याचं,
त्यांनी यावेळी नमूद केलं.
****
जागतिक
न्यूमोनिया दिवस काल पाळण्यात आला. प्रत्येक बालकाचं न्यूमोनिया पासून रक्षण करण्यासाठी
सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा
यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. बालपणातला न्यूमोनिया हा आजार हाताळण्यासाठी
केंद्र सरकारनं मजबूत आरोग्य प्रणाली, जनजागृती आणि प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून
प्रभावी यंत्रणा उभारल्याचं नड्डा यांनी सांगितलं.
****
सार्वजनिक
प्रसारण सेवा दिवस काल पाळण्यात आला. १९४७ मधे फाळणीनंतर भारतात आलेल्या विस्थापितांना
याच दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ऑल इंडिया रेडियोवरुन संबोधित केलं होतं.
या ऐतिहासिक भाषणाची आठवण म्हणून १२ नोव्हेंबर हा दिवस सार्वजनिक प्रसारण सेवा दिन
म्हणून पाळण्यात येतो. प्रसारभारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल, आकाशवाणीचे
महासंचालक राजीवकुमार जैन तसंच दूरदर्शनचे महासंचालक के सतीश नंबुदरीपाद यांनी दिल्लीत
आकाशवाणी परिसरात गांधीजींना पुष्पांजली अर्पण केली.
****
शिवसेना
आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि अधिकृत निवडणूक चिन्हासंदर्भात आता येत्या
२१ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या संदर्भातली सुनावणी येत्या
दोन डिसेंबरला होणार होती. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा
कार्यक्रम जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर सुनावणी लवकर घेण्याची विनंती उद्धव ठाकरे
आणि शरद पवार यांच्या पक्षांनी केली होती. त्यावर काल सुनावणी झाली, पुढची सुनावणी २१ जानेवारीला होणार असल्याचं, न्यायालयानं
सांगितलं.
****
आपलं सरकार
लोकाभिमुख योजना राबवून विकासाला चालना देत असल्याचं, उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल परभणी इथं शिवसेनेच्या मेळाव्याला संबोधित करत
होते. सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख करत शिंदे यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली.
दरम्यान, जालना महापालिकेच्या
अंतर्गत ४२ झोपडपट्टी धारकांना देण्यात येणाऱ्या मालमत्ता पत्रक PR कार्ड सर्वेक्षण कामाचा शुभारंभ काल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी
ते म्हणाले...
बाईट - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
****
साहित्य
अकादमीचे बाल साहित्यासाठीचे पुरस्कार उद्या १४ तारखेला बालदिनी नवी दिल्लीत प्रदान
केले जाणार आहेत. पन्नास हजार रुपये आणि ताम्रपट असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. हिंदी
भाषेसाठी सुशील शुक्ला यांच्या एक बटे बारा या पुस्तकाला तर मराठी भाषेसाठीचा पुरस्कार
सुरेश सावंत यांच्या आभाळमाया या कवितासंग्रहाला जाहीर झाला आहे.
****
हिंगोली
जिल्ह्यात आखाडा बाळापूर इथले सामाजिक कार्यकर्ते तथा छत्रपती शाहू शिक्षण संस्थेचे
अध्यक्ष डॉ. कृष्णराव पाटील जरोडेकर यांना यावर्षीचा 'संत नामदेव
जीवन गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला. नांदेडच्या सचखंड गुरुद्वाराचे
संत बाबा बलविंदरसिंघजी यांच्या हस्ते जरोडेकर यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
नांदेड इथल्या नानक - साई फाउंडेशनच्या वतीनं हा पुरस्कार दिला जातो.
****
छत्रपती
संभाजीनगर महानगरपालिका शाळेतल्या १० विद्यार्थ्यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या
विक्रम साराभाई स्पेस सेंटर ला भेट देण्यासाठी निवड झाली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक
जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून सातव्या इयत्तेत शिकणाऱ्या अकराशे विद्यार्थ्यांची
परीक्षा घेण्यात आली होती, त्यातून या १० विद्यार्थ्यांची निवड झाली. हे विद्यार्थी आज विमानाने
केरळला रवाना होतील, या विद्यार्थ्यांची आयुक्तांनी आपल्या निवासस्थानी
भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. अशीच परीक्षा यंदा सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी
आयोजित करण्याबाबत आयुक्तांनी शिक्षण विभागाला सूचना केल्या आहेत.
****
नगरपरिषद
तसंच नगरपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याअंतर्गत
काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड तसंच पैठण इथं प्रत्येकी एक तर वैजापूर
नगरपरिषदेसाठी दोन उमेदवारी अर्ज प्राप्त झाले.
****
लातूरच्या
श्रीकिशन सोमाणी विद्यालयाचा इयत्ता दहावी मधला विद्यार्थी श्रेयश शेळके याची राष्ट्रीय
ज्युदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पुण्याच्या बालेवाडीत नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय
शालेय ज्युदो स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या वयोगटातून ७३ किलो वजनी गटात श्रेयशने
प्रथम क्रमांक पटकावला होता.
****
देशाचे
पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त लातूर शहरात काल
पदयात्रा काढण्यात आली. उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून
जिल्हा क्रीडा संकुल इथून पदयात्रेला प्रारंभ झाला.
****
राज्यात
काल जळगाव इथं सर्वात कमी ९ पूर्णांक एक अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. त्या खालोखाल
गोंदिया, यवतमाळ आणि नाशिक इथं सुमारे साडे १० अंश तापमान नोंदवलं गेलं.
मराठवाड्यात बीड इथं ११ पूर्णांक पाच अंश, धाराशिव १३ अंश तर
छत्रपती संभाजीनगर आणि परभणी इथं १३ पूर्णांक चार अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं तापमान पुढील काही दिवसात आठ अंश सेल्सिअसपर्यत खाली
घसरण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
****
No comments:
Post a Comment