Thursday, 13 November 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.11.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 13 November 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १३ नोव्हेंबर २०२ सकाळी .०० वाजता

****

दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवणारा व्यक्ती डॉक्टर उमर उन नबी असल्याचं डीएनए चाचणीतून स्पष्ट झालं आहे. स्फोटानंतर त्याचा पाय स्टीअरिंग व्हील आणि अ‍ॅक्सिलरेटरमध्ये अडकला होता. त्याचा डीएनए नमुना त्याच्या आईशी जुळला असल्याची माहिती, दिल्ली पोलिसांनी दिली.

दरम्यानया घटनेत मृत्यु पावलेल्या लोकांप्रती दुःख व्यक्त करणारा ठराव काल केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत स्विकारण्यात आला. काही क्षण मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.

****

अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारितील वित्तीय सेवा विभागानं जनसमर्थ पोर्टलवर स्टार्टअपसाठी एकात्मिक अर्ज सुविधेचा काल आरंभ केला. स्टार्ट अप कंपन्यांना एकाच ठिकाणी सर्व, सार्वजनिक बँकांची पत पुरवठा सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशानं ही सेवा सुरू करण्यात आली आहे. या पोर्टलवरुन स्टार्ट अप्सना कर्जासाठी अर्ज दाखल करण्यासह विविध बँकांच्या व्याज दराची तुलना करता येईल तसंच त्यांच्या अर्जावरील बँक प्रक्रियेचा मागोवाही घेता येईल. या सुविधेद्वारे स्टार्ट अप्सना पत हमी योजनेअंतर्गत एकंदर २० कोटी रुपयांपर्यंत कर्जं दिली जाणार आहेत.

****

शेती हा देशाच्या संस्कृतीचा पाया असून, पाश्चिमात्य देशांच्या कितीतरी आधी भारतानं आपलं स्वदेशी बियाणं विकसित केलं होतं, असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलं आहे. वनस्पती विविधता आणि शेतकरी हक्क संरक्षण प्राधिकरणाच्या २१ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल नवी दिल्लीत बोलत होते. शेतकऱ्यांना बियाणांच्या विविध वाणांचं संवर्धन करण्यासाठी आवश्यक सुविधा उभारता याव्यात म्हणून सरकारनं १५ लाख रुपयांची तरतूद केली असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात देशातला किरकोळ महागाई दर पाव टक्क्यानं कमी झाला आहे. सांख्यिकी आणि उपक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात महागाई दरात बरीच घट झाली आहे. सलग पाचव्या महिन्यात अन्नधान्याचा महागाई दर कमी झाला असून, वस्तू आणि सेवा करातील सुधारणा हे ऑक्टोबर महिन्यात महागाई दर कमी होण्याचं प्रमुख कारण असल्याचं मंत्रालयानं नमूद केलं आहे.

****

राज्यातल्या आरोग्यसेवा अधिक प्रभावी आणि दर्जेदार करण्यासाठी विभागामार्फत रचनात्मक कामांवर भर द्यावा, तसंच नागरीकांना पुरवण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. आरोग्य विभागाच्या विविध सेवांच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. लसीकरण, कर्करोग निदान, सिकल सेल नियंत्रण, मानसिक आरोग्य, मधुमेह आणि उच्च रक्तदाब या विषयांवर यावेळी चर्चा झाली.

****

अहिल्यानगर तालुक्यात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मंगळवारी कामरंगाव इथं अज्ञात वाहनांच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाला होता. तर काल खारे कर्जुने इथं बिबट्याने पाच वर्षाच्या मुलीला उचलून नेलं. अद्यापही तिचा शोध लागला नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

दरम्यान, या  नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची परवानगी वनविभागाने दिली असून, प्रशिक्षित शार्पशूटर आणि विशेष पथकाला घटनास्थळी बोलावण्यात आलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात बिलोली तालुक्यातल्या कुंडलवाडी शहरात एस एस टी अर्थात स्थिर सर्वेक्षण पथकाने काल २१ लाख ५० हजार रोख रक्कम आणि एक बंदूक पकडली. कुंडलवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पथकाने ही कारवाई केली. बिलोली शहराकडून येणाऱ्या एका वाहनांमध्ये लोखंडी पत्र्याच्या पेटीत ही रक्कम ठेवली होती. याप्रकरणी चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

****

देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त लातूर शहरात काल पदयात्रा काढण्यात आली. उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून जिल्हा क्रीडा संकुल इथून पदयात्रेला प्रारंभ झाला. विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचा यात उत्स्फूर्त सहभाग होता.

****

ढाका इथं झालेल्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत कंपाउंड मिश्र प्रकारात भारताच्या अभिषेक वर्मा आणि दीपशिखा यांनी कझाकस्तानचा १५६-१५३ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. सुवर्ण पदकासाठी आज भारताचा सामना बांगलादेशशी होणार आहे. रिकर्व्ह प्रकाराच्या सांघिक स्पर्धेत अंशिका कुमारी आणि यशदीप भोगे परवा कोरियाविरुद्ध कांस्य पदकासाठी लढत देतील.

****

दृष्टीहीन महिलांच्या टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या विश्व करंडक स्पर्धेत काल भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाच्या संघावर २०९ धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं २९२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या संघाला मात्र २० षटकांत सर्व गडी बाद ८३ धावाच करता आल्या. भारतातर्फे कर्णधार दीपिकानं ५८ चेंडूत ९१ धावा केल्या.

****

१९ वर्षांखालील शालेय मुलामुलींच्या राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेचं उद्घाटन काल सांगली जिल्ह्यात झालं. या स्पर्धेतले विजयी खेळाडू मध्य प्रदेशात उज्जैन इथं होणाऱ्या राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 30 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...