Friday, 14 November 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.11.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 14 November 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ नोव्हेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक इथं विविध विकासकामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

·      स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्यात नऊ कोटींहून अधिक मतदार

·      बालदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन, साहित्य अकादमीचा बाल साहित्यिक पुरस्कार प्रदान सोहळा

·      पुण्यात भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू, मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर

आणि

·      आजपासून कोलकाता इथं भारत-दक्षिण आफ्रिका पहिला कसोटी क्रिकेट सामना

****

येत्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने होणाऱ्या नाशिक शहरातल्या सुमारे सहा हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचं भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल झालं. सिंहस्थ कुंभमेळ्याची कामं दर्जेदार आणि पारदर्शक पद्धतीने करून नाशिकला सुंदर आणि आधुनिक शहर करणार, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र तसंच राज्य सरकारकडून २० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक विकासकामं केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून ९९ कोटी १४ लाख रुपये खर्चातून रामकुंड परिसरात साकारण्यात येणाऱ्या रामकाल पथाचं फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झालं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे तसंच अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलतांना, यंदाचा कुंभमेळा हा त्रिखंडी कुंभमेळा असल्याचं सांगत, विकास कामांची तसंच सुविधांची गुणवत्ता उत्तम असण्याबाबतचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले...

बाईट - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

****

महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एकूण नऊ कोटी ८४ लाख ९६ हजार ६२६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने अद्ययावत यादी आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली. यापूर्वीच्या म्हणजे राज्य विधानसभा निवडणुकीनंतर मतदार संख्येत सुमारे १४ लाख ७० हजार मतदारांची भर पडली आहे. सर्वात जास्त नवीन मतदार ठाणे जिल्ह्यात २ लाख ७१ हजार ६६६ इतके नोंदले गेले आहे.

दरम्यान, प्रारूप मतदार यादीवर येत्या २० ते २७ नोव्हेंबर दरम्यान आक्षेप आणि हरकती नोंदवता येणार असून, १२ डिसेंबर रोजी केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

****

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारांचे अर्ज प्रत्यक्षात स्वीकारावेत, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. याबाबत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याशी याबाबत चर्चा केल्याचं पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. उमेदवारांचा ऑनलाईन अर्ज हा २० पानी असून, त्यात गेल्या निवडणुकीत किती मतं मिळाली, किती खर्च केला, अशी माहिती मागितली आहे. हा अर्ज भरण्याची प्रक्रिया किचकट असून, हे अर्ज ऑनलाइन भरतांना अडचणी उभ्या राहत असल्याचं, वडेट्टीवार यांनी सांगितलं.

दरम्यान, या संकेतस्थळावर फक्त नामनिर्देशनपत्र तसंच शपथपत्रातली माहिती भरणंच आवश्यक आहे. त्यासोबत कोणतीही कागदपत्रं अपलोड करण्याची आवश्यकता नाही, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्राची छापील प्रत आवश्यक कागदपत्रांसह निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे विहित मुदतीत जमा करायची असल्याचं, आयोगानं सांगितलं.

****

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या निवडणूक चिन्हाशी साधर्म्य सांगणारं ट्रंपेट हे चिन्ह निवडणूक आयोगाने यादीतून बाद केलं आहे. या चिन्हाला मराठीत तुतारी असं नाव दिलेलं होतं. या चिन्हामुळे मतदारांचा गोंधळ होऊन आपली मतं अपक्षांना मिळाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने ही कारवाई केली.

****

दिव्यांगांचे हक्क आणि सुरक्षेचं संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी यांना अशा प्रकरणी कायदेशीर तसंच प्रतिबंधात्मक कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये या तरतुदींच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एकसमान मानक कार्यपद्धती विकसित करण्यात आल्याचं, दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी सांगितलं. याप्रकरणी दोषींना किमान सहा महिने आणि कमाल पाच वर्षे कारावास तसंच आर्थिक दंडाची तरतूद असल्याची माहिती त्यांनी दिली.

****

बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्यात मतदान झालं. मतमोजणी प्रक्रियेत निष्पक्षता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

जागतिक मधुमेह दिन आज पाळण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने यंदा मधुमेह दिनासाठी “आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मधुमेह” हे घोषवाक्य जाहीर केलं आहे. राज्यभरात विविध उपक्रमांद्वारे मधुमेहाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत गेल्या दहा महिन्यात दीड कोटींहून अधिक नागरिकांची मधुमेह तपासणी करण्यात आली, त्यापैकी २८ लाख ५५ हजार ७०९ नागरिकांवर उपचार सुरू असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. हा दिवस बालदिन म्हणूनही साजरा करण्यात येत असून, यानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

साहित्य अकादमीचे बाल साहित्यासाठीचे पुरस्कार आज नवी दिल्लीत प्रदान केले जाणार आहेत. पन्नास हजार रुपये आणि ताम्रपट असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. हिंदी भाषेसाठी सुशील शुक्ला यांच्या एक बटे बारा या पुस्तकाला तर मराठी भाषेसाठीचा पुरस्कार सुरेश सावंत यांच्या आभाळमाया या कवितासंग्रहाला जाहीर झाला आहे.

**

'महाराष्ट्र भूषण २०२४' हा पुरस्कार आज ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना प्रदान करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सुतार यांना नोएडा इथं त्यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात येणार आहे.

**

२३ जानेवारी २०२६ रोजी नवी दिल्ली इथं होणाऱ्या सर्व भाषा कवी संमेलनासाठी मराठी भाषेतून नामवंत कवी दासू वैद्य यांची निवड झाली आहे. राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक असलेलं सर्व भाषा कवी संमेलन दरवर्षी आकाशवाणीकडून आयोजित करण्यात येतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठी विभाग प्रमुख असलेले दासू वैद्य यांचे तूर्तास, तत्पूर्वी आणि तथापि हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत.

****

पुण्यात काल एका भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. पुणे - बंगळुरू महामार्गावर नवले पूल परिसरात कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्यानं त्याने १० ते १५ वाहनांना धडक दिली, कंटेनरच्या डिझेल टँकरला आग लागल्याने आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाल्यानं, महामार्गावरची वाहतुक काही काळ ठप्प झाली होती.

या अपघाताबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केलं असून, अपघातातल्या मृतांच्या वारसांना पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे.

****

नांदेड जिल्ह्यात सहस्त्रकुंड धबधबा परिसरात काल दुपारी पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या सात जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश आलं. उमरखेड तालुक्यातल्या एकांबा इथल्या ४ महिला आणि ३ मुलं या प्रवाहात अडकले होते. स्‍थानिक शोध आणि बचाव पथक तसंच परिसरातल्या तरुणांच्या मदतीने त्यांना वाचवण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

नगर परिषद तसंच नगर पंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड इथं सहा, पैठण इथं ११ तर वैजापूर नगर परिषदेसाठी १७ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले. या तिन्ही ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत आजपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका सामना होणार आहे. कोलकाता इथं सकाळी साडेनऊ वाजता सामन्याला सुरुवात होईल. डब्ल्यूटीसी गुणतालिकेत भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर आहे. दुखापतीतून सावरलेला ऋषभ पंत या सामन्यात खेळणार आहे.

****

ढाका इथं झालेल्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताने काल दोन सुवर्ण आणि एका रौप्य पदकाची कमाई केली. महिलांच्या कंपाऊंड सांघिक प्रकारात ज्योती सुरेखा वेण्णम, प्रितिका प्रदीप आणि दीपशिखा यांच्या संघानं कोरिया संघाचा पराभव करत सुवर्ण पदक पटकावलं.

****

राज्यात काल जळगाव इथं सर्वात कमी ९ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. त्या खालोखाल नाशिक इथं सुमारे साडे १० अंश तापमान नोंदवलं गेलं. मराठवाड्यात बीड इथं ११ पूर्णांक पाच अंश, धाराशिव तसंच परभणी इथं १३ अंश तर छत्रपती संभाजीनगर इथं १२ पूर्णांक आठ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

****

No comments:

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 29 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...