Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 March 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ मार्च २०१७ दुपारी १.००वा.
*****
उत्तर प्रदेश विधानसभेच्या सातव्या
फेरीच्या मतदानासाठीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज वाराणसी आणि जौनपूरमध्ये
सभेला संबोधित
करणार आहेत. तर मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि
काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी हे एक संयुक्त रोड शो तर बसपा प्रमुख मायावती यांची
वाराणसीमध्ये प्रचारसभा घेणार आहेत.
दरम्यान, उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या फेरीचं
मतदान आज सुरु आहे.
****
उत्तर प्रदेश आणि मणिपूरमधील
शेवटच्या फेरीचं मतदान
पार पडल्यानंतर नऊ मार्च रोजी सायंकाळी साडे पाच वाजेपासून निवडणूक निकालाचे अंदाज प्रसारित
करता येऊ शकतील, असं
निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. मात्र, उत्तर प्रदेशातल्या आलापूर
आणि उत्तरखंडमधल्या कर्णप्रयागमध्ये
मान्यताप्राप्त पक्षाच्या उमेदवाराचं निधन झाल्यामुळे तीथली निवडणूक नऊ मार्चपर्यंत पुढे
ढकलल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
****
नाशिकच्या देवळाली कॅम्प मधल्या लष्करी
जवानाच्या आत्महत्येप्रकरणी लष्करातील वरीष्ठ अधिकारी आणि गृह खात्यामार्फत चौकशी करण्यात
येईल, अशी माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली आहे. नाशिक
इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. देवळाली कॅम्प इथल्या लष्कराच्या तोफखाना विभागात काम
करणाऱ्या डी एस राव मॅथ्यूज या जवानानं गुरुवारी गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान, लष्कर भरती पेपर फुटल्याप्रकरणीही
चौकशी करण्यात येणार असून, लष्कराच्या परीक्षा पद्धतीत सुधारणा करणार असल्याचं भामरे
यांनी यावेळी सांगितलं.
****
कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे होणाऱ्या
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल सर्वोच्च न्यायालयानं तीव्र चिंता व्यक्त करत या आत्महत्या
रोखण्यासाठीच्या सरकारी प्रयत्नांची दिशा योग्य नसल्याचं मत नोंदवलं आहे. शेतकऱ्यांनी
आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना मदत देणं हा उपाय नाही, तर त्यांच्यावर
आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये, अशी परिस्थिती निर्माण करायला हवी, असं मत न्यायालयानं
व्यक्त केलं.
****
बेनामी मालमत्ता बाळगल्यास सात वर्षांपर्यंत
कठोर शिक्षा होऊ शकते, असा इशारा आयकर विभागानं दिला आहे. बेनामी मालमत्ता कायद्याचं
उल्लंघन करणाऱ्यांना आयकर विभागाच्या विविध कलमांखाली दोषी ठरवण्यात येईल, तसंच बेनामी
संपत्तीवर चालू बाजार मूल्याच्या २५ टक्के दंड भरावा लागणार असल्याचं विभागानं सांगितलं
आहे.
****
देशात शाळांमधील मुलांच्या गळतीचं
प्रमाण कमी होत असलं तरी हे प्रमाण अजूनही लाखोंमध्ये असल्याचं केंद्रीय मनुष्यबळ मंत्री
प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. ते काल चेन्नई इथं दक्षिण
आशियायी साक्षरता शिखर परिषदेत बोलत होते. स्वातंत्र्याच्या वेळी देशामध्ये साक्षरतेचं प्रमाण
हे केवळ १७ टक्के होतं ते आज वाढून ७५ टक्क्यांपर्यंत पोहचलं असल्याचंही
जावडेकर यांनी यावेळी नमूद केलं.
****
औरंगाबाद इथं मराठवाडा आमदार गोलमेज
परिषदेचं उद्घाटन आज विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते झालं. आंतरराष्ट्रीय
स्तरावर महिला आणि बालकांच्या विकासासाठी काम करणारी युनिसेफ ही
संस्था तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठातील जनसंवाद आणि वृत्तपत्रविद्या विभागाच्या वतीनं या परिषदेचं आयोजन करण्यात
आलं आहे. यात स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत मराठवाड्यातल्या शौचालय बांधणी विषयी चर्चा
करण्यात आली. आमदार अतुल सावे, सतिश चव्हाण, संजय शिरसाट, इम्तियाज जलील, सुभाष झांबड,
विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. बी ए चोपडे या परिषदेस उपस्थित आहेत. यात सर्वांसाठी आरोग्य
आणि सर्वांसाठी शिक्षण यासह विविध विषयांवर चर्चा होणार आहे.
****
दक्षिण मध्य रेल्वेनं काही महत्वाच्या
रेल्वे गाड्यात तात्पुरत्या स्वरुपात तर काही गाड्यात कायम स्वरुपात डबे वाढवण्याचा
निर्णय घेतला आहे. तपोवन एक्स्प्रेसमध्ये एक वातानुकुलीत डब्बा, नांदेड बिकानेर आणि
नांदेड-पनवेल या साप्ताहिक गाडीत एक द्वितीय
श्रेणी शयन यान, तिरुपती-आदिलाबाद साप्ताहिक गाडी आणि आदिलाबाद-नांदेड जलद रेल्वे गाडीत
चार द्वितीय श्रेणी शयन यान, तर काचीगुडा-अकोला इंटरसिटी रेल्वे गाडीत दोन द्वितीयश्रेणी
आसन यान डब्बे मे महिन्याच्या अखेरपर्यंत वाढवले आहेत. तिरूपती-शिर्डी-साईनगर रेल्वेगाडीत
एक तृतीयश्रेणी वातानुकुलीत डबा कायमस्वरूपी वाढवला असल्याचं दक्षिण मध्ये रेल्वेनं
कळवलं आहे.
****
चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर
- सी एम आय ए आणि मराठवाडा ऑटो क्लस्टर यांच्या वतीनं औरंगाबाद इथं मराठवाडा
इंडस्ट्रीयल इलेक्ट्रीकल फेअर चं आयोजन करण्यात आलं आहे. ९ ते ११ मार्च असे तीन दिवस,
वाळुज परिसरात मराठवाडा ऑटो क्लस्टर इथं हे प्रदर्शन भरवलं जाणार आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी
विद्युत उपकरण पुरवणाऱ्या विविध कंपन्या या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.
//*******//
No comments:
Post a Comment