Wednesday, 22 March 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 22.03.2017 5.25pm


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 22 March 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ मार्च २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

राज्यभरातल्या शासकीय रुग्णालयातले रजेवर गेलेले निवासी डॉक्टर्स आज रात्री आठ वाजेपर्यंत रुजू न झाल्यास, त्यांचं सहा महिन्यांचं वेतन कापून घेण्यात येईल, असा इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे. आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना महाजन यांनी निवासी डॉक्टरांना या महिनाअखेरपर्यंत पूर्ण सुरक्षा पुरवली जाईल, मात्र त्यांनी रजेवर राहण्याचा पवित्रा घेऊन, गोरगरीब रुग्णांना आरोग्य सेवांपासून वंचित ठेऊ नये, असं म्हटलं आहे. या संपामुळे राज्यभरातल्या १७ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयातली आरोग्य सेवा प्रभावित झाली आहे. नागपूर इथल्या ३७०, पुण्यातल्या २०० तर सोलापुरातल्या ११४ निवासी डॉक्टरांना संबंधित रुग्णालयांच्या अधिष्ठांतांनी निलंबित केलं आहे. औरंगाबाद इथल्या २०४ निवासी डॉक्टरांना आज रात्री आठवाजेपर्यंत कामावर हजर होण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
दरम्यान, सामूहिक रजा आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांबाबत याचिकेवरची मुंबई उच्च न्यायालयातली सुनावणी उद्यापर्यंत तहकूब झाली आहे.

****

राज्यसरकारनं विरोधी पक्षाच्या सर्व आमदारांना निलंबित केलं तरी, आपण शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा लावून धरू, असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी म्हटलं आहे. अर्थसंकल्प सादरीकरणावेळी गदारोळ करणाऱ्या १९ आमदारांना येत्या ३१ डिसेंबरपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे, या संदर्भात प्रतिक्रिया देताना, विखे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
दरम्यान, निलंबनाची ही कारवाई योग्यच असल्याचं, विधीमंडळ कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी  सरकारनं विविध लेखाशीर्षांतर्गत सुमारे २९ हजार कोटी रूपये तरतूद केली असून, शेतमालाचे बाजार भरवणं, शेतमालाला भाव देणं आदी उपायांना सरकार प्राधान्य देत असल्याचं सांगितलं.

****

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तालुकानिहाय आराखड्यानुसार निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात नितेश राणे आणि वैभव नाईक यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात मुंडे यांनी, या योजनेविषयी सदस्यांनी लेखी किंवा तोंडी सूचना केल्यास सकारात्मक विचाराचं आश्वासन दिलं.

****

बीड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत असतानाही अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाची गंभीर दखल घेत, बंडखोरांवर कठोर कारवाईचे संकेत, माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांनी आज दिल. पक्षविरोधी कारवाया कदापीही सहन केल्या जाणार नाही, असंही  अजित पवार यांनी नमूद केलं.

****

लातूर, परभणी आणि चंद्रपूर हापालिका तसंच सांगली-मीरज-कुपवाड, जळगाव आणि कल्याण-डोंबिवली महापालिकांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केला. या सर्व ठिकाणी १९ एप्रिल रोजी मतदान होणार असून, २१ एप्रिलला मतमोजणीनंतर निकाल जाहीर होणार आहे. इच्छुक उमेदवारांना २७ मार्चपासून तीन एप्रिलपर्यंत उमेदवारी र्ज भरता येणार असून, सात एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.

****

राज्य शासनाचे ‘आदिवासी समाजसेवक’ पुरस्कार आज जाहीर झाले. पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये औरंगाबादचे सुखदेव नवले, कळमनुरीचे भगवान देशमुख, राजूरचे बापुराव साळवे यांचा समावेश आहे. 25 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 27 मार्चला नाशिक इथं समारंभपूर्वक हे पुरस्कार वितरीत करण्यात येतील.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, अर्थात सीबीएसईनं, इयत्ता सहावी ते नववी पर्यंतच्या परीक्षांसाठी नवा आराखडा जारी केला आहे. नव्या आराखड्यानुसार आता वर्षातून दोन परीक्षा होतील आणि त्यांचं मूल्यांकन नव्वद टक्के लेखी रीक्षांवर आधारित असेल.

****

औरंगाबाद इथं शंकरराव कोप्पलकर स्मृती व्याख्यानमालेला येत्या २५ तारखेपासून प्रारंभ होत आहे. शहरातल्या यशोमंगल सभागृहात आयोजित या दोन दिवसीय व्याख्यानमालेचं हे सातवं वर्ष आहे. यंदा या व्याख्यानमालेत डॉक्टर प्रभाकरराव देव, डॉ दुलारी कुरेशी, डॉक्टर सुचेता कोंडबत्तूनवार आणि प्राध्यापिका चंद्रज्योति भंडारी मुळे, या मान्यवरांची विविध विषयांवर व्याख्यानं होणार आहेत.

****

No comments: