Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 30 March 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० मार्च २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
संसदेनं वित्त विधेयक २०१७ ला आज
मंजूरी दिली. काल राज्यसभेनं या विधेयकात, करदात्यांना अधिक अधिकार तसंच उद्योग क्षेत्राकडून
राजकीय पक्षांना दिल्या जाणाऱ्या देणग्यांवर नियंत्रण या दोन्ही तरतुदी रोखण्यासंबंधीच्या
या सुधारणा सुचवून विधेयक लोकसभेकडे परत पाठवलं, या सुधारणा फेटाळून लावत, लोकसभेनं
विधेयक मूळ स्वरूपात मंजूर केलं. २०१७ -१८ च्या अर्थसंकल्पाची प्रक्रिया यामुळे पूर्ण
झाली आहे.
****
सरकारनं उडान योजनेअंतर्गत प्रादेशिक
विमानसेवेच्या पहिल्या टप्प्याची आज घोषणा केली. यामध्ये एक तास अंतराच्या ४५ नवीन
विमान मार्गावर अडीच हजार रुपयात विमानप्रवास करता येणार आहे. पहिल्या निम्या जागांसाठीच
ही सवलत लागू असून, त्याव्यतिरिक्त जागांसाठी नियमित मूल्य मोजावं लागणार आहे. या योजनेत
महाराष्ट्रातल्या नांदेड-मुंबई, नांदेड-हैदराबाद, नाशिक-मुंबई, नाशिक-पुणे, कोल्हापूर-मुंबई,
जळगाव-मुंबई आणि सोलापूर-मुंबई या मार्गांचा समावेश आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज
महाराष्ट्रातल्या भाजप खासदारांची बैठक घेऊन, अर्थसंकल्प तसंच जाहीरनाम्यातली आश्वासनं
पूर्ण करण्याचे निर्देश दिले. काही खासदारांच्या कामात पंतप्रधानांनी सुधारणा सुचवत,
सरकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याची गरज व्यक्त केली. राज्यात स्वच्छता
मोहीम राबवण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
****
असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांसाठी
येत्या दोन महिन्यात व्यापक योजना तयार करणार असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी म्हटलं आहे. असंघटीत कामगारांसाठी कल्याण महामंडळ स्थापन करण्याची आवश्यकता या
विषयावर आज विधानसभेत चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. या संदर्भात कामगार
मंत्रालयाला आवश्यक निर्देश दिले जातील, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
****
शेतकरी कर्जमुक्ती तसंच सरकारी कर्मचाऱ्यांना
सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचं, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
यांनी म्हटलं आहे, सातवा वेतन आयोग लागू केल्यानं, सरकारी तिजोरीवर साडे २१ हजार कोटी
रुपयांचा भार पडणार असल्याची माहिती त्यांनी दिली. विविध योजनांचे पैसे लाभार्थींच्या
थेट बँक खात्यात जमा होत असल्यानं, अडीच हजार कोटी रुपयांची बचत होत असल्याचं, त्यांनी
सांगितलं.
****
हृदय रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यात
येणारे स्टेंट, कॅथेटर, बलून या सारख्या उपकरणांसाठी रुग्णांकडून उत्पादन किमतीपेक्षा
अधिक किंमत वसूल करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाईचा इशारा ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश
बापट यांनी आज विधान परिषदेत दिला. याप्रकरणी दोषींना सात वर्ष कारावासाच्या शिक्षेची
तरतूद असल्याचं बापट यांनी सांगितलं.
****
साखर कारखान्यांच्या सहवीज प्रकल्पांसोबत
वीज करार करण्यासंदर्भात बैठक घेऊन विचार करण्याचं आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे
यांनी दिलं. शेकापचे जयंत पाटील यांनी यासंदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात
त्यांनी यासाठी कारखान्यांनी चार रुपये प्रतियुनीट दरानं वीज खरेदीचा प्रस्ताव दिला,
तर तो मंत्रिमंडळासमोर मांडला जाईल, असं सांगितलं.
****
शाळांमध्ये वाढत्या लैंगिक शोषणाच्या घटना रोखण्यासाठी
राज्य शासनानं स्वंतत्र संकेतस्थळ सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षणमंत्री विनोद
तावडे यांनी आज विधानसभेत ही माहिती दिली. यासाठी राज्य शासनानं १०३ नंबरवर हेल्पलाईन
सुरु केली आहे, असं तावडे यांनी सांगितलं.
****
शेतकऱ्यांना पिकविमा भरपाईच्या रकमेतून बँकांनी कर्जवसुली
करण्याच्या शासनाच्या आदेशावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आक्षेप घेत, ही वसुली तत्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना पिकविम्याच्या भरापाईपोटी मिळणाऱ्या रकमेतून कर्जवसुलीची रक्कम
कापून घेण्याचे आदेश सहकार विभागानं बँकांना दिले आहेत. त्यासंदर्भातील नवीन आदेश
२२ मार्च रोजी काढण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंडे
विधान परिषदेत बोलत होते.
****
राज्यात आज अकोला इथं सर्वात जास्त ४४ अंश सेल्सिअस तापमान
नोंदवलं गेलं. मराठवाड्यात औरंगाबाद, परभणी आणि बीड इथं ४१ अंश, तर उस्मानाबाद इथं
४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
****
उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड
यांच्यावर विमान कंपन्यांनी लादलेली प्रवासबंदी उठवण्यासंदर्भात शिवसेना खासदारांनी
आज लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांची भेट घेतली. ही प्रवास बंदी उठवण्यासाठी लोकसभा
अध्यक्षांनी आपला अधिकार वापरावा, अशी विनंती पक्षाच्या वतीनं करण्यात आली.
****
No comments:
Post a Comment