Tuesday, 21 March 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 21.03.2017 5.25pm


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 21 March 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ मार्च २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

राज्यात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष तसंच उपाध्यक्ष पदाच्या निवडणुका आज पार पडल्या. मराठवाड्यात आठ जिल्ह्यांपैकी भारतीय जनता पक्षानं बीड आणि लातूर या दोन जिल्हा परिषदांवर तर शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं औरंगाबाद, जालना आणि हिंगोली या तीन जिल्हा परिषदांवर सत्ता स्थापन केली. राष्ट्रवादी काँग्रेसला परभणी आणि उस्मानाबाद या दोन तर नांदेड जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद काँग्रेस पक्षानं पटकावलं.
ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या बीड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांची सरशी झाली आहे. भाजपच्या सविता गोल्हार यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी तर शिवसंग्रामच्या जयश्री राजेंद्र मस्के यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. माजी मंत्री सुरेश धस, माजी आमदार बदामराव पंडित आणि आमदार विनायक मेटे यांनी भाजपशी युती केल्यानं, या निवडणुकीत गोल्हार यांना ३४ मतं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना २५ मतं मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या मंगल डोईफोडे या निवडणुकीत गैरहजर राहिल्या.
औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेना आणि काँग्रेस पक्षाची युती झाली असून, शिवसेनेच्या देवयानी डोणगावकर यांची अध्यक्षपदी तर काँग्रेसचे केशव तायडे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. डोणगावकर यांना ३४ तर भाजपच्या अनुराधा चव्हाण यांना २८ मतं मिळाली.
जालना जिल्हा परिषदेत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी आघाडी करत जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन केली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे अनिरुद्ध खोतकर यांची तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश टोपे यांची निवड झाली. खोतकर यांना ३४ तर भाजप उमेदवार अवधूत खडके यांना २२ तं मिळाली.
लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे मिलिंद लातुरे यांची तर उपाध्यक्षपदी भाजपचेच प्रकाश देशमुख यांची निवड झाली. उस्मानाबाद जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेताजी पाटील यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी अर्चना राणाजगजीतसिंह पाटील यांची निवड झाली आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी कॉंग्रेसच्या शांताबाई पवार तर उपाध्यक्षपदी समाधान जाधव विजयी झाले. हिंगोली जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या शिवराणी नरवडे यांची अध्यक्षपदी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल पतंगे यांची निवड झाली आहे. परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला राठोड तर उपाध्यक्षपदी भावना नखाते यांची निवड झाली आहे.
राज्यात जळगाव, गडचिरोली, सोलापूर, बुलडाणा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भाजपनं, सिंधुदूर्ग काँग्रेस, सातारा राष्ट्रवादी काँग्रेस, तर नाशिक जिल्हा परिषद अध्यक्षपद शिवसेनेनं पटकावल्याचं, आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.

****

राज्यभरात सामुहिक रजा आंदोलन करणाऱ्या निवासी डॉक्टरांनी आपापल्या रजा तत्काळ रद्द करून कामावर रुजू व्हावं, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. राज्यात धुळे, नाशिक, सायन पाठोपाठ औरंगाबाद इथं डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ राज्यातल्या सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयात काम करणारे निवासी डॉक्टर कालपासून सामुहिक रजेवर गेले आहेत. सामुहिक रजा आंदोलन हे न्यायालयानं यापूर्वी दिलेल्या आदेशाचा अवमान असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.

****

विमुद्रीकरणानंतर रद्द झालेल्या चलनी नोटा ३० डिसेंबरपर्यंत बदलून घेता न आलेल्या नागरिकांना, नोटा बदलून घेण्याची संधी देण्याची सरकारची इच्छा आहे का, असं सर्वोच्च न्यायालयानं विचारलं आहे. सरन्यायाधीश जे एस खेहर यांच्या अध्यक्षतेखालील एका पीठानं सरकारला येत्या ११ एप्रिलपर्यंत यासंदर्भात उत्तर देण्यास सांगितलं आहे. ज्या नागरिकांना वास्तविक कारणांमुळे नोटा बदलून घेता आल्या नाहीत, त्यांना अनिवासी भारतीय, तसंच सैन्य दलातल्या जवानांप्रमाणे रिजर्व्ह बँकेतून नोटा बदलून देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था का केली नाही, असंही न्यायालयानं विचारलं आहे.

****

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आज लोकसभेत शून्यप्रहरात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी केली. यासंदर्भातला प्रस्ताव राज्यसरकारने केंद्राकडे पाठवला असल्याचं त्यांनी सांगितलं. लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी या संदर्भात सर्वपक्षीय खासदारांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असं आवाहन करत, मराठीचे जाणकार असलेले काँग्रेस नेते मल्लिकाजुर्न खरगे यांचंही या प्रकरणी सहकार्य मिळेल, अशी आशाही व्यक्त केली.

****

वनीकरणाची चळवळ ही महिलांना आणि मुलांना घेऊनच पुढे नेता येणार असल्याचं मत मराठवाडा शेती सहाय्यचे विश्वस्त विजयअण्णा बोराडे यांनी व्यक्त केलं आहे. आंतरराष्ट्रीय वन दिनाच्या निमित्तानं आज औरंगाबाद इथं वन विभागाच्या वतीनं आयोजित विशेष कार्यक्रमात ‘मराठवाड्यातल्या वनशेतीद्वारे शेतकऱ्यांचा आर्थिक विकास’ या विषयावर ते बोलत होते.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 16.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 16 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...