Monday, 6 March 2017

AIR News Bulletin, Aurangabad 06.03.2017 10.00am


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

०६ मार्च २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून मुंबईत प्रारंभ होत आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अभिभाषणानं  अधिवेशनास सुरूवात होईल. त्यानंतर १८ मार्च रोजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार अर्थसंकल्प सादर करतील. या अधिवेशनात २३ प्रस्तावित तर तीन प्रलंबित विधेयकं सादर होतील. सात एप्रिलपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे.

दरम्यान, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. भाजप आणि शिवसेनेनं जनतेला फसवलं असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

****

राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प कृषिविकास आणि रोजगार निर्मितीला चालना देणारा असेल, असं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. ते नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातली सुमारे पावणे तीन कोटी जनता शेतीवर अवलंबून असल्यानं कृषि आधारित रोजगार निर्मितीला प्राधान्य देणार असल्याचं ते म्हणाले. त्याशिवाय इतर क्षेत्रातील रोजगार निर्मिती, कृषिसिंचन आणि रस्ते विकास यावर विशेष भर देण्यात येत असून, कुठल्याही सिंचन प्रकल्पांना आणि त्यासाठीच्या आर्थिक तरतुदीला कात्री लावण्यात येणार नसल्याचं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.

****

वैज्ञानिक शिक्षण आणि संशोधनातून नाविन्याचा प्रचार होतो, असं प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित नाविन्यपूर्णतेविषयीच्या चर्चासत्रात ते बोलत होते. विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात सुरवातीला केलेली गुंतवणूक ही पुढे देशाला श्रीमंत बनवत असल्याचं ते म्हणाले. नवनवीन कल्पनांच्या माध्यमातून देशाचा विकास साधण्यावर विज्ञान आणि तंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावत असल्याचं ते म्हणाले.      

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जनसंवाद आणि वृत्तपत्रविद्या विभागात आज प्रा. जयदेव डोळे यांचं “अभिव्यक्ती स्वातंत्र्यासमोरील आव्हाने” या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. राजकीय विश्लेषक प्राध्यापक जयदेव डोळे येत्या ३० एप्रिलला सेवानिवृत्त होत असून त्यांच्या अध्यापन सेवेचा गौरव करण्यासाठी विभागात या एक दिवसीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे.

****




No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 16 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...