Tuesday, 7 March 2017

AIR News Bulletin, Aurangabad 07.03.2017 6.50am


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 07 March 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०७ मार्च २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·      विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणानं प्रारंभ; पहिल्याच दिवशी अकरा हजार कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या सादर

·      बचत खात्यावर किमान शिल्लक, एटीएम आणि रोखीनं पैसे काढण्यावर निर्बंध घालण्याच्या  निर्णयाचा पुर्नविचार करण्याचे केंद्र सरकारचे भारतीय स्टेट बँकेला निर्देश

·      दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरूवात

आणि

·      ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला दुसऱ्या डावात १२६ धावांची आघाडी

****

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला काल प्रारंभ झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल धन्यवाद प्रस्ताव विधानसभेत मांडला. त्यानंतर चार अध्यादेश आणि तीन शासकीय विधेयकं त्यांनी सभागहात सादर केली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अकरा हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या. त्यात सर्वाधिक आठ हजार ७५० कोटी रुपयांच्या मागण्या या ऊर्जा विभागासाठी आहेत, तर १००२ कोटी रुपयांच्या मागण्या या गृह विभागासाठी आहेत. या मागण्यांवर उद्या आणि परवा सभागृहात चर्चा होणार आहे.

अधिवेशनाच्या प्रारंभी अभिभाषणात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सरकारनं आतापर्यंत केलेल्या कार्याची सविस्तर माहिती दिली. यावेळी बोलतांना त्यांनी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटीबद्ध असल्याचं सांगितलं. शेतकऱ्यांच्या हितासाठी, तसंच मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळ कमी करण्यासाठी अनेक योजना राबवल्याचं ते म्हणाले. जलयुक्त शिवार योजना लोकचळवळ बनली असल्याचं त्यांनी आपल्या भाषणात नमूद केलं.

दरम्यान, राज्यपालांच्या या अभिभाषणावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली असून, राज्य सरकारनं महाराष्ट्राची घोर निराशा केली असल्याचं ते म्हणाले.

****

विधीमंडळाचं विधान परीषद हे सभागृह देशातलं पहिलं कागद रहित सभागृह बनलं आहे. काल अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सर्व सदस्यांच्या बाकांवर कामकाजाच्या कागदपत्रांऐवजी अत्याधुनिक टचस्क्रीन नोटबुक ठेवण्यात आलं होतं.

कामकाजाला सुरुवात होताच सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी, संगणकीकरण प्रकल्पांतर्गत सदस्यांसाठी टचस्क्रीन नोटबुक उपलब्ध करुन देण्यात आल्याचं सांगितलं. या नोटबुकमध्ये इंटरनेटची सुविधा असून, विधिमंडळाच्या दैनंदिन कामकाजाची माहिती, नियम पुस्तिका, विधिमंडळाच्या विविध समित्या आणि महामंडळांचे अहवाल, तारांकित आणि अतारांकीत प्रश्नांची यादी, स्वीकृत लक्षवेधी सूचना, सदस्यांचे वेतनभत्ते, आजी माजी सदस्यांची माहिती आणि सभागृहाच्या कामकाजाचे १९ शे ३७ पासूनचे अभिलेख उपलब्ध करून देण्यात आल्याचं निंबाळकर यांनी सांगितलं.

****

सैनिकांच्या पत्नींविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल, विधानपरिषद सदस्य प्रशांत परिचारक यांना कायमस्वरूपी निलंबित करण्याची मागणी, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. शिवसेनेच्या आमदार निलम गोऱ्हे यांनी परिचारक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

****

बचत खात्यावर किमान शिलकीपेक्षा कमी रक्कम असणाऱ्या खातेदारांना दंड लावण्याचा, तसंच, एटीएम आणि रोखीनं पैसे काढण्यावर निर्बंध घालण्याच्या  निर्णयाचा पुर्नविचार करावा, शी सूचना केंद्र सरकारनं भारतीय स्टेट बँकेला केली आहे. येत्या एक एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय बँकेनं घेतला आहे, त्याला सर्व स्तरातून होत असलेला विरोध लक्षात घेऊन सरकारनं बँकेला ही सूचना केली आहे.

****

भारतीय नौदलाचं शक्तीस्थळ, आणि जगातली सर्वाधिक काळ सेवा बजावणारी युद्धनौका म्हणून ओळखल्या जाणारी विमानवाहू युद्धनौका, ‘आयएनएस विराट’ काल ३० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाली. १९८७ मध्ये आय एन एस विराट भारतीय नौदलात दाखल झाली होती. तत्पूर्वी २७ वर्षे ती एच एम एस हरमीसया नावानं ब्रिटिश नौदलाकार्यरत होती. युद्ध काळात, तसंच शांतताकालीन मोहिमांमध्ये विराटनं अतुलनीय कामगिरी केली. आय एन एस विराटचं रूपांतर संग्रहालयात करण्याची मागणी, केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याचं, नौदल प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा यांनी सांगितलं.

****

ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेच्या मिनाक्षी शिंदे यांची, तर उपमहापौरपदी रमाकांत मडवी यांची बिनविरोध निवड झाली आहे. भारतीय जनता पक्ष तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

****

      हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरूवात होत आहे. यंदा या परीक्षेला राज्यातल्या २१ हजार ६८६ शाळांमधून, १७ लाख ६६ हजार ९८ विद्यार्थी बसले आहेत. यासाठी चार हजार सातशे अठ्ठावीस परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले असल्याचं, मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हामणे यांनी, काल पुणे इथं वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. परीक्षा काळात गैरव्यवहार रोखण्यासाठी दोनशे पन्नास  भरारी पथकं नेमण्यात आल्याचं ते म्हणाले.  

****

संशोधनासाठी गणित हा विषय महत्वाचा असल्याचं, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.पंडित विद्यासागर यांनी म्हटलं आहे. लातूर इथल्या दयानंद विज्ञान महाविद्यालयात आयोजित, आंतरराष्ट्रीय गणित परिषदेचं उद्घाटन काल त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत, देश विदेशातले जवळपास २७० प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

परिषदेच्या निमित्तानं आलेल्या शोध निबंधाच्या स्मरणिकेचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं.

****

हिंगोली इथल्या बाजार समितीच्या यार्डात तूर खरेदी  केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी  शेतकऱ्यांनी काल खासदार राजीव सातव यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन केलं. मुंबई इथल्या कृषी आणि पणन केंद्र, नाफेडच्या अधिकाऱ्यांनी  खरेदीसाठी पैसे नसल्यामुळे तूर खरेदी बंद असल्याचं कारण सांगितल्यानंतर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही आंदोलन केलं.

****

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान बंगळुरु इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या काल तिसऱ्या दिवस अखेर भारतानं दुसऱ्या डावात चार गडी बाद २१३ धावा केल्या. चेतेश्वर पुजारा ७९ तर अजिंक्य रहाणे ४० धावांवर खेळत आहेत. तर लोकेश राहूल ५१ धावांवर बाद झाला. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव दोनशे शहात्तर धावांवर संपुष्टात आला. भारताकडून रविंद्र जडेजानं सर्वाधिक सहा बळी घेतले. सध्या भारत १२६ धावांनी आघाडीवर असून, सामन्याचे दोन दिवस बाकी आहेत.

****

पश्चिम बंगालमधल्या मिदनापूर इथं झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ खो खो स्पर्धेचं विजेतेपद नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठानं सलग दुसऱ्यांदा पटकावलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात नांदेड विद्यापीठाच्या संघानं मुंबई विद्यापीठाच्या संघाचा दोन गुणांनी पराभव केला.

****

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे राज्यघटनेसमोरचं आव्हान आहे असं प्रतिपादन, ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांनी केलं आहे. ते काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या, जनसंवाद विभागानं आयोजित केलेल्या, ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्या समोरील आव्हानंया विषयावरच्या राष्ट्रीय चर्चासत्रात बोलत होते. वृत्तपत्र विद्या आणि जनसंवाद विभागाचे प्राध्यापक जयदेव डोळे यांच्या सन्मानार्थ या राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. डोळे हे ३० एप्रिलला सेवा निवृत्त होत आहेत. पत्रकार डॉ. श्रीपाद जोशी, निशिकांत भालेराव, डॉ. सुधीर गव्हाणे यांच्यासह अनेकांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला.

****

जलवाहिन्यांच्या दुरूस्तीसाठी आज सकाळी ९ वाजेपासून पुढील २४ तास औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामुळे आगामी दोन दिवस शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होईल, असं महानगरपालिका प्रशासनानं कळवलं आहे.

****

वेतन आणि निवृत्ती वेतन मिळावं या आणि इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी कालपासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला आहे. या संपाला औरंगाबादसह मराठवाड्यात सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे राज्यातल्या शहरी आणि ग्रामीण भागाच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

****

जालना इथं ‘महाराष्ट्र माझा’ या राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धेतल्या निवडक छायाचित्रं प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या हस्ते काल करण्यात आलं.

//****//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 20.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 20 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...