Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 09 March 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ मार्च २०१७ सकाळी
६.५० मि.
****
·
सैनिकांच्या
पत्नींसंदर्भात वादग्रस्त विधान करणारे आमदार प्रशांत परिचारक यांच्याविरूद्ध कारवाई
करावी तसंच शेतकऱ्यांच्या कर्ज माफीच्या मागणीसाठी विरोधकांचा दोन्ही सभागृहात गदारोळ;
कामकाज तहकूब
·
मुंबईत
शिवसेनेचा तर सोलापूरमध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर
·
माजी
महसूल मंत्री एकनाथ खडसे भूखंड गैरव्यवहार प्रकरणाचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे
तपास
आणि
·
जागतिक
महिला दिन विविध उपक्रम राबवत साजरा
****
सैनिकांच्या पत्नींसंदर्भात वादग्रस्त
विधान करणारे आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर कारवाईची मागणी तसंच शेतकरी कर्जमाफीच्या
मागणीसाठी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे काल विधीमंडळाचं
कामकाज होऊ शकलं नाही.
आमदार परिचारक यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद कालही विधान परिषदेत उमटले. सभागृहाचं कामकाज
सुरु होण्यापूर्वी काल सभापती,
मुख्यमंत्री आणि गटनेत्यांची बैठक झाली, याप्रकरणी सभागृहातल्या सात सदस्यांची समिती
नेमावी, अधिवेशन संपायच्या आत समितीनं अहवाल सादर करावा आणि तोपर्यंत परिचारक यांना
निलंबित करावं अशी भूमिका सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी मांडली. परिचारक यांना
बाजू मांडू दिली पाहिजे असंही ते म्हणाले. मात्र अशी समिती नेमायला विरोधकांनी जोरदार
विरोध केला. परिचारक यांना बडतर्फ केल्याशिवाय सभागृहाचं कामकाज होणार नाही अशी भूमिका
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तटकरे आणि काँग्रेसचे भाई जगताप यांनी घेतली. विरोधकांच्या
घोषणांमुळे सभागृहाचं कामकाज एकदा १५ मिनिटांसाठी आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात
आलं.
शेतकरी कर्जमाफीच्या
मागणीसाठी विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे विधानसभेचं कामकाज काल तहकूब करावं लागलं.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेनेच्या सदस्यांनीही ही मागणी लावून धरली.
सभागृहाचं काम सुरू होताच, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी, शेतकरी कर्ज
माफीच्या मागणीसह स्थगन प्रस्ताव मांडला. यावर कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, यांनी,
शेतकऱ्यांना सक्षम करून कर्जमाफी दिली जाणार असल्याचं सांगितलं. मात्र, या उत्तरानं
समाधान न झाल्यानं विरोधी पक्षाच्या सदस्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली, त्यामुळे,
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहाचं कामकाज आधी पंधरा मिनिटांसाठी, त्यानंतर
प्रश्नोत्तराच्या तासापर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब केलं.
****
मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेचे विश्वनाथ
महाडेश्वर यांची तर उपमहापौरपदी शिवसेनेच्या हेमांगी वरळीकर यांची निवड झाली आहे. भारतीय
जनता पक्षाच्या सर्व सदस्यांनी महाडेश्वर यांना पाठिंबा दिला. त्यामुळे महाडेश्वर यांना
१७१ मतं मिळाली, मनसेचे सात नगरसेवक या मतदानाच्या वेळी गैरहजर राहिले.
सोलापूरच्या महापौरपदी भारतीय जनता
पक्षाच्या शोभा बनशेट्टी यांची निवड झाली आहे. बनशेट्टी यांनी शिवसेनेच्या कुमुद अंकाराम
यांच्यावर २८ मतांनी विजय मिळवला. बनशेट्टी यांना ४९ मतं मिळाली तर कुमुद अंकाराम यांना
२१ मतं मिळाली. काँग्रेसच्या प्रिया माने यांना १८ मतं मिळाली. या निवडणुकीत एमआयएमचे
९, बहुजन समाज पक्षाचे चार तसंच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा एक, असे १४ उमेदवार
तटस्थ राहिले.
****
माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचं
भूखंड गैरव्यवहार प्रकरण अधिक तपासासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपवण्यात आलं
आहे, असं काल राज्य शासनाकडून मुंबई उच्च न्यायालयाला सांगण्यात आलं. भोसरी इथल्या
औद्योगिक विकास महामंडळाची जागा खडसे यांनी महसूल मंत्री असताना अगदी कवडीमोल दरानं खरेदी केली असा आरोप करणाऱ्या याचिकेवर
काल मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं खडसे यांच्याविरूद्ध गुन्हा
नोंदवण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले.
****
स्त्री भ्रूणहत्येच्या घटना रोखण्यासाठी
राज्य शासन कडक पावलं उचलत असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
काल जागतिक महिला दिनी, महिला आणि बालविकास विभागाच्या वतीनं मुंबईत आयोजित कार्यक्रमात
मुख्यमंत्री बोलत होते. राज्य शासन महिलांना केंद्रस्थानी ठेवून योजना राबवण्यास प्राधान्य
देत असल्याचं, मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विविध योजनांच्या लाभार्थी महिलांना
प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली, तसंच महिलांसाठी ‘रेंट अ होम’ या मोबाईल ॲपचं लोकार्पणही
करण्यात आलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं
हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही
****
जागतिक महिला दिनानिमित्त काल सर्वत्र
विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. औरंगाबाद इथं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठात स्त्री पुरूष समानता एकजूट फेरी काढण्यात आली. लिंगभाव सजगता
या विषयावर मुक्त पत्रकार शर्मिष्ठा भोसले यांचं व्याख्यान झालं. महात्मा गांधी मिशनच्या
वतीनं विविध क्षेत्रातील महिलांना सक्षमा पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यामध्ये
लेखिका तसनीम पटेल, संहिता लेखिका ललिता पवार, शिक्षण क्षेत्रामधील वैजयंती मिसाळ,
उद्योग क्षेत्रामधील दीपाली जाधव, पोलिस दलात कार्यरत साधना आढाव, संशोधन क्षेत्राशी
संबंधित चैताली कुलकर्णी, पत्रकारीतेसाठी पृथा वीर आणि क्रीडा क्षेत्रासाठी अमरीन शेख,
यांचा समावेश आहे. यावेळी अश्विनी दाशरथे यांनी ललिता पवार, तसनीम पटेल आणि दीपाली
जाधव यांची प्रकट मुलाखत घेतली. याशिवाय शहरातल्या विविध महिला संघटना, संस्था आणि
कार्यालयांनी विविध उपक्रम राबवत महिलांचा सन्मान केला.
****
बीड जिल्ह्यात महिलांनी दारुबंदीची
मागणी केली आहे. काल महिला दिनानिमित्त जिल्हाभरातल्या महिलांनी दारुबंदीसाठी एकत्र
येत जिल्हाधिकारी कार्यालयावर तिरडी मोर्चा काढला.
****
जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून,
वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत महिलांसाठी मोफत स्तन कर्करोग पूर्व तपासणी शिबीरास कालपासून
सुरुवात झाली. राज्यातल्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये येत्या १७ तारखेपर्यंत
ही तपासणी सुरु राहणार आहे. या शिबीरात आधुनिक उपकरणाद्वारे तपासणी आणि मार्गदर्शन
केलं जाणार आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये
येत्या चौदा तारखेला पंचायत समितींच्या सभापती आणि उपसभापतीपदांसाठी निवडणुका होत आहेत.
राज्य निवडणूक आयोगानं या निवडणुका घेण्याची सूचना केली आहे.
****
लातूर शहरासह विविध ठिकाणी पाणीपुरवठा
होत असलेल्या केज तालुक्यातल्या धनेगावच्या मांजरा धरणात पुरेसा पाणीसाठा असल्यामुळे
यंदा लातूरला पाणी टंचाई जाणवणार नसल्याचं महापालिका नगर अभियंता एस.एन. काझी यांनी
सांगितलं. वितरण व्यवस्थेतल्या अडचणींमुळे सध्या शहराला आठवड्यातून एकदा पाणी दिलं
जात असून लवकरच आठवड्यातून दोन वेळा पाणी देण्याचा महापालिकेचा प्रयत्न असल्याचं काझी
म्हणाले.
****
औरंगाबाद, जालना आणि पैठण शहराला जायकवाडी
धरणातून होणारा पाणीपुरवठा बंद करण्याची नोटीस सिंचन विभागानं दिली आहे. औरंगाबाद महापालिकेकडे
साडेसहा कोटी रूपये, जालना नगरपालिकेकडे एक कोटी ३२ लाख रूपये तर पैठण नगर परिषदेकडे
६६ लाख रूपयांची थकबाकी आहे. वारंवार नोटीस देऊनही थकबाकी भरत नसल्यामुळे उद्यापासून
दररोज दोन तास पाणी कपात करण्याचा निर्णय सिंचन विभागानं घेतला आहे. १३ मार्चपर्यंत
ही थकबाकी न भरल्यास संपूर्ण पाणीपुरवठा बंद करण्यात येईल, असं या नोटीसमध्ये म्हटलं
आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तेरणा मध्यम
जल प्रकल्पातून तेर, ढोकी, तडवळा अणि येडशी या गावांसाठीचा पाणी पुरवठा पुन्हा सुरु
करण्याची मागणी उस्मानाबादचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पालकमंत्र्याकडे निवेदनाद्वारे
केली आहे. गतवर्षी या धरणात पाणीसाठा नसल्यामुळे संबंधीत गावांना पाणी पुरवठा झाला
नाही. मात्र सध्या धरणात पुरेसा जलसाठा असल्याचं त्यांनी निवेदनात म्हटलं आहे.
****
जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा
स्थगित निवडणूक कार्यक्रम सुरू करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं
काल दिले. पंचायत राज संस्थांच्या निवडणुकीमुळे, बँकेच्या निवडणुका स्थगित केल्या होत्या.
या निर्णयाला बँकेचे संचालक संदीप गोरे यांनी न्यायालयात आव्हान दिलं होतं.
****
बीड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती
दिनकर कदम यांच्यासह अन्य एका विरूद्ध पोलिसांनी वाहनाच्या कागदपत्रांची मागणी केली
असता, पोलिसांना धमकावल्या प्रकरणी, गुन्हा दाखल झाला आहे. बीडच्या स्थानिक न्यायालयानं
त्या दोघांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
****
केंद्र सरकारचं ‘माता, बाल आणि किशोरवयीन मुलांचं आरोग्य जनजागृती
अभियान‘ राबवण्यासाठी बीड जिल्ह्यातल्या पिंपळनेर, या गावाची निवड झाली आहे. यानिमित्त
पिंपळनेर इथं आरोग्यविषयक जनजागृती करणारे विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत.
//****//
No comments:
Post a Comment