Monday, 13 March 2017

AIR News Bulletin, Aurangabad 13.03.2017 6.50am


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 13 March 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १३ मार्च २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·      गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांची नियुक्ती

·      सरकारला भेदभाव करण्याचा हक्क नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी

·      लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याच्या पार्श्वभूमीवर राज्य विधानसभेची निवडणूक सहा महिने अगोदर होण्याची शक्यता

आणि

·      मागासवर्गीय तरुणांसाठी राज्यातलं पहिलं कौशल्य विकास केंद्र लातूर इथं सुरु करण्याची कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची घोषणा

****

गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांची नियुक्ती राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी केली आहे. त्यांना १५ दिवसात विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे निर्देशही राज्यपालांनी दिले आहेत. तत्पूर्वी भारतीय जनता पक्षाच्या विधीमंडळ गटनेते पदी मनोहर पर्रीकर यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र गोमंतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पक्षानं पर्रीकर मुख्यमंत्री होणार असतील तर भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली, या दोन्ही पक्षांचे प्रत्येकी तीन सदस्य विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. पर्रीकर यांनी काल राज्यपाल सिन्हा यांची भेट घेऊन दोन अपक्ष आमदारांसह २१ आमदारांचा राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा असल्याचं पत्र सादर केलं, असल्याचं राज्यपालांचे सचिव रूपेश कुमार ठाकूर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

दरम्यान, विधानसभेत १८ सदस्य असलेल्या काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ गटनेते म्हणून चंद्रकांत कवळेकर यांची निवड झाली आहे.

****

लोकशाहीत सरकार बहुमतानं बनतं, मात्र ते सर्वांच असतं, त्याला भेदभाव करण्याचा हक्क नसतो, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे.  पाच राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या ऐतिहासिक यशाबद्दल नरेंद्र मोदींनी काल दिल्लीत भाजपा मुख्यालयात झालेल्या विजयोत्सवात कार्यकर्त्यांना संबोधित केलं, त्यावेळी ते बोलत होते. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यशामुळं हुरळून न जाता विनम्रपणे काम करून जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण कराव्यात, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. देशात भावनिक मुद्यावरून अनेक लाटा येऊन गेल्या. भावनिक मुद्दे नसताना मोठ्या प्रमाणावर मतदान होणे, यातून तरूणांच्या, महिलांच्या स्वप्नातल्या  नव्या भारताचे निर्माण होत आहे असंही त्यांनी नमूद केलं.

****

मे २०१९ मध्ये, लोकसभा आणि नोव्हेंबर २०१९ मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या दोन्ही निवडणुका एकत्र घेण्याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. यामुळे विधानसभेची निवडणूक सहा महिने आधी होईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या गारगोटी इथं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात काल ते बोलत होते. लोकसभा विधानसभा निवडणुकीला सामोरं जायची तयारी ग्राम पंचायत निवडणुकीपासूनच करावी, असं आवाहनही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केलं.

****

सव्वाशे कोटी भारतीयांच्या बळावर आणि त्यांच्या कौशल्यांसह नव्या भारताचा उदय होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवा भारत हा विकास घडवणारा असून राष्ट्रनिर्मितीसाठी आपण कटीबध्द असल्याची प्रतिज्ञा नागरिकांनी नरेंद्र मोदी मोबाईल ॲपवर घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे. २०२२ साली स्वातंत्र्याची ७५ वर्ष साजरी करताना आपण महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिमान वाटेल असं कार्य केलं पाहिजे, असंही पंतप्रधानांनी सोशल मिडीयावर दिलेल्या संदेशात म्हटलं आहे.

****

नक्षलवादाला मूळापासून संपवण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटलं आहे. नक्षलवाद्यांच्या कारवायांचं प्रमाण कमी झालं असल्याचंही त्यांनी नमूद केलं. छत्तीसगढ मधल्या रायपूर इथं काल ते बोलत होते. नक्षलग्रस्त राज्यांना या समस्येपासून मुक्ती मिळावी यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. रायपूर इथं केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या  जखमी जवानांची भेट घेऊन त्यांनी चौकशी केली. नक्षलवाद्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असं ते यावेळी म्हणाले.

****

नाट्य क्षेत्रातल्या कलाकारांच्या नव्या पिढीला मार्गदर्शन मिळण्यासाठी रंगभूमीवरील मान्यवर तसंच दिग्गज कलाकारांचे अनुभव ध्वनिचित्रमुद्रीत करून ते संग्रहित करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे २०१६-१७ या वर्षासाठीचा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी पुरस्कार चंद्रकांत ऊर्फ चंदू डेगवेकर यांना तर नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार लीलाधर काबंळी यांना मुंबई इथं तावडे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

कालानुरुप झालेले बदल संगीत नाटकांनी स्वीकारावेत असं सांगत, संगीत रंगभूमीला गौरवावस्था आणून देण्यासाठी शासन सर्वोतोपरी मदत करण्यास तयार असल्याचं तावडे यावेळी म्हणाले.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

लातूर इथल्या सामजिक न्याय भवनाच्या परिसरात मागासवर्गीय तरुणांसाठी राज्यातलं पहिलं कौशल्य विकास केंद्र सुरु करण्याची घोषणा कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे.

लातूर इथं उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीचं उद्घाटन सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार डॉ.सुनिल गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.

राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी या केंद्रासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं जागा उपलब्ध करुन दिली जाईल असं सांगितलं. राज्यातलं सरकार हे मागासवर्गीयांच्या हिताचं काम करणारं असून विकास कामाला कोणीही विरोध करु नये असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

लातूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रूग्णालयातल्या नेत्र विभागाच्या नवीन इमारतीचं लोकापर्णही काल पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झालं.

****

छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेले राज्यातले केंद्रीय राखीव पोलीस दलाचे भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर इथले जवान मंगेश बालपांडे, वर्धा जिल्ह्यातले पुलगावचे प्रेमदास मेंढे आणि चंद्रपूरजवळच्या बोर्डा गावातले जवान नंदकुमार आत्राम या तिघांच्या पार्थिवावर काल त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

या हल्ल्यात मृत पावलेल्या राज्यातल्या तिन्ही जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रूपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे.

****

आज धूलिवंदन अर्थात रंगांचा उत्सव. देशभरात हा सण हर्षोल्हासात साजरा करण्यात येत आहे. हा उत्सव म्हणजे एकमेकांना रंग लावून जिव्हाळा आणि आनंद व्यक्त करण्याचं माध्यम आहे. काल, या सणाच्या पूर्व संध्येला होलिकोत्सव साजरा झाला. यामध्ये ठिकठिकाणी पारंपारिक होळी पेटवून वाईट, नकारात्मक गोष्टींचं  दहन करुन चांगल्याची सुरुवात करण्याचा संकल्प करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी यानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं काल ५० लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. उस्मानाबाद मार्गावरून जाणाऱ्या एका ट्रकच्या तपासणीत पोलिसांना २५० पोत्यांमध्ये भरलेला हा गुटखा आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे.

****

देशाचे माजी उपपंतप्रधान आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. विधान भवनातल्या त्यांच्या पुतळ्याला विधानसभेचे माजी सदस्य मधु चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, उपायुक्त महेंद्र हरपाळकर, जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, बीड जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जालना जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे आणि परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

****

नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर इथल्या मंदिरात दर्शनासाठी २०० रुपये शुल्क आकारण्याविरुध्द दाखल केलेल्या तक्रारीवर सुनावणी घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई धर्मादाय आयुक्तांना दिले आहेत. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारं त्र्यंबकेश्वर मंदिर संरक्षित राष्ट्रीय वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. तिथं दर्शनासाठी शुल्क आकारणं भेदभाव करणारं असल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्त ललिता शिंदे यांनी ही तक्रार केली आहे.

//*******//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 24 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...