Monday, 13 March 2017

AIR News Bulletin, Aurangabad 13.03.2017 10.00am


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

१३ मार्च २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

धुलिवंदनाचा सण आज सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. नागरिकांनी पर्यावरणपूरक विशेषत: कोरड्या रंगांचा वापर करून हा सण साजरा करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा, असं आवाहन पर्यावरणवादी संघटनांकडून करण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यात राजवाडी काठी संस्थानच्या होलिकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आज सकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास संस्थानची होळी पेटवण्यात आली. बाराव्या शतकापासूनची परंपरा असलेल्या या होलिकोत्सवात आदिवासी बांधवांनी खास पारंपारिक वेशभुषेत होळी नृत्य सादर केलं. यापुढे पाच दिवस सातपुड्याच्या दऱ्या खोऱ्य़ात होलिकोत्सव साजरा होणार असून यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक सातपुड्यात दाखल झाले आहेत.

****

गोव्यात भारतीय जनता पक्षानं सत्तास्थापनेचा दावा करणं, ही बाब लोकशाहीत अनाकलनीय असल्याचं, काँग्रेस पक्षाचे सचिव शांताराम नाईक यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्लीत पीटीआयशी बोलत होते. काँग्रेस पक्षाला जनतेनं पसंती दर्शवली असताना, भाजपनं सत्ता स्थापन करणं, ही लोकशाहीची हत्या असल्याची टीका नाईक यांनी केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनीही या घटनाक्रमावर टीका करत, मनोहर पर्रिकर यांनी सत्तेचं अपहरण केलं असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेसला सत्ता स्थापनेचा पहिला हक्क असताना, भाजपच्या या कृतीमुळे गोव्याच्या राजकारणात नैतिकतेचं अध:पतन झालं असल्याचं दिग्विजयसिंह म्हणाले.

****

मणीपूरमध्ये भाजप विधीमंडळ नेत्याची निवड आज होणार आहे. मणीपूरमध्ये भाजपचे २१ आमदार निवडून आले असून, भाजपनं ३२ आमदारांचं संख्याबळ असल्याचा दावा केला आहे. भाजप आणि समर्थक आमदारांची काल राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांच्यासोबत काल बैठक झाली, राज्यात नॅशनल पीपल्स पार्टी आणि नागा पीपल्स फ्रंटचे प्रत्येकी चार तर काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रत्येकी एका आमदाराचा भाजपला पाठिंबा असल्याचं, भाजप महासचिव राम माधव यांनी सांगितलं.

****

पर्यटनाच्या नवनवीन संकल्पनांना राज्यशासन नेहमीच पाठिंबा आणि प्रोत्साहन देत असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत पहिल्या फ्लोटेल अर्थात तरंगत्या हॉटेलचं उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते काल करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि महाराष्ट्र सागरी महामंडळ यांच्या सहयोगानं या हॉटेलची उभारणी करण्यात आली आहे.

//*******//






No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 24 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...