Thursday, 2 March 2017


आकाशवाणीऔरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

०२ मार्च २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

औरंगाबादच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून शहरात जिल्हा परिषदेच्या मैदानावर आजपासून ८ मार्चदरम्यान “सिद्धा महोत्सव २०१६-१७” आयोजित करण्यात आला आहे. विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महिला बचत गटांना जिल्हा आणि विभागीय पातळीवरचे राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार वितरित केले जाणार आहेत. या महोत्सवात ग्रामीण महिला स्वयंसहायता गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री होणार आहे.

****

मनोधैर्य योजनेअंतर्गत बलात्कार पीडितेला देण्यात येणारी मदत अपूरी असल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. मनोधैर्य योजनेअंतर्गत तीन लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी अशी मागणी करणारी याचिका एका बलात्कार पीडितेनं दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना, सरकारचा दृष्टीकोन याबाबत कठोर असून, बलात्कार पीडितेला आर्थिक मदत करणं ही सरकारची जबाबदारी असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.

****

बेळगाव महापालिकेच्या महापौरपदी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या संज्योत बांदेकर आणि उपमहापौरपदी नागेश मंडोळकार यांची निवड झाली आहे. बांदेकर यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी कानडी उर्दू गटाच्या जयश्री माळगी यांचा १५ मतांनी पराभव केला. बांदेकर यांना ३२ तर माळगी यांना १७ मतं मिळाली.

****

दिल्लीमध्ये सुरू असलेल्या नेमबाजीच्या विश्व चषक स्पर्धेमध्ये भारतीय नेमबाज जीतू रायनं पन्नास मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं आहे. अंतिम फेरीत दोनशे तीस पूर्णांक एक, इतके गुण घेऊन जीतूनं विक्रमही केला आहे. भारताच्याच अमनप्रीत सिंहनं या स्पर्धेत रजत पदक जिंकलं आहे. या स्पर्धेत भारताची पदकसंख्या आता पाच झाली आहे.

//*******//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 06.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 06 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...