Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 10 March 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० मार्च २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधकांकडून
सुरू असलेल्या गदारोळामुळे विधानसभेत आज सलग तिसऱ्या दिवशी कामकाज होऊ शकलं नाही. कामकाजाला
सुरूवात होताच, अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला, मात्र शेतकरी कर्जमाफीसाठी
विरोधी पक्षाच्या आमदारांसह सरकारचा घटकपक्ष असलेल्या शिवसेना आमदारांनीही घोषणाबाजी
केली. दीपक केसरकर, दादा भुसे या मंत्र्यांचाही यात समावेश होता. गदारोळ वाढत गेल्यानं
अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. सदनाचं कामकाज आता १५ मार्चपर्यंत
स्थगित करण्यात आलं आहे. विधानसभेला १४ मार्च, २१ मार्च आणि २२ मार्च रोजी सुट्टी देण्यात
आल्याचं विधीमंडळ कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी सांगितलं.
तूर आणि कांद्याच्या किमती घसरल्यामुळे
शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असल्यानं, शेतकरी कर्जमाफी देण्याची शिवसेनेची
भूमिका, दादा भुसे यांनी सदनाचं कामकाज स्थगित झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त
केली.
दरम्यान, शेतकरी कर्जमाफीसाठीच्या
गदारोळातच राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या अभिभाषणाचा धन्यवाद प्रस्ताव कोणत्याही
चर्चेविना मंजूर करण्यात आला. या प्रस्तावावर काल आणि आज असे दोन दिवस चर्चा होऊन,
मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर प्रस्ताव मंजूर होणं अपेक्षित होतं.
विधान परिषदेचं कामकाजही शेतकरी
कर्जमाफीच्या मुद्यावरून बाधीत झालं.
****
चालू आर्थिक वर्षात फेब्रुवारी महिन्यात
सहा लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रत्यक्ष कर संकलन झालं असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत
हे प्रमाण १० पूर्णांक सात दशांश टक्क्यांनी वाढलं असल्याची माहिती, केंद्रीय अर्थमंत्री
अरुण जेटली यांनी आज लोकसभेत दिली. अप्रत्यक्ष कर संकलनही साडेसात लाख कोटी रुपयांपेक्षा
जास्त झालं असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात २२ पूर्णांक दोन दशांश टक्के वाढ झाल्याचं
त्यांनी सांगितलं.
****
घरगुती वापराच्या विना अनुदानित
गॅस सिलिंडरच्या किमतीत झालेल्या वाढीचा अनुदानित गॅस
सिलिंडर घेणाऱ्या ग्राहकांवर
कोणताही परिणाम होणार नसल्याचं, केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. संसदीय कार्यमंत्री
अनंत कुमार यांनी आज लोकसभेत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन
खरगे यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात हा खुलासा केला. विना
अनुदानित गॅस सिलिंडरच्या
किमतीत
नुकतीच ६८ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
****
वाशिम जिल्हा परिषदेचे कृषी विकास
अधिकारी आबासाहेब धापटे यांना आज दोन लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. लाचलुचपत
प्रतिबंधक विभागाच्या पथकानं सापळा रचून ही कारवाई केली.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं
देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण वांङमय पुरस्कार खासदार शरद पवार यांच्या 'लोक माझे
सांगाती' या आत्मचरित्राला जाहीर झाला आहे. तर नटवर्य लोटू पाटील नाट्य पुरस्कार ख्यातनाम
दिग्दर्शक जब्बार पटेल यांना जाहीर झाला आहे. साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले
पाटील यांनी आज औरंगाबाद इथं ही घोषणा केली. अकरा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल
आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
****
लातूर रेल्वे स्थानकावर लवकरच वायफाय
सुविधा उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश रेल्वेच्या उपभोक्ता सल्लागार
समितीचे सदस्य निजाम शेख यांनी ही माहिती दिल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
रेल्वेनं जैविक शौचालय उभारणी सुरू केली असून, आत्तापर्यंत दीड हजार शौचालयांचं काम
पूर्ण करण्यात आलं असल्याचं शेख यांनी सांगितलं.
****
हैदराबाद-अजमेर-हैदराबाद साप्ताहिक एक्स्प्रेस गाडी जयपूरपर्यंत वाढवण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेनं
घेतला आहे. १८ मार्चपासून ही गाडी हैदराबादहून जयपूर पर्यंत धावेल. हा बदल
कायमस्वरुपी करण्यात आला आहे. ही गाडी निजामबाद, नांदेड, परभणी, औरंगाबाद, जळगाव, भुसावळ,
भोपाळ, उज्जैन, चित्तोडगड मार्गे धावणार आहे.
****
पर्यावरणाचा ऱ्हास आणि हानी रोखण्यासाठी सर्वांनी नैसर्गिक
रंग वापरून होळी साजरी करावी, तसंच पाण्याचा अपव्यय टाळावा, असं
आवाहन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केलं आहे. येत्या सोमवारी धुलिवंदन साजरं
होत आहे, त्या पार्श्वभूमीवर कदम यांनी हे आवाहन केलं.
****
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या
वतीनं देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचं वितरण उद्या नांदेड इथं होणार आहे. यात संत रविदास
पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ
साठे पुरस्काराचा समावेश आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले
यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
****
No comments:
Post a Comment