Thursday, 2 March 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 2 March 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २ मार्च २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

राज्यातल्या पायाभूत सुविधा आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी इच्छुक असून त्यासंदर्भात या प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पायाभूत क्षेत्रात प्रत्यक्ष गुंतवणूक व्हावी यासाठी राज्य शासन आणि प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त कार्य समिती स्थापन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. राज्यात गुंतवणूक वाढीसाठी शासनानं उद्योगस्नेही धोरणाबरोबरच इज ऑफ डुइंग बिझनेससारखी अनेक महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत. त्यामुळे गेल्या सहा महिन्यात देशात झालेल्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीतील पन्नास टक्के गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात झाली असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. पोलिस आयुक्तालयाच्या मैदानावर नियोजित प्रशासकीय इमारत तसंच पोलिस अधिकारी कर्मचारी निवासस्थानाच्या नियोजित जागेचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे. रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री विमानाने मुंबईकडे प्रस्थान करतील.

****

शासकीय अधिकारी आणि कर्मचारी ज्या पदावरुन सेवानिवृत्त झाले आहेत ते पद नमूद करुन तसंच त्याआधी सेवानिवृत्तअसा उल्लेख करुन संबंधित प्रशासकीय कार्यालय आणि विभागानं त्यांना कायमस्वरुपी ओळखपत्रं द्यावी, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागानं दिले आहेत. यापूर्वी सेवानिवृत्तांना एक वर्ष मुदतीसाठी ओळखपत्र देण्यात येत होतं, मात्र ते कायमस्वरुपी मिळावं, अशी मागणी करण्यात येत होती. राज्य शासनाकडून ही मागणी मान्य करण्यात आली असून, याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला.

****

नौदलानं आज कलवरी पाणबुडीवरून नौकाभेदी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. अरबी समुद्रात घेण्यात आलेली अशाप्रकारची ही पहिलीच चाचणी यशस्वी झाल्याचं, नौदलाकडून सांगण्यात आलं आहे. स्कॉर्पिअन श्रेणीतल्या सहा पाणबुड्यांवर तैनात होणाऱ्या या क्षेपणास्त्रामुळे समुद्रमार्गे संभाव्य धोक्याचा बिमोड करण्यास नौदल सज्ज असल्याचं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. मुंबईत माझगाव बंदरात या पाणबुड्यांची बांधणी करण्यात आली आहे.

****

संरक्षण मंत्रालयानं ठाणे इथल्या सैन्य भरती पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयला चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज नवी दिल्ली इथं ही माहिती दिली. पुणे विभागासाठी ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. याप्रकरणी ठाणे पोलिसांनी आतापर्यंत १८ जणांना ताब्यात घेतलं आहे. संबंधीत परीक्षेसाठी घेतल्या जाणाऱ्या एका शिकवणी वर्गात दोन लाख रुपयांच्या मोबदल्यात या परीक्षेची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

****

विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेची वाढ चांगल्या प्रकारे झाली असून, काँग्रेस विनाकारण त्यावर टीका करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं ते आज वार्ताहरांशी बोलत होते. विमुद्रीकरणानंतर मुद्दाम गोंधळाचं वातावरण निर्माण करुन आर्थिक वाढ थांबवण्याचा अपप्रचार करण्यात आला, मात्र आता याबाबत प्रसिद्ध झालेली आकडेवारी वेगळंच सांगते, असं ते म्हणाले. अनौपचारिक देवघेवीला औपचारिक रुप देण्याचा सरकारचा हा प्रयत्न असल्याचं जेटली यांनी यावेळी सांगितलं. 

****

नळ पाणी पुरवठा योजना सुस्थितीत ठेऊन गावांला पाणीपुरवठा करावा असे निर्देश सहकार राज्यमंत्री आणि परभणीचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. परभणी इथं जिल्हा वार्षिक योजनेच्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून २०१६-१७ मध्ये जिल्ह्यात विविध यंत्रणांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला असून, हा निधी योग्य रितीने खर्च होईल याची दक्षता घ्यावी असे निर्देशही पाटील यांनी यावेळी दिले.
      दरम्यान, जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत जलसंधारणाच्या विविध कामांद्वारे पावसाचा प्रत्येक थेंब जिरण्यासाठी नियोजन करावं, विहिरी तसंच बोअरचं पुनर्भरण करून भूजल पातळी वाढण्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देशही पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी  कार्यालयात जलयुक्त शिवार अभियान २०१६-१७ अंतर्गत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते

****

नाशिक महापौर पदाची निवडणूक येत्या १४ मार्चला होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका निवडणूकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. नाशिक महापालिकेचं महापौरपद अनुसूचित जमातीसाठी राखीव झालं आहे.

****

निवृत्ती वेतन दाव्याचं अंतिम टप्प्याचं काम पूर्ण करण्यासाठी आधार कार्ड आवश्यक असल्याचं कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना - ईपीएफओनं स्पष्ट केलं आहे. संघटनेनं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात ही माहिती देण्यात आली. निवृत्ती वेतन दाव्यांसाठी आधार कार्ड सादर करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च देण्यात आली आहे. 

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 10 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...