Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 02 March 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ मार्च २०१७ सकाळी
६.५० मि.
****
·
रिक्षा
परवान्यासाठी मराठी भाषा सक्तीची करणारे सरकारचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द
·
चलनातून
बाद झालेल्या नोटा बाळगणं, ही बाब गुन्हा ठरवणाऱ्या कायद्याची अधिसूचना जारी
·
दुष्काळ
निवारणासाठी मराठवाडा विकास आराखडा तयार - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
आणि
·
औरंगाबादच्या
जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाची परवानगी रद्द करणारं पत्र उच्च न्यायालयात
सादर
****
रिक्षा परवान्यांसाठी मराठी भाषा येणं
बंधनकारक करण्यासंदर्भात राज्य शासनानं जारी केलेलं परिपत्रक मुंबई उच्च न्यायालयानं
रद्दबातल ठरवलं आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सरकारनं प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना
निर्देश जारी करत, परवान्यांसाठी मराठी भाषा बंधनकारक केली होती, या विरोधात मुंबई,
ठाणे, भिवंडी आणि मीरा-भाईंदर इथल्या रिक्षा चालक संघटनांनी उच्च न्यायालयात याचिका
दाखल केल्या होत्या. त्यावर काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं हे परिपत्रक रद्द ठरवलं.
याचबरोबर येत्या २ महिन्यात प्रवाशांसाठी
तक्रार निवारण केंद्र स्थापन करावं आणि या केंद्रांकडे प्राप्त झालेल्या तक्रारींवर
काय कारवाई केली, त्याबाबत तपशीलवार माहिती सादर करण्याचे तसंच ही माहिती संकेतस्थळावर
टाकण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत. याशिवाय रिक्षा संघटनांनादेखील नियमांचं
पालन करण्यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्यास न्यायालयानं सांगितलं आहे.
****
विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत
शहाऐंशी रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. जागतिक बाजारपेठेत झालेल्या दरवाढीमुळे हा निर्णय
घेतल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. अनुदानित सिलिंडरच्या किमतीत मात्र कोणताही
बदल झालेला नाही.
****
चलनातून बाद झालेल्या नोटा बाळगणं हा
गुन्हा ठरवणाऱ्या कायद्याची अधिसूचना काल केंद्र सरकारनं काढली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
यांनी २७ फेब्रुवारी रोजीच या सबंधीच्या विधेयकावर सही केली होती.
चलनातून बाद करण्यात आलेल्या हजार आणि
पाचशे रूपयांच्या दहा पेक्षा जास्त नोटा बाळगल्यास, दहा हजार रुपयांचा दंड किंवा रकमेच्या
पाच पट दंड आकारण्याची तरतूद या कायद्यात आहे. तसंच, नऊ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या
नोटा बंदीच्या काळात परदेशात असलेल्या, भारतीय नागरिकांनी बॅंक खात्यात भरलेल्या
रकमे बाबत खोटी माहिती दिल्यास, किमान पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल, असंही
या कायद्यात नमूद करण्यात आलं आहे. चलनातून रद्द करण्यात आलेल्या, हजार आणि पाचशेच्या
नोटांसंबधी सरकारचं आणि भारतीय रिझर्व बँकेचं दायित्व संपलं असल्याचं, जाहीर करण्यात
आलं आहे.
****
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करणारे संशयित मारेकरी सारंग अकोलकर आणि विनय पवार
या दोघांबद्दल माहिती देणाऱ्यास केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआय आणि मुंबईच्या विशेष
गुन्हे शाखेनं प्रत्येकी ५ लाख रुपयांचं बक्षिस जाहीर केलं आहे. या आरोपींची माहिती
मिळाल्यास किंवा आरोपी आढळल्यास सीबीआय आणि मुंबईच्या विशेष गुन्हे शाखेशी संपर्क साधावा,
माहिती देणाऱ्याचं नाव गुप्त ठेवलं जाईल, असं सीबीआयनं म्हटलं आहे.
****
माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी
राज्याचे पहिले मुख्य सेवा हक्क आयुक्त म्हणून काल शपथ घेतली. लोकायुक्त एम. एल. टहलियानी
यांनी क्षत्रिय यांना आयुक्तपदाची शपथ दिली.
****
मराठवाड्याला सातत्यानं दुष्काळाचा
सामना करावा लागल्यानं, मराठवाड्याच्या विकासावर परिणाम झाला आहे, अशी परीस्थिती पुन्हा
निर्माण होऊ नये यासाठी मराठवाडा विकास आराखडा तयार करण्यात आल्याचं, अर्थमंत्री सुधीर
मुनगंटीवार यांनी काल सांगितलं. औरंगाबाद इथं
विभागीय आयुक्त कार्यालयात मराठवाड्याचा २०१७-१८ चा प्रारूप आराखडा आढावा बैठकीनंतर
ते काल वार्ताहरांशी बोलत होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले…
मागच्या
वर्षीचा दुष्काळ आणि त्यातुन शेतकऱ्यांना कुणाला जो त्रास आहे, कष्ट आहे, असं पुन्हा
होऊ नये, यासाठी मग मराठवाड्याचा एक विकास आराखडाही सरकारच्या वतीनं तयार करण्यात आला
आहे. मराठवाड्यामध्ये आपापल्या क्षेत्रामधले रस्ते उत्तम व्हावे, एयुटीच्या माध्यमातून
निधी उपलब्ध होणे, बांधकाम विभागातून दर्जेदार रस्ते करणे आणि गुणवत्तेचे रस्ते आणि
गतिने रस्ते करणे. दुसरा साधारणतः प्रश्न सर्वठिकाणी कॉमन आला, तो वृक्ष लावण्याच्या
संदर्भातला तो वने. तीसरा जो साधारणतः प्रामुख्याने रस्ते आणि यानंतरचा तो सिंचन. तर
सिंचन या विषयाच्या संदर्भामध्ये सरकार तसंही संवेदनशिलतेने या राज्याचं सिंचन वाढावं,
या दृष्टीने काम करत आहे.
मराठवाड्यातल्या
आठही जिल्ह्यांनी एकूण १ हजार ३१३ कोटींचा वार्षिक प्रारूप आराखडा बैठकीत मांडला. वार्षिक
आराखड्याशिवाय काही जिल्ह्यांनी अतिरिक्त निधीची मागणीही या बैठकीत केली.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं
हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार
वेतन दिले जात नसल्यामुळे औरंगाबाद शहरातल्या जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाची
मान्यता, २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून रद्द करण्यात आल्याचं पत्र अखिल भारतीय तंत्र
शिक्षण परिषदेनं काल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलं.
या महाविद्यालयातल्या कर्मचाऱ्यांना
सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्याचे आदेश २०१२ मध्ये न्यायालयानं दिले होते. हा
आदेश सर्वोच्च न्यायालयानंही कायम केला होता. मात्र महाविद्यालयानं या आदेशाची अंमलबजावणी
न केल्यामुळे कर्मचारी संघटनांनी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या
सुनावणी दरम्यान, महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्यात आल्याच्या आदेशाचं पत्र अखिल
भारतीय तंत्र शिक्षण परिषदेनं काल न्यायालयात सादर केलं. यावर न्यायालयानं संबधित संस्था
आणि याचिकाकर्त्यांनी एकत्र बसून तोडगा काढण्याचे निर्देश दिले.
****
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी
देशभरात येत्या ७ मे रोजी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय प्रवेश पात्रता - नीट या परीक्षेसाठी
नांदेड आणि लातूर या ठिकाणी परीक्षा केंद्र उपलब्ध करुन द्यावं अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे
आमदार सतीश चव्हाण यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय
माध्यमिक शिक्षण मंडळ- सी बी एस ई तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली
आहे. या परीक्षेसाठी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी
केवळ औरंगाबाद हे एकच केंद्र असून विद्यार्थ्यांच्या सोईसाठी नांदेड आणि लातूर इथं
देखील केंद्र सुरू करावं असं आमदार चव्हाण यांनी म्हटलं आहे.
****
नियमांचं उल्लंघन करून, शिक्षकांना
वैयक्तिक मान्यता दिल्या प्रकरणी लातूरचे शिक्षण उपसंचालक कैलास गोस्वामी यांना निलंबित
करण्यात आलं आहे. शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी काल त्यांच्या निलंबनाचे
आदेश जारी केले.
****
परभणी शहराच्या कारेगाव रोड भागात महापालिकेच्या
वतीनं जलवाहिनी टाकण्याच्या कामाला महापौर संगीता वडकर यांच्या उपस्थितीत कालपासून
प्रारंभ झाला. हे काम पूर्ण झाल्यानंतर तीनशे घरांना पाणीपुरवठा होणार असून, शहराचा
पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अमृत योजनेअंतर्गत जलवाहिनी टाकण्यात येईल, असं
वडकर यांनी यावेळी सांगितलं.
****
आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या
कुटुंबीयांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध करण्यासाठी उस्मानाबाद इथं माजी
सैनिक संघटनेच्या वतीनं काल मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी परिचारक यांच्या राजीनाम्यासह
त्यांच्याविरोधात कारवाईचीही मागणी केली आहे. या संदर्भात एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत
मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आलं.
****
लातूर इथं कालपासून स्वच्छता सप्ताहाला
प्रारंभ झाला. आठ मार्चपर्यंत हा सप्ताह चालणार आहे. रायगड जिल्ह्यातल्या रेवदंडा इथल्या
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या स्वच्छता दूतांनी या सप्ताहानिमित्त लातूर
शहराच्या विविध भागात स्वच्छता मोहिम राबवून संपूर्ण शहरात स्वच्छतेचा संदेश दिला.
यावेळी आयुक्त रमेश पवार आणि महापौर विधिज्ञ दीपक सूळ उपस्थितीत होते.
//*******//
No comments:
Post a Comment