Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 12 March 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ मार्च २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
सव्वाशे कोटी भारतीयांच्या बळावर आणि त्यांच्या कौशल्यांसह
नव्या भारताचा उदय होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवा भारत
हा विकास घडवणारा असून राष्ट्रनिर्मितीसाठी आपण कटीबध्द असल्याची प्रतिज्ञा नागरिकांनी
नरेंद्र मोदी मोबाईल ॲपवर घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे. २०२२ साली स्वातंत्र्याची
७५ वर्ष साजरी करताना आपण महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर
यांना अभिमान वाटेल असं कार्य केलं पाहिजे असंही पंतप्रधानांनी सोशल मिडीयावर दिलेल्या
संदेशात म्हटलं आहे.
****
नक्षलवादाला
मूळापासून संपवण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी
म्हटलं आहे. नक्षलवाद्यांच्या कारवायांचं प्रमाण कमी झालं असल्याचंही त्यांनी नमूद
केलं. छत्तीसगढ मधल्या रायपूर इथं काल ते बोलत होते. नक्षलग्रस्त राज्यांना या समस्येपासून
मुक्ती मिळावी यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
रायपूर इथं केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जखमी जवानांची भेट घेऊन त्यांनी चौकशी केली.
नक्षलवाद्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असं ते यावेळी म्हणाले.
****
दीर्घकालीन बनावट भांडवली लाभासाठी दावा करणाऱ्या कंपन्यांविरुध्द
दाखल झालेली प्रकरणं दृतगतीनं निकाली काढावीत अशी सूचना केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं
आयकर विभागाला केली आहे. नाममात्र भांडवल असणाऱ्या आणि अनुसूचीमध्ये नसणाऱ्या कंपन्यांमध्ये
गुंतवणूक करणाऱ्या अशा कंपन्या दीर्घकालीन भांडवली लाभ घेण्यासाठी दावा करतात. हा दावा
फेटाळला गेलेल्या प्रकरणांचा निपटारा जलदगतीनं करावा असं मंडळानं म्हटलं आहे.
****
वाढतं
शहरीकरण हे एक मोठं आव्हान असून शाश्वत विकासाच्या दृष्टीनं शहरांमध्ये सक्षम सार्वजनिक
वाहतूक व्यवस्था आणि सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी म्हटलं आहे.
इकॉनॉमिक
टाईम्सच्या वतीनं मुंबई इथं आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. देशात शहरीकरणाचं
प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत पोहचलं आहे. सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या आणि सेवा तसंच वस्तुंचं
मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या शहरांचा योग्य रितीनं विकास झाला पाहिजे, असं त्यांनी
सांगितलं. यासाठी दीर्घकालीन नियोजन आवश्यक असून, मुंबईसह औरंगाबाद, नागपूर आणि नाशिकमध्ये
सांडपाणी प्रक्रियेसह अन्य योजना राबवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं.
****
नाट्य
क्षेत्रातल्या कलाकारांच्या नव्या पिढीला मार्गदर्शन मिळण्यासाठी रंगभूमीवरील मान्यवर
तसंच दिग्गज कलाकारांचे अनुभव ध्वनिचित्रमुद्रीत करून ते संग्रहित करण्यात येणार असल्याची
माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे
२०१६-१७ या वर्षासाठीचा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी पुरस्कार
चंद्रकांत ऊर्फ चंदू डेगवेकर यांना तर नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार
लीलाधर काबंळी यांना मुंबई इथं तावडे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला त्यावेळी
ते बोलत होते.
कालानुरुप झालेले बदल संगीत नाटकांनी
स्वीकारावेत असं सांगत, संगीत रंगभूमीला गौरवावस्था आणून देण्यासाठी शासन सर्वोतपरी
मदत करण्यास तयार असल्याचं तावडे यावेळी म्हणाले.
****
लातूर इथल्या सामजिक न्याय भवनाच्या परिसरात मागासवर्गीय
तरुणांसाठी राज्यातलं पहिलं कौशल्य विकासकेंद्र सुरु करण्याची घोषणा कौशल्य विकासमंत्री
संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे.
लातूर इथं उभारण्यात आलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक
न्याय भवनाच्या इमारतीचं उद्घाटन सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पालकमंत्री
संभाजी पाटील निलंगेकर, खासदार डॉ.सुनिल गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. त्यावेळी
ते बोलत होते.
राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी या केंद्रासाठी सामाजिक
न्याय विभागाच्या वतीनं जागा उपलब्ध करुन दिली जाईल असं सांगितलं. राज्यातलं सरकार
हे मागासवर्गीयांच्या हिताचं काम करणारं असून विकासकामाला कोणीही विरोध करु नये असं
आवाहन केलं.
****
नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर इथल्या मंदिरात दर्शनासाठी
२०० रुपये शुल्क आकारण्याविरुध्द दाखल केलेल्या तक्रारीवर सुनावणी घेण्याचे आदेश मुंबई
उच्च न्यायालयानं मुंबई धर्मादाय आयुक्तांना दिले आहेत. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक
असणारं त्र्यंबकेश्वर मंदिर संरक्षित राष्ट्रीय वारसास्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं
आहे. तिथं दर्शनासाठी शुल्क आकारणं भेदभाव करणारं असल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्त ललिता शिंदे यांनी ही तक्रार केली आहे.
****
No comments:
Post a Comment