Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 13 March 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ मार्च २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
गोवा विधानसभेत काँग्रेसचे सर्वाधिक
१७ आमदार निवडून येऊनही सत्ता स्थापन करू न शकल्याबद्दल नाराज आमदारांच्या गटानं पक्षाच्या
ज्येष्ठ नेत्यांना जबाबदार धरलं आहे. पक्ष नेत्यांनी ही परिस्थिती योग्य पद्धतीनं हाताळली
नसल्याची टीका नवनिर्वाचित आमदार विश्वजीत राणे यांनी पीटीआयशी बोलताना केली. जनतेनं
दिलेल्या मतांचा पक्षाला आदर राखता आला नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या एकमेव महिला
आमदार जेनीफर मोन्सेरात यांनी व्यक्त केली आहे.
गोव्यात भारतीय जनता पक्षाचे
मनोहर पर्रिकर उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून, राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी
त्यांना १५ दिवसांत बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. पर्रिकर यांनी आज सकाळी संरक्षण
मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे संरक्षण
मंत्रिपदाचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला आहे.
****
राज्य सरकार शेतकऱ्यांशी गोड
बोलत अन्याय करत असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार
राजू शेट्टी यांनी केली आहे. ते आज लातूर इथं संघटनेच्या वतीनं काढण्यात आलेल्या शेतकरी
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बोलत होते. यापूर्वीचे कॉंग्रेसआघाडी सरकार दडपशाही करुन
शेतकऱ्यांवर अन्याय करत होते तर विद्यमान युती गोड बोलत अन्याय करत असल्याचं शेट्टी
म्हणाले. राज्य सरकारने नाफेड मार्फत शेतकऱ्यांची तूर सरसकट खरेदी करावी आणि उन्हाळा
सुरु झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या खंडीत करू नयेत, अशी मागणी शेट्टी यांनी
यावेळी केली.
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी
द्यावी, तूर हमी भाव खरेदी योजनेतील जाचक अटी कमी कराव्यात, तुर खरेदी केंद्रावर फक्त
शेतकऱ्यांचीच तूर खरेदी करावी, आदी मागण्यांसाठी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा
मोर्चा काढण्यात आला. संघटनेच्या मागण्याचं निवेदन निवासी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात
आलं.
****
ग्रामीण भागातील महिलांच्या उत्पादनांना
शहरी बाजारपेठेत मोठी मागणी असते, त्यामुळे अशा उत्पादनांच्या विक्रीसाठी जिल्ह्याच्या
ठिकाणी कायमस्वरूपी दालन उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं, कृषि राज्यमंत्री सदाभाऊ
खोत यांनी म्हटलं आहे. ते काल सांगली इथं जिल्हास्तरीय दख्खन जत्रा - २०१७ प्रदर्शन,
विक्री आणि राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते. शालेय पोषण
आहार, स्वस्त धान्य दुकान अशा ठिकाणी स्वयंसहाय्यता बचत गटांना प्राधान्याने संधी दिली
जाईल, असं खोत यांनी सांगितलं.
****
धुलिवंदनाचा सण आज सर्वत्र उत्साहात
साजरा झाला. मित्रमंडळी तसंच स्नेहीजनांना रंग लावण्याचा तरुणांचा तसंच लहानग्यांचा
उत्साह सकाळपासूनच दिसून येत होता. परभणी शहरात बहुतांश नागरिकांनी कोरडा रंग खेळून
पाण्याचा अपव्यय टाळल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
वाशिम जिल्ह्यात राजस्थानी समाज
आणि बंजारा समाजातील होळी प्रसिध्द आहे. जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात रंगोत्सवानिमित्त
पत्यांचा डाव खेळण्याची प्रतिकात्मक पंरपरा असून, नोकरी व्यवसायानिमित्त गाव सोडून
इतरत्र गेलेले नागरिकही ही परंपरा पाळण्यासाठी या सणाला गावात येत असल्याचं, आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर
अप्रिय प्रकार टाळण्यासाठी सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.
****
कोल्हापुरात गेल्या काही वर्षांपासून
होळीचा सण पर्यावरणपूरक आणि प्रदुषणमुक्त पद्धतीनं साजरा केला जातो. केवळ प्रतिकात्मक
स्वरुपात पाच शेणींच्या होळीचं दहन करून, जमा झालेल्या उर्वरित शेण्या पंचगंगा मुक्तिधाम
स्मशानभूमीत दान केल्या जातात. काल होलिकादहनानंतर आज दिवसभरात विविध मंडळांनी सुमारे
सव्वा दोन लाख गोवऱ्या या स्मशानभूमीला दान केल्या. कोल्हापूर महापालिकेकडून सर्व मृतदेहांवर
मोफत अंत्यसंस्कार केले जातात. महापालिकेच्या उपक्रमाला मदत म्हणून हा शेणीदान उपक्रम
राबवला जातो. याशिवाय होळीमध्ये नैवेद्य म्हणून आहुती दिल्या जाणाऱ्या पुरणपोळ्याचं
संकलन करून त्या लहान मुलांसाठी सेवाभावी वृत्तीनं काम करणाऱ्या संस्थांना दिल्या जातात,
यंदा सुमारे पाच हजाराहून अधिक पोळ्या संकलित करून वितरित करण्यात आल्या.
****
महाराष्ट्रात या वर्षभरात जलसंधारणासंदर्भात
व्यापक चळवळ उभी राहण्याची शक्यता, जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी व्यक्त केली आहे.
एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. या चळवळीच्या माध्यमातून
पीकपद्धतीसह सर्वच क्षेत्रात बदल होण्याची अपेक्षा राजेंद्रसिंह यांनी नमूद केली. राज्यसरकारकडून
या क्षेत्रात केल्या जात असलेल्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत, आगामी पाच
वर्षांच्या काळात महाराष्ट्रात पाण्याचं चित्र बदलू शकतं, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या प्रसिद्ध
सैलानीबाबा यात्रेला आजपासून प्रारंभ झाला. जिल्ह्यातल्या पिंपळगाव सराई इथं भरणाऱ्या
या यात्रेसाठी राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांसह शेजारच्या अनेक राज्यातूनही भाविक दाखल
होतात.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पंचायत
समित्यांच्या सभापतीपदांसाठीही उद्या १४ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत
सहाय्यक निवडणूक अधिकारी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहतील.
****
No comments:
Post a Comment