आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
२१ जून २०१७ सकाळी १०.००
वाजता
****
तिसरा आंतरराष्ट्रीय
योग दिवस आज भारतासह इतर अनेक देशांमध्ये साजरा केला जात आहे.योगाला लोकांनी आपल्या
आयुष्याचा एक भाग बनवावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.योगदिनानिमित्त
लखनौ इथे आज सकाळी झालेल्या मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते.योग हा भारतीय जीवनशैलीचा
एक भाग असून त्यामुळे लोक जोडले जातात, असं नमूद करत,योगाच्या जगभरात होत असलेल्या
प्रसारामुळे सगळं जग भारताशी जोडलं जात आहे, असं प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केलं.
मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये वांद्रे इथल्या योग शिबिरात, तर नितीन गडकरी यांनी
नागपूर इथे योगदिनाच्या कार्यक्रमात योगाभ्यास केला. जगभरातल्या सुमारे एकशेऐंशी देशांमध्ये
पाच हजार कार्यक्रमांच्या माध्यमातून आज योग दिवस साजरा केला जात आहे. संयुक्त राष्ट्र
संघानं यावर्षीच्या योगदिनाचं घोषवाक्य “आरोग्यासाठी योग” असं ठेवलं आहे.
दरम्यान, योगाच्या
प्रसार आणि प्रचार कार्यासाठीचा पंतप्रधान पुरस्कार पुण्याच्या राममणि अय्यंगार स्मृती
योगसंस्थेला जाहीर झाला आहे.
****
वस्तू आणि सेवा
कर प्रणालीची सुरुवात येत्या तीस तारखेच्या मध्यरात्री होणार आहे. यासाठी संसदेच्या
मध्यवर्ती सभागृहात एका समारंभाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री
अरुण जेटली यांनी दिली आहे.
****
काश्मीरच्या
बारामुल्ला जिल्ह्यातल्या सोपोर भागामध्ये सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत दोन अतिरेकी
ठार झाले. गुप्तचर यंत्रणांकडून या अतिरेक्यांच्या लपण्याच्या ठिकाणाची माहिती मिळाल्यानंतर
काल रात्री या परिसराला सुरक्षा दलानं वेढा घातला आणि आज सकाळी अतिरेक्यांनी गोळीबार
सुरू केल्यानंतर प्रत्युत्तराच्या कारवाईमध्ये दलानं या अतिरेक्यांना ठार केलं.त्यांच्याकडची
शस्त्रं ताब्यात घेण्यात आली आहेत.
****
पंढरपूर इथे
आषाढी एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर वारकरी आणि भाविकांना पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य
सेवेबाबत आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी काल आढावा घेतला. वारी काळात पंढरपूर शहरात
आरोग्यदूत ही संकल्पना राबविण्यात येणार असून ३० दुचाकींच्या सहाय्यानं आरोग्यदूत,
भाविक आणि वारकऱ्यांना आरोग्य सेवेबाबत सहाय्य करत असल्याची, तसंच संपूर्ण पालखी मार्गावर
आपत्कालीन वैद्यकीय सेवेतल्या ७५ रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या असल्याची माहिती डॉ. सावंत
यांनी दिली.
****
No comments:
Post a Comment