Wednesday, 21 June 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 21.06.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 June 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ जून  २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

जागतिक योग दिनानिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं.योग हा केवळ व्यायामप्रकार नाही तर ती सुदृढ जीवन जगण्याची शैली आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगदिनाच्या कार्यक्रमात बोलताना केलं, तर, योग म्हणजे शरीर आणि मनात परिवर्तन घडवून आणणारी, भारताची पाच हजार वर्षांपासूनची अध्यात्मिक साधना आणि भारतीय संस्कृतीनं जगाला दिलेली अमूल्य देणगी असल्याचं मत महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं.

मंत्रालयाच्या प्रांगणात कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या उपस्थितीत योगदिनाचा कार्यक्रम झाला. औरंगाबाद तसंच वाशीम, रत्नागिरी, अहमदनगर, धुळे यासह लातूर, बुलढाणा आणि पुण्यामध्ये योगदिनाचे कार्यक्रम झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.

****

वस्तू आणि सेवा कर कायद्या संदर्भातल्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी उद्योजकता धोरण मंत्रालयातर्फे पाच सदस्यांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे.
वस्तू आणि सेवा कर कायदा येत्या तीस तारखेच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. उद्योगांना या करप्रणालीची तयारी करण्यासाठी पुरेसा अवधी दिलेला असल्याचं  अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. केंद्रीय सचीव पी.के.सिन्हा यांनी जीएसटीच्या अंमलबजावणीच्या दृष्टीनं काल एक आढावा बैठक घेतली.

****

गेल्या वर्षी आठ नोव्हेंबरपासून चलनातून बाद केलेल्या जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा, येत्या वीस जुलैपर्यंत रिझर्व्ह बँकेत भरण्याची परवानगी सरकारनं बँकांना आणि टपाल कार्यालयांना दिली आहे. बाद नोटा रिझर्व्ह बँकेकडे जमा करण्याची ही दुसरी संधी सरकारनं दिली आहे.मात्र, कोणत्याही बँकेत किंवा टपाल कार्यालयात ३० डिसेंबर २०१६ पर्यंत जमा झालेल्या, तसंच कोणत्याही जिल्हा सहकारी बँकेत १० ते १४ नोव्हेंबर २०१६ या कालावधीत जमा झालेल्या नोटाच अशा प्रकारे भरता येणार असल्याचंही सरकारनं स्पष्ट केलं आहे.याशिवाय या बँकांना किंवा टपाल कार्यालयांना, या नोटा ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत रिझर्व्ह बँकेत जमा न करण्याचं कारणही द्यावं लागणार आहे.

****

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देण्याचा निर्णय संयुक्त जनता दलानं घेतला आहे.या पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक आज दुपारी बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांच्या निवासस्थानी घेण्यात आली, त्यावेळी पक्षानं हा निर्णय घेतला.कोविंद यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचं संयुकत जनता दलाच्या प्रवक्त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

****

मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परिक्षेच्या गुणपत्रिका आणि कल चाचणी अहवाल विद्यार्थ्यांना येत्या चोवीस तारखेला देण्यात येणार आहेत. या दिवशी दुपारी तीननंतर विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळांमधून गुणपत्रिका घ्याव्यात, असं शिक्षण मंडळानं कळवलं आहे.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, शालेय शिक्षणासंदर्भात सरकारनं घेतलेल्या काही निर्णयांचा आढावा घेण्यासाठी, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह एक बैठक घेतली.शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासंदर्भात सरकारनं योजलेल्या उपायांचं यावेळी सादरीकरण करण्यात आलं.शिष्यवृत्तींचं थेट हस्तांतरण करण्याच्या दृष्टीनं विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकांची जोडणी करणं आणि उपस्थितीसाठी बायोमेट्रिक पद्धत वापरणं, या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली.

****

राज्य सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमुक्ती संदर्भात फक्त एक लाख रुपयांच्या निकषासह कर्जमाफीचा प्रस्ताव मांडला असून या प्रस्तावामुळे राज्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांचे सात बारा उतारे कोरे होणार नाहीत, असं सांगत शेतकऱ्यांनी आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. राज्य सरकारनं तत्काळ मदतीसाठी काढलेल्या अध्यादेशाच्या प्रती शेतकऱ्यांनी यावेळी जाळल्या, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

दरम्यान, कर्नाटक सरकारनं आज शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली. प्रत्येक शेतकऱ्याला पन्नास हजार रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारनं आज जाहीर केला. सहकारी बँकांकडून शेतकऱ्यांनी घेतलेली कर्जं राज्यशासनानं माफ केली असून, राष्ट्रीयीकृत आणि ग्रामीण बँकांकडून त्यांनी घेतलेली कर्जं माफ करण्यासाठी आता केंद्रसरकारनं पुढे यावं, असं मत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांनी व्यक्त केलं आहे.

****

आषाढी वारीसाठी पंढरपूर इथे पोहचण्यासाठी पैठणहून निघालेली संत एकनाथ महाराजांची पालखी आज राक्षसभुवन इथून निघून रायमोह इथे मुक्कामासाठी पोहचत आहे. ही पालखी सोळा जूनला पैठणहून रवाना झाली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज मुक्कामाला सासवड इथे तर संत तुकारामांची पालखी आज यवत इथे मुक्कामाला आहे.
****

No comments: