Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 29 June 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ जून २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
गो-रक्षणाच्या नावाखाली लोकांची
हत्या करणं मंजूर नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज गुजरातमधल्या
साबरमती आश्रमाच्या शताब्दी महोत्सवात बोलत होते.
हिंसेमुळे कोणतेच प्रश्न सुटले नाही आणि सुटणारही नाहीत, त्यामुळे कायदा हातात
घेण्याचा कोणालाही अधिकार नाही, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. देशात वाढत चाललेल्या
हिंसेच्या घटनांबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. तत्पूर्वी पंतप्रधानांनी साबरमती
आश्रमातल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन केलं.
****
गेल्या तीन वर्षात देशात झालेला
विकास हा रोजगारविरहीत असल्याचा आरोप, नीति आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगडीया यांनी फेटाळून
लावला आहे. जेव्हा विकास दर सात ते आठ टक्के असतो, तेव्हा त्यात निश्चितच रोजगार निर्माण
होतात, या उपलब्ध रोजगारांची आकडेवारी शोधून काढण्यासाठी सांख्यिकी माहितीचं सुसूत्रीकरण
आवश्यक असल्याचं ते म्हणाले. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीनं आज मुंबईत आयोजित नीति
आयोगाची कार्यक्रम पत्रिका आणि भारतीय अर्थव्यवस्था या चर्चासत्रात ते बोलत होते. भारतातले
बहुतांश उद्योग मध्यम आणि लघु क्षेत्रात असल्यामुळे जागतिक पातळीवर मोठ्या कंपन्यांशी
स्पर्धा करु शकत नाहीत, हे लक्षात घेऊन त्यांना तंत्रज्ञानाच्या वाटेनं सक्षम करणारी
यंत्रणा निर्माण करण्यावर नीति आयोग भर देत असल्याचं पनगडीया यावेळी म्हणाले.
****
भारत ऊर्जा निर्मिती क्षेत्रात
वेगानं प्रगति करत असल्याचं केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते
आज नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात बोलत होते. देशभरात नवीकरणीय ऊर्जा स्त्रोतांसाठी
एक तंत्र स्थापन करणार असल्याचं ते म्हणाले. तसंच देशात वीजेचा वापर देखील वाढला असल्याचं
त्यांनी नमूद केलं.
****
वस्तू अणि सेवा कर - जीएसटी प्रणालीची
औपचारिक सुरुवात उद्या रात्री बारा वाजता संसदेत
होणार आहे. या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला आहे. काँग्रेसचे
नेते गुलाम नबी आझाद यांनी नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. काँग्रेस
अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसच्या ज्येष्ठ
नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी केंद्र सरकारनं मनमोहन
सिंग यांच्यासह एच डी देवेगौडा यांनाही आमंत्रित केलं आहे. तृणमूल काँग्रेसही या कार्यक्रमात
सहभागी होणार नाही.
****
राज्यातला शेतकरी पूर्ण कर्जमुक्त
होईपर्यंत शिवसेनेचा संघर्ष सुरु राहील, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी
म्हटलं आहे. ते आज नांदेड इथं शेतकरी संवाद कार्यक्रमात बोलत होते. २०१७ पर्यंतचा शेतकऱ्यांचा
सातबारा कोरा झाला पाहिजे, या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला. सिंचनाचे प्रकल्प पूर्ण
झाले पाहिजे, शेतकऱ्यांना २४ तास वीज मिळाली पाहिजे, असं ते म्हणाले. ठाकरे आज मराठवाड्याच्या
दौऱ्यावर असून, त्यांनी नांदेडसह, परभणी, हिंगोली आणि जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांशी
संवाद साधला.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा
इथं एका वारकऱ्याचा विहीरीत पडून मृत्यू झाला. आज पहाटे ही दुर्घटना घडली. अहमदनगर
जिल्ह्यातल्या खंडेराय महाराज पालखीतले ते वारकरी होते. तर करमाळा इथल्या तरुण वारकऱ्याचा
फलटण इथं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं.
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातल्या
नाशिक जिल्ह्यातल्या ट्रकचा आज माळशिरस जवळ कळंबनाका इथं अपघात झाला. यात दहा वारकरी
जखमी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या आत्महत्याग्रस्त
शेतकऱ्यांच्या कटुंबियांना सक्षम करण्यासाठी मिशन दिलासा राबवण्याचा निर्णय घेतल्याचं,
बीडचे जिल्हाधिकारी एम डी सिंह यांनी सांगितलं आहे. शेतकऱ्यांचं मनोधैर्य वाढवणं तसंच
त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी मदत करण्यासाठी मिशन दिलासाचा उपयोग होणार
असल्याचं ते म्हणाले. जिल्ह्यातल्या पात्र आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसाला एक
लाख रुपये आर्थिक मदत दिली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
येत्या एक जुलैपासून राज्यात
चार कोटी वृक्ष लागवड मोहिमेची सुरुवात होणार आहे. नांदेड जिल्ह्यात या मोहिमेचा शुभारंभ
पालकमंत्री अर्जून खोतकर यांच्या हस्ते होणार आहे. जिल्ह्याला दिलेलं वृक्षारोपणाचं
उद्दीष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं योग्य नियोजन केलं असून, नागरिकांनी या
मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केलं आहे.
****
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता
अभियान आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत नाशिक विभागात नगर तालुक्यातलं
हिवरेबाजार प्रथम आलं आहे. हिवरेबाजारला दहा लाख रुपयांचं बक्षिस जाहीर झालं आहे. आदर्शगाव
हिवरेबाजारनं स्वच्छतेची गरज आणि त्यातील सातत्य टिकवून ठेवलं आहे. १९९२ मध्ये ग्राम
अभियानात विभागात प्रथम येऊन याची सुरुवात झाली होती.
****
No comments:
Post a Comment