Thursday, 29 June 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 29.06.2017 - 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 June 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ जून २०१ दुपारी .००वा.

****

उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक पाच ऑगस्टला होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. मतमोजणीही पाच ऑगस्टलाच होणार असून, उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १८ जुलै असल्याचं झैदी यांनी सांगितलं. उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ १० ऑगस्टला संपणार आहे.  

दरम्यान, राष्ट्रपती पदाच्या उमेदवारांचे नामांकन अर्ज आज तपासले जाणार आहेत. येत्या १७ जुलैला मतदान आणि २० जुलैला मतमोजणी होणार आहे.

****

वस्तू आणि सेवा कर प्रणाली - जीएसटी एक जुलै पासून लागू करण्याची अधिसूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. जीएसटीमध्ये उत्पादन शुल्क, सेवा कर आणि व्हॅट सारखे अप्रत्यक्ष कर समाविष्ट करण्यात आले आहेत. जीएसटीची औपचारिक सुरुवात उद्या रात्री बारा वाजता केली जाणार आहे. 

****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोच्या अत्याधुनिक संचार उपग्रह जीसॅट १७चं आज फ्रेंच गयानामधून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. ‘एरियन- पाच’ या प्रक्षेपकाच्या माध्यमातून जीसॅट १७ हा उपग्रह अवकाशात झेपावला. या उपग्रहाचं वजन जवळपास तीन हजार ४७७ किलोग्रॅम इतकं आहे. यात हवामानासंबंधी माहिती मिळवण्यासाठी उपकरणही बसवण्यात आलं आहे.

****

‘इंडिया टुडे‘ तर्फे २०१७-१८ या शैक्षणिक वर्षातल्या भारतीय विद्यापीठांचे राष्ट्रीय क्रमांक घोषित करण्यात आले आहेत. यात औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं देशात २१वा क्रमांक पटकावला आहे. कुलगुरु डॉ.बी.ए.चोपडे यांनी ही माहिती दिली. शंभर गुणांच्या या मानांकनासाठी एकुण ११ मापदंड निश्चित करण्यात आले होते.

****

वीज चोरी आणि अवैध दारु विक्री या दोन विषयांवर शासन गंभीर असून, वीज चोरांवर गुन्हे नोंदवण्यासाठी राज्यातल्या सर्व पोलिस स्थानकांना अधिकार देण्यात आले असल्याचं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. ते आज उस्मानाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ८२२ शाळांमध्ये सौर ऊर्जेवर वीज पुरवठा करण्यासाठी दोन कोटी रुपयांचं अनुदान मंजूर केल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातली मद्य विक्रीची दुकानं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य महामार्गापासून ५०० मीटर अंतरावर नेण्यात आल्यामुळे १५ हजार कोटी रुपयांचा महसूल कमी झाला असल्याचं सांगून, याबाबतच्या नियमात बदल करुन सात हजार दुकानं पुन्हा सुरु करण्यात येतील, असं मुनगंटीवार यावेळी म्हणाले.    

****

आषाढी वारीसाठी निघालेली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज नातेपुते इथून माळशिरसकडे मार्गस्थ झाली. वाखरी इथं पालखीचं दुसरं उभं रिंगण होणार आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी आज सराटीहून निघून अकलूजला पोहोचली. पालखीचं गोल रिंगण अकलूज इथं पार पडलं. पैठणहून निघालेली संत एकनाथ महाराजांची पालखी आज बिटरगावचा मुक्काम आटोपून कुर्डूकडे मार्गस्थ झाली. पालखीचा चौथा रिंगण सोहळा कव्हेदंड इथं पार पडला. 

****

राज्यातल्या सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था - आय टी आय आणि शासकीय तांत्रिक विद्यालयांमधल्या प्रशिक्षणार्थ्यांना चालू वर्षापासून जीवन गट विमा योजना लागू करण्यासाठी लवकरच कार्यवाही केली जाईल, अशी माहिती, कौशल्य विकास, आणि उद्योजकता राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी दिली आहे. ते मुंबई इथं कौशल्य विकास विभागाच्या बैठकीत बोलत होते.

****

महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळामध्ये नोंदणी केलेल्या कामगारांना, ‘सर्वांसाठी घर’ या योजनेच्या माध्यमातून घरं उपलब्ध करुन देण्याबरोबरच, असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा पुरवण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामगार विभागाला दिले आहेत. महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या कामकाजाचा आढावा बैठकीत ते बोलत होते.

****

औरंगाबाद महापालिकेनं ११ जुलैपर्यंत १२ हजार स्वच्छता गृहांच्या उभारणीचं उद्दिष्ट पूर्ण करावं, असे आदेश राज्य शासनातर्फे देण्यात आले आहेत. मनपा हद्दीत १२ हजार शौचालयं उभारणीचं उद्दिष्ट असताना, आतापर्यंत फक्त सहा हजार स्वच्छता गृह कागदावर उभारण्यात आले आहेत. ज्या लाभार्थ्यांनी मनपाकडून पैसे घेऊनही शौचालयांचं बांधकामच केलं नाही, त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्याचा विचारही मनपा प्रशासन करत आहे.

****

लंडन इथं सुरु असलेल्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा दुसरा सामना वेस्ट इंडिज विरुद्ध होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल. याधीच्या सामन्यात भारतानं इग्लंडचा पराभव केला होता.

****

No comments: