Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 June 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ जून २०१७ दुपारी १.००वा.
****
देशाचं वैविध्य हे देशाचं वैशिष्ठ्य आणि ताकद असल्याचं पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणी वरून प्रसारित झालेल्या मन की बात या कार्यक्रमात
ते आज बोलत होते. या मालिकेचा ३३वा भाग आज प्रसारित झाला. आज साजरी होत असलेली जगन्नाथ
रथयात्रा तसंच उद्या साजऱ्या होणाऱ्या रमजान ईद निमित्त पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या.
सिक्कीम, हिमाचल प्रदेश, केरळ, उत्तराखंड आणि हरियाणा ही पाच राज्यं उघड्यावर शौचापासून
पूर्णपणे मुक्त झाल्याचं सांगत, पंतप्रधानांनी या राज्यांचे आभार मानले.
गेल्या बुधवारी २१ जून रोजी जागतिक योग दिनाचं औचित्य साधून
संपूर्ण जग योगमय झालं होतं, याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान असल्याचं ते म्हणाले.
प्रत्येक कार्यक्रमात पुष्पगुच्छ देण्याऐवजी पुस्तक किंवा खादीचा रुमाल दिला तर वाचनाचा
आणि खादीचा प्रचार होईल, असं ते म्हणाले.
केंद्र सरकारनं ई जी ई एम ही यंत्रणा सुरु केली असून, या माध्यमातून
नागरिकांना कोणत्याही वस्तू सरकारला विकता येतील, असं त्यांनी सांगितलं.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं एकावेळी ३१ उपग्रहांचं
प्रक्षेपण केल्याबद्दल पंतप्रधानांनी इस्रोचं अभिनंदन केलं. तसंच १९ जूनला भारताच्या
मंगळ मोहिमेला एक हजार दिवस पूर्ण झाल्याचाही त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.
१९७५ साली आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू झाली होती, त्यावरही
पंतप्रधानांनी भाष्य केलं.
इंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी
बॅडमिंटनपटू किदंबी श्रीकांतचं अभिनंदन केलं. मुलांमधल्या क्रीडागुणांना प्रोत्साहन
दिलं पाहिजे, असं ते म्हणाले.
****
दरम्यान, के श्रीकांतनं ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं
विजेतेपद पटकावलं आहे. आज सिडनी इथं झालेल्या अंतिम सामन्यात श्रीकांतनं चीनच्या चेन
लांग याचा २२-२०, २१-१६ असा पराभव केला. श्रीकांतचं हे सलग दुसरं विजेतेपद आहे.
****
दरम्यान, पंतप्रधान आज सकाळी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन इथं
पोहोचले. ते आज विविध कार्यक्रमात सहभाग घेणार असून, उद्या अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड
ट्रम्प यांची ते भेट घेणार आहेत. दोन्ही देशांमधले संबंध बळकट करणं, हा अमेरिका दौऱ्याचा
प्रमुख हेतू हा असून, त्या संबंधांचा फायदा भारताला आणि जगालाही होईल, असं पंतप्रधानांनी
ट्विटरवर म्हटलं आहे.
****
ओडिशात जगन्नाथ पुरी इथली वार्षिक जगन्नाथ रथयात्रा आजपासून
सुरू झाली. या महोत्सवात दहा लाखांहून अधिक भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे. या रथ
यात्रेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
****
राज्यात पावसानं काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा आगमन
केलं आहे. मुंबई आणि नवी मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. रायगड जिल्ह्यातही
पेण, पनवेल, मुरुड, महाड याठिकाणी काल रात्रीपासून सुरू झालेला पाऊस सकाळपर्यंत सुरू
होता. धुळे जिल्ह्यात धुळे, शिरपूर, साक्री आणि शिंदखेडा तालुक्यात पहाटेपासून काही
भागात पाऊस सुरू आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब आणि वाशी तालुक्यात मध्यम स्वरुपाचा
पाऊस सुरु आहे. लातूर इथंही पाऊस नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेली संतश्री ज्ञानेश्वर महाराजांची
पालखी आज सातारा जिल्ह्यातल्या पडेगाव इथून लोणंदकडे मार्गस्थ झाली. माऊलींच्या पालखी
सोहळ्यातलं पहिलं उभं रिंगण आज चांदोबाचा लिंब इथं होणार आहे. संतश्री तुकाराम महाराजांची
पालखी बारामतीचा मुक्काम आटोपून आज सणसरकडे मार्गस्थ झाली. पैठणहून निघालेली संतश्री
एकनाथ महाराजांची पालखी आज खर्ड्याहून दांडेगावकडे मार्गस्थ झाली.
****
कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करताना
तज्ज्ञांचा अभिप्राय विचारात घेतला जाईल, अशी ग्वाही देवस्थान समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी
अविनाश सुभेदार यांनी दिली आहे. मूर्तीचं संरक्षण होण्यासाठी डॉ.श्रीकांत मिश्र यांनी
केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पुजाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे,
तसंच देवीला साडी व्यतिरिक्त इतर पोषाख घातल्याबद्दल पुजारी बाबुराव ठाणेदार आणि अजित
ठाणेदार यांना या संदर्भातला अंतिम निर्णय होईपर्यंत मंदीरात प्रवेश करण्यास बंदी घातली
असल्याचं सुभेदार यांनी सांगितलं.
****
जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर इथं आज पहाटे एका शाळेत दहशतवादी
आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक झाली. काल संध्याकाळी सुरक्षा दलाच्या ताफ्यावर हल्ला
करून पसार झालेले दहशतवादी एका शाळेत लपले असल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना
मिळाली. त्यानंतर या भागात गोळीबार सुरू झाला. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोन
कॅमेरा आणि अन्य आधुनिक उपकरणांचा वापर करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं
आहे.
****
No comments:
Post a Comment