Wednesday, 28 June 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 28.06.2017 - 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 June 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ जून २०१ दुपारी .००वा.

****

भारताला अणुपुरवठादार देशांच्या समूहात लवकर प्रवेश मिळावा, तसंच संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचं कायम सदस्यत्व मिळावं, या बाबींना नेदरलँड्सनं पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे नेदरलँड्सचे समकक्ष मार्क रूट यांच्या भेटीनंतर काल जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. जगातल्या वाढत्या दहशतवादाबद्दल दोन्ही देशांनी चिंता व्यक्त केली असून, दहतवादामध्ये चांगला आणि वाईट असा फरक करता येणं शक्य नाही, असं म्हटलं आहे. या नेत्यांच्या भेटीदरम्यान या दोन देशांमध्ये तीन सामंजस्य करार करण्यात आले.

****

राष्ट्रपतीपदाच्या विरोधी पक्षांच्या उमेदवार मीरा कुमार यांनी आज आपलं नामांकनपत्र दाखल केलं. यावेळी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी, काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि अन्य विरोधी पक्षांचे अनेक नेते उपस्थित होते.

****

नईम खान आणि बिट्टा कराट या दोघांसह तीन हुरियत नेत्यांना आज श्रीनगर पोलिसांनी अटक केली. अतिरेक्यांना आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या हुरियत नेत्यांना आता राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या चौकशीसाठी आज दिल्लीला आणण्यात येणार आहे.

****

काल जगभरात झालेल्या पेट्या रॅमसनवेअर सायबर हल्ल्याचा परिणाम भारताच्या सर्वात मोठ्या बंदरावर म्हणजे, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या कामकाजावर झाल्यामुळे तिथलं कामकाज ठप्प झाल्याचं वृत्त आहे. या हल्ल्याचा परिणाम इंग्लंड, रशिया, फ्रान्स आणि स्पेन या देशांच्या बेंका आणि वीज कंपन्यांसह इतर अनेक सेवांवर झाला आहे. युक्रेन या देशातल्या कामकाजावर या हल्ल्याचा सर्वात जास्त परिणाम झाला आहे.

****

मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी मुस्तफा डोसा यानं छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यामुळे त्याला मुंबईच्या जे.जे. हॉस्पिटलमध्ये आज दाखल करण्यात आलं. या बाँबस्फोट प्रकरणाची सध्या विशेष टाडा न्यायालयात सुनावणी सुरू असून, केंद्रीय अन्वेषण विभागानं डोसा याला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी न्यायालयातल्या युक्तिवादादरम्यान केली आहे.

****

मुंबईतल्या भायखळा कारागृहातल्या मंजू शेट्टे या महिला कैद्याचा, तुरुंगाधिकाऱ्यांच्या कथित मारहाणीमुळे मृत्यू झाल्याच्या घटनेची दखल घेत, राज्य महिला आयोगानं राज्याचे पोलिस महासंचालक आणि अन्य दहा पोलिस अधिकाऱ्यांना उद्या आयोगासमोर हजर राहण्याची नोटिस दिली आहे. दरम्यान, या घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्या आणि आमदार नीलम गोऱ्हे, यांनी केली आहे. आपण विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यासंदर्भात तुरुंगातल्या प्रत्यक्षदर्शींचे इनकॅमेरा जबाब घ्यावेत, अशी मागणीही गोऱ्हे यांनी केली आहे. या प्रकरणी तुरुंगातल्या सहा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

****

येत्या एक जुलैपासून लागू होणार असलेल्या वस्तू आणि सेवा कराच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय औषधी दर नियंत्रण मंडळानं सातशे एकसष्ठ औषधांच्या उच्चतम किमती जाहीर केल्या आहेत. यामध्ये कॅन्सर, एडस, मधुमेह यावरच्या औषधांचा तसंच प्रतिजैविकांचा समावेश असून, यातील बहुतेक औषधांच्या किमतींमध्ये मंडळानं घट केली आहे. वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर औषधांच्या किमतीमध्ये साधारण दोन ते तीन टक्क्यांचा फरक होणं अपेक्षित आहे, असं मंडळानं म्हटलं आहे.

****

करदात्यांनी आपल्या आधार क्रमांकाची पॅन क्रमांकाशी येत्या एक जुलैपर्यंत जोडणी करणं सरकारनं अनिवार्य केलं आहे, आयकरासंदर्भातल्या नियमांमध्ये सरकारनं सुधारणा केली असून,आता पॅनसाठी अर्ज करताना आधार क्रमांक देणं अनिवार्य असेल. येत्या एक जुलैपासून, आयकर परताव्यासाठी आणि पॅन मिळवण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य असेल, असं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं स्पष्ट केलं आहे.

****

मुंबईमध्ये काल आणि आज सुरू असलेल्या पावसामुळे तिथल्या लोकल रेल्वेची वाहतूक मंदावल्याचं वृत्त आहे. तर येत्या चोवीस तासात राज्यात अनेक भागात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामानखात्यानं वर्तवला आहे. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत १६१ पूर्णांक ९६ शतांश मिलीमीटर एवढा पाऊस झाला असून, तो एकूण वार्षिक सरासरीच्या  १६ पूर्णांक ९५ शतांश टक्के एवढा आहे. धुळे जिल्ह्यात आतापर्यंत १४ पूर्णांक ७५ टक्के एवढा पाऊस झाला आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळांचा जोर वाढला असून बऱ्याच ठिकाणी पडझड झाली आहे. तर काही ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments: