Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 June 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ जून २०१७ दुपारी १.००वा.
****
आंतरराष्ट्रीय योगदिवसानिमित्त आज जगभरातल्या अनेक देशांमध्ये
कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी योगासनं केली. तर प्रवासी भारतीय केंद्रात आयोजित करण्यात
आलेल्या कार्यक्रमामध्ये अनेक देशांच्या राजदूतांनी योगासनं केली. संयुक्त अरब अमिरातीमध्ये
झालेल्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश वाचून दाखवण्यात आला.
या कार्यक्रमाला पंधरा हजारहून जास्त लोक उपस्थित होते. बांगला देशात झालेल्या योगदिनाच्या
कार्यक्रमात तीन हजारहून जास्त तर साऊथ आफ्रिकेमध्ये बाराशेहून जास्त लोकांनी योगासनं
केली. चीनच्या प्रसिद्ध भिंतीवर तसंच ब्रिटनच्या प्रसिद्ध लंडन आय अर्थात सहस्त्रक
चक्र या ठिकाणीही योगासनं करण्यात आली. दिल्लीपासून न्यूयॉर्कपर्यंत तसंच पॅरिसपासून
पनामापर्यंत जगभरातल्या एकशे ऐंशी देशांमध्ये आज योगदिन साजरा होत आहे. भारताच्या नौसैनिकांनी
आयएनएस विक्रमादित्य आणि जलाश्व या युद्धनौकांवर योगासनं केली. इंडो-तिबेटियन सीमा
सुरक्षा दलाच्या सैनिकांनी लडाख मध्ये उणे पंचवीस तापमानात योगासनं केली.
****
मुंबईमध्ये मुंबई पोलिसांनी आयोजित केलेल्या योगदिनाच्या कार्यक्रमामध्ये
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार आशिष शेलार आणि खासदार पूनम महाजन यांनी भाग घेतला.दिव्यज
फाऊंडेशनतर्फे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसोबत आयोजित केलेल्या योगदिनाच्या
कार्यक्रमालाही मुख्यमंत्री, पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह उपस्थित राहिले. मुंबईतल्या
डोंगरी इथल्या बालगृहात झालेल्या कार्यक्रमात महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे
यांनी सहभाग घेतला
****
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला आपला
पूर्ण पाठिंबा असल्याचं शिवसेनेनं जाहीर केलं आहे, तर काँग्रेसनं या मुद्द्यावर विचारविमर्ष
करण्यासाठी उद्या पक्षाची एक बैठक बोलावली आहे.बिहारमध्ये पटणा इथे आज या मुद्द्यावर
सत्तारूढ संयुक्त जनता दलाची बैठक होत आहे.
****
थकबाकीदार शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी तातडीनं कर्ज देण्यासाठीच्या
निकषात बदल करण्यात आले आहेत. आता चार लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना,
हे कर्ज मिळू शकणार आहे. वार्षिक उत्पन्न चार लाख रुपयांच्या आत असलेले डॉक्टर, वकील,
शिक्षक, व्यावसायिक किंवा शासकीय कर्मचारी असलेले शेतकरीही या कर्जासाठी पात्र असतील.
याबाबतचा शासननिर्णय काल जारी करण्यात आला. आजी माजी लोकप्रतिनिधी मात्र या योजनेसाठी
अपात्र असतील
****
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेची
व्याप्ती वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. आता कृषी तसंच संलग्न पदवी अभ्यासक्रमाच्या
पात्र विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळेल. काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा
निर्णय घेण्यात आला. पदविकाधारक विद्यार्थ्यांना पदवी प्रवेशासाठी, दहावी ऐवजी, पदविकेच्या
शेवटच्या वर्षात ५० टक्के गुण मिळवणं आवश्यक असेल. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणांची
अट शिथिल करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
****
योगाच्या प्रसार आणि प्रचारासाठीचा पंतप्रधान पुरस्कार पुण्याच्या
राममणि अय्यंगार स्मारक योगसंस्थेला जाहीर झाला आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी हा पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केली होती. या संस्थेनं गेल्या चाळीस वर्षांमध्ये
देशात तसंच परदेशांमध्ये केलेल्या योगप्रसाराच्या
कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार दिला गेला आहे. देशभरातून प्राप्त झालेल्या शंभर
नामांकनांमधून या संस्थेची निवड या पुरस्कारासाठी झाली.
****
चौदा खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत केंद्र सरकारनं वाढ
केली आहे. यामध्ये भात, ज्वारी, सोयाबीन, कापूस उडीद, तूर, मूग या पिकांचा समावेश आहे.
भाताच्या प्रति क्विंटल किमतीत ८० रुपयांची, डाळीसाठी ४०० रुपयांची, सोयाबीनसाठी पावणे
तिनशे रुपयांची तर कापसाच्या किमान आधारभूत किमतीत प्रतिक्विंटल एकशे साठ रुपयांची
वाढ करण्यात आली आहे.
****
मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योनजा ही नवीन योजना राज्यात
राबवण्यास राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी
तसंच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेतीमालाची गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीनं शासनानं
ही योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये फळं आणि भाजीपाला यांच्यासाठीचे
प्रक्रिया प्रकल्प उभारले जाणार आहेत. २०१७-१८ पासून पुढची पाच वर्ष ही योजना राबवण्यात
येणार आहे.
****
No comments:
Post a Comment