Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 AUG. 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ ऑगस्ट २०१७ सकाळी ६.५० मि.
****
** चांगल्या पावसामुळे खरीपाच्या पेरणी क्षेत्रात वाढ; १३ कोटी ८० लाख टन अन्नधान्य
उत्पादनाचा कृषी मंत्रालयाचा अंदाज
** गणेशोत्सवासाठी सार्वजनिक
गणेश मंडळांनी अधिकृत तात्पुरती वीज जोडणी घेण्याचं
महावितरण कंपनीचं आवाहन
** तिसऱ्या राष्ट्रीय हातमाग दिनाचं आज आयोजन; पैठणला विशेष कार्यक्रम
आणि
** भारताचा
श्रीलंकेवर एक डाव आणि ५३ धावांनी विजय, तीन कसोटी
क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी
****
चालू खरीप हंगामात जास्तीत जास्त क्षेत्र लागवडीखाली आल्यानं आणि चांगल्या पावसामुळे
१३ कोटी ८० लाख टन एवढं अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज कृषी मंत्रालयानं व्यक्त केला आहे.
कृषी सचिव शोभना पटनायक यांनी काल नवी दिल्लीत वार्ताहरांना ही माहिती दिली. देशात
आतापर्यंत ८० टक्के खरीप पिकांची पेरणी झाली असून, यात प्रामुख्यानं भात, डाळी, तेलबिया,
कापूस, ऊस आणि ताग यांचा समावेश आहे. उर्वरीत २० टक्के भागातही पुढल्या महिन्यापर्यंत
लागवडीचं काम पूर्ण होईल, असं पटनायक यांनी सांगितलं. पूरस्थितीचा देशभरातल्या १९ लाख
हेक्टरवरच्या पिकांवर परिणाम झाला असून पाणी पातळी कमी झाल्यानंतर या भागात दुसरी खरीपाची
पिकं घेतली जातील, असंही त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत अन्नधान्य उत्पादन
जास्त होईल असं त्या म्हणाल्या.
****
एका वर्षात दोन लाख टनांपेक्षा जास्त तूर डाळीची आयात न करण्याची मर्यादा केंद्र सरकारनं घातली
आहे. सरकारनं तूर डाळीची आयात, ही प्रतिबंधित श्रेणीत वर्ग केली आहे. यासंदर्भातली अधिसूचना विदेश व्यापार संचालनालयानं जारी केली आहे.
****
केंद्र सरकारच्या निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आता
निवृत्तीवेतन सुरू करण्यासाठी
बँकेमध्ये वारंवार चकरा मारण्याची आवश्यकता
भासणार नाही. सेवानिवृत्त
होत असलेल्या कर्मचाऱ्यांना बँकांबरोबरच त्यांनाही सेवानिवृत्तीच्यावेळी निवृत्ती वेतन आदेश म्हणजेच
पीपीओची प्रत दिली जाईल. बँकांना
जर ही प्रत उपलब्ध झाली नाही तर कर्मचारी आपल्याजवळची प्रत उपलब्ध करून देऊन निवृत्ती
वेतन सुरू करण्यास बँकांना सांगू शकेल. कार्मिक मंत्रालयानं यासंबंधीच्या नियमात बदल केले असून केंद्र
सरकारच्या सर्व विभागांना याबाबतचे निर्देश दिले आहेत.
****
अमरनाथ
यात्रेकरुंवर गेल्या महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी जम्मू काश्मीरच्या
विशेष तपास दलानं तीन जणांना अटक केली आहे. या तिघांनी लष्कर ए तय्यबाच्या चार दहशतवाद्यांना
मदत केली असल्याचं तपासात उघड झाल्याचं पोलिस महासंचालक मुनीर खान यांनी सांगितलं.
१० जुलैला झालेल्या या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला, यामध्ये महाराष्ट्रातल्या दोन
महिलांचा समावेश होता. दरम्यान, पवित्र छडी मुबारक काल अमरनाथ गुहेकडे रवाना झाली. आज श्रावण
पौर्णिमेला विधीवत पुजेनंतर अमरनाथ यात्रेची सांगता होत आहे.
****
सार्वजनिक
गणेश मंडळांनी गणेशोत्सव काळात अधिकृतरित्या तात्पुरती वीज जोडणी घ्यावी, असं आवाहन
महावितरण कंपनीनं केलं आहे. चार रुपये ३१ पैसे प्रतियुनीट या सवलतीच्या दरात मंडळांना
वीज पुरवठा उपलब्ध करून दिला जाणार आहे. धार्मिक उत्सवांसाठी अधिकृतच वीज पुरवठा घ्यावा आणि सार्वजनिक सुरक्षेला प्राधान्य द्यावं, यासाठी
तात्पुरत्या वीज जोडणीचा दर वाणिज्यिक
दरापेक्षा कमी ठेवण्यात आला असल्याचं महावितरणकडून सांगण्यात आलं आहे.
****
येत्या ९ ऑगस्टला मुंबईत काढण्यात येणाऱ्या मराठा समाजाच्या
राज्यव्यापी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर काल मुंबई, ठाणे, पुणे, यवतमाळ आणि अकोला इथं
जनजागृतीसाठी वाहन फेरी काढण्यात आली. विविध घोषणा देत काढण्यात आलेल्या या फेरीत मोठ्या
प्रमाणात लोक सहभागी झाले होते.
****
तिसरा राष्ट्रीय हातमाग दिन आज देशभरात साजरा केला जात
आहे. सात ऑगस्ट या दिवसाला भारतीय इतिहासात वेगळे महत्त्व असून १९०५ मध्ये याच दिवशी
महात्मा गांधी यांनी स्वदेशी चळवळीला प्रारंभ केला होता. विविध स्वदेशी वस्तुंची निर्मिती
आणि प्रकल्पांना पुनर्जिवित करण्याच्या उद्देशानं ही चळवळ सुरू झाली होती. या घटनेची
आठवण म्हणून केंद्र सरकारनं २०१५ पासून हा दिवस साजरा करण्यास प्रारंभ केला आहे. देशातला
मुख्य समारंभ गुवाहटी इथं होत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथंही राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त
विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यत आलं आहे. मराठी पैठणी केंद्रात आयोजित या कार्यक्रमाचं
उद्घाटन राज्याचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते सकाळी अकरा
वाजता होणार आहे. याप्रसंगी खासदार रावसाहेब दानवे, आमदार संदिपान पाटील भुमरे आणि
महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शिवाजी दौंड यांची प्रमुख
उपस्थिती असणार आहे.
****
रक्षाबंधनाचा
सण आज साजरा होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांनी देशवासियांना रक्षाबंधनाच्या
शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण प्रेम, विश्वास, आनंद आणि समृद्धीचं प्रतीक असल्याचं राष्ट्रपतींनी
आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. देशातल्या नागरिकांमध्ये बंधुत्वाची भावना वाढवण्यासाठी
हा दिवस महत्वाचा असल्याचं ते म्हणाले.
****
हे
बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
कत्तलखान्याकडे गुरं घेऊन जाणाऱ्या व्यक्तिंविरुध्द गुन्हा
दाखल केल्यानंतर आरोपींनी पोलीस ठाण्यासमोरच फिर्यादींवर हल्ला करण्याची घटना अहमदनगर
जिल्ह्यातल्या काष्टी इथं काल घडली. यामध्ये सात जण जखमी झाले. याप्रकरणी श्रीगोंदा
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केल्याची माहिती, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी दिली.
काष्टीच्या बाजारातून कत्तलखान्याकडे गुरं घेऊन जात असल्याचं शिवकुमार स्वामी आणि मिलिंद
एकबोटे यांच्या कार्यकत्यांना समजल्यानंतर, त्यांनी गुरं घेऊन जाणारा टेंपो अडवून पोलीस
ठाण्यात आणला. त्यांनतर त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर
ठाण्याच्या बाहेर आल्यावर त्यांच्यावर हा हल्ला झाला. त्यांना अधिक उपचारासाठी पुण्याला
पाठवण्यात आलं असून, याप्रकरणी पोलिसांनी २३ हल्लेखोरांविरुध्द विविध कलमांअंतर्गत
गुन्हा दाखल केला आहे.
****
भारतानं
श्रीलंकेवर कोलंबो
कसोटीत क्रिकेट सामन्यात एक डाव आणि ५३ धावांनी
विजय मिळवत, तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.
रवींद्र जडेजानं दुसऱ्या डावात केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतानं दुसऱ्या
कसोटी सामन्यात श्रीलंकेवर हा
विजय मिळवला. भारतानं आपला
पहिला डाव ६२२ धावांवर घोषित केल्यानंतर श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात १८३ धावाच
करु शकला. त्यानंतर फॉलोऑन मिळालेला श्रीलंकेचा संघ दुसऱ्या डावात ३८६ धावांवर सर्वबाद
झाला. दुसऱ्या डावात जडेजानं पाच, रविचंद्रन अश्विन आणि हार्दिक पंड्यानं प्रत्येकी
दोन, तर उमेश यादवनं एक बळी घेतला. पहिल्या डावात ७० धावा आणि सामन्यात सात बळी घेणारा
रविंद्र जडेजा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना
येत्या १२ तारखेपासून पल्लेकेले इथं सुरु होणार आहे. दरम्यान, फलंदाज मर्यादा रेषेत असताना देखील त्याच्या दिशेने चेंडू
फेकल्याच्या कारणावरून जडेजावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं शिस्तभंगाची कारवाई
करत, त्याला तिसऱ्या कसोटीसाठी संघातून निलंबित केलं आहे.
****
संविधान बदलण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला जाणार नाही,
असं प्रतिपादन जवाहरलाल नेहरू विद्यापीठातले विद्यार्थी नेते कन्हैय्याकुमार यांनी
केलं आहे. बीड इथं संविधान बचाव कृती समितीच्या वतीनं आयोजित संविधान बचाव रॅली आणि
रोहित ॲक्ट परिषदेत ते काल बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
दरम्यान, आज औरंगाबाद शहरात कन्हैय्याकुमार यांचे दोन
कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, यामध्ये दुपारी ४ वाजता संविधान बचाव युवा परिषद
होणार असून सकाळी साडेदहा वाजता सुधाकर शेंडगे यांनी अनुवादित केलेल्या बिहार ते तिहार
या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचं प्रकाशन होणार आहे.
****
राष्ट्रव्यापी
स्वदेशी आणि सुरक्षा अभियानाला आजपासून प्रारंभ होत असून येत्या २१ ऑगस्टपर्यंत ते
सुरु राहणार आहे. स्वदेशी जागरण मंचातर्फे आयोजित या अभियानाबाबत काल औरंगाबाद इथं
मंचाचे प्रांत संयोजक अमोल पुसदकर यांनी ही माहिती दिली. स्वदेशी वस्तुंचा वापर वाढवण्यासोबतच
विदेशी विशेषत: चिनी वस्तुंवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन त्यांनी केलं.
अभियानाद्वारे
विविध कार्यालयं, शैक्षणिक संस्था यामध्ये स्वदेशी वापराबाबत जनजागृती केली जाईल, असं
ते म्हणाले.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यातला तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना अवसायनात काढण्यात आला आहे. नांदेडच्या
प्रादेशिक साखर सहसंचालकांनी या कारखान्यावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी
संचालक व्ही.एस. घोणसे यांची अवसायक म्हणून नियुक्ती केली आहे. सोलापूरच्या भविष्य निर्वाह निधी
कार्यालयानं या कारखान्याला टाळं लावलं असून सध्या तो बंद आहे. कारखान्यावर
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचं शंभर कोटी रूपयांपेक्षा अधिक थकित कर्ज
आहे.
****
औषध विक्रीचा व्यवसाय करताना नफ्याबरोबरच ग्राहकांच्या
समाधानाचा विचार होणे आवश्यक असल्याचं मत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त
केलं आहे. ते काल सांगली जिल्ह्यातल्या विटा इथं औषध विक्रेता संघटनेच्या राज्यस्तरीय
परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. औषध विक्रेत्या संघटनेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी
कटिबध्द असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. व्यावसायिक नफ्याबरोबर व्यवसायाचा
दर्जा वृध्दिंगत होण्याच्या दृष्टीने राबवण्यात आलेले पेशंट कौंसिलिंग सेंटर, ड्रग
इन्फॉर्मेशन सेंटर यासारखे उपक्रम स्तुत्य असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं.
****
No comments:
Post a Comment