Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 26 August
2025
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ ऑगस्ट
२०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
नागरी
सेवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पुरवाव्यात,
मुख्यमंत्र्यांची प्रशासनाला सूचना
·
मुख्यमंत्री
माझी लाडकी बहीण योजनेतल्या २६ लाख लाभार्थ्यांची छाननी करण्याचे महिला आणि बालविकास
मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश
·
नांदेडचे
डॉ. शेख मोहम्मद आणि लातूरचे डॉ. संदीपान जगदाळे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर
·
सर्वोच्च
न्यायालयाच्या निर्देशानंतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम
जाहीर झाला नसल्याबद्दल, काँग्रेसची टीका
·
उमेदच्या
विक्री केंद्रांवरून गणेशमूर्ती खरेदी करण्याचं छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे
सीईओ अंकित यांचं आवाहन
आणि
·
मराठवाड्यात
हिंगोली, नांदेड
जिल्ह्यांसाठी आज तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांसाठी उद्या पावसाचा यलो
अलर्ट
****
आपले सरकार पोर्टलवरुन नागरिकांना पुरवल्या
जाणाऱ्या सर्व सेवा आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पुरवाव्यात, अशा सूचना,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
दिल्या आहेत. सेवा सुलभीकरणासाठी राज्यातल्या नागरी सेवांचा आढावा घेताना ते काल बोलत
होते. या सेवा योग्य प्रकारे आणि गरजेनुसार पुरवण्याच्या दृष्टीनं सर्व तालुक्यांमध्ये
यंत्रणा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. आपले सरकार सेवा पोर्टलच्या
माध्यमातून सध्या राज्यात एक हजार एक सेवा पुरवण्याचं काम सुरू असून, त्यापैकी ९९७ सेवा पोर्टल वर उपलब्ध
करून देण्यात आल्या आहेत.
****
दरम्यान,
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते निबंधक तसंच
भागीदारी संस्था कार्यालयाच्या उन्नत संकेतस्थळाचा काल शुभारंभ करण्यात आला. या संकेतस्थळाच्या
माध्यमातून भागीदारी संस्था तसंच नागरिकांना अधिक वेगवान,
पारदर्शक आणि सुलभ सेवा उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
नांदेड - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस
आजपासून धावणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवून या रेल्वेसेवेचा
प्रारंभ होणार आहे. नांदेड ते मुंबई दरम्यानचं ६१० किलोमीटरचं अंतर ही गाडी साडे नऊ
तासांत पूर्ण करणार आहे.
****
राज्य परिवहन महामंडळाच्या-एसटीच्या
कर्मचाऱ्यांना चालू महिन्याचं वेतन गणेशोत्सवापूर्वी देण्यात येणार आहे. परिवहन मंत्री
प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. यासंदर्भातला शासन निर्णय काल जारी करण्यात आला.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या
२६ लाख लाभार्थ्यांची छाननी करण्याचे आदेश महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे
यांनी जिल्हा पातळीवरच्या यंत्रणेला दिले आहेत. या छाननीनंतर लाभार्थ्यांची पात्रता-अपात्रता
ठरणार आहे. अपात्र लाभार्थ्यांवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार
कारवाई केली जाईल, असं तटकरे यांनी
सांगितलं.
****
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार काल जाहीर
झाले. त्यात नांदेडचे डॉ. शेख मोहम्मद वकीउद्दीन शेख हमीदोद्दीन, लातूरचे डॉ. संदीपान जगदाळे आणि मुंबईतल्या
सोनिया कपूर यांचा समावेश आहे. डॉ. शेख नांदेडमधल्या अर्धापूर इथल्या जिल्हा परिषदेच्या
शाळेत तर जगदाळे लातूरच्या दयानंद कॉलेजात शिकवतात. कपूर या मुंबईतल्या अणूऊर्जा महामंडळाच्या
शाळेत शिक्षिका आहेत. ५० हजार रुपये आणि रौप्यपदक असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. येत्या
पाच सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान केले जाणार
आहेत. लातूर जिल्ह्यातून हा मान मिळवणारे जगदाळे हे पहिलेच शिक्षक ठरले आहेत. त्यांनी
आपल्या भावना या शब्दांत व्यक्त केल्या...
बाईट-डॉ. संदीपान जगदाळे
नांदेड इथले शिक्षक डॉ. मोहम्मद यांनी
हा राष्ट्रीय पुरस्कार केवळ त्यांच्या कार्याचा सन्मान नसून, तो विद्यार्थी आणि समाजासाठी केलेल्या
कार्याचा गौरव असल्याचं सांगितलं. ते म्हणाले,
बाईट- डॉ. वकियोद्दीन शेख मोहम्मद
****
सकारात्मक पत्रकारिता वाढण्यासाठी किमान
एक तरी चांगली बातमी जिल्ह्यातल्या सर्व वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर आली पाहिजे, असं मत,
पद्मश्री डॉ. तात्यासाहेब लहाने यांनी
व्यक्त केलं. बीडचे ज्येष्ठ संपादक सर्वोत्तम गावरस्कर यांना मराठी पत्रकार परिषदेचा
नागोजीराव दुधगावकर स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार काल प्रदान करण्यात आला, त्यावेळी डॉ.लहाने बोलत होते. गावरस्कर
यांनी कुठलाही आधार नसतांना स्वतःचं साप्ताहिक सुरू केलं,
तसंच दोन जिल्ह्यात दैनिक चालवल्याचं
सांगून लहाने यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.
****
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका
चार महिन्यात घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिलेले असतानाही, या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला
नाही, अशी
टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगर इथं
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातल्या पाच
जिल्ह्यांची आढावा बैठक सपकाळ यांनी काल घेतली,
त्यावेळी ते बोलत होते. काँग्रेसने
या निवडणुकांसाठी तयारी सुरु केली असून, आघाडीच्या निर्णयावर राज्य पातळीवर चर्चा झालेली नाही.
सध्या स्थानिक पातळीवरच मित्रपक्षांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले
आहेत, असंही
सपकाळ यावेळी म्हणाले.
दरम्यान,
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री
बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात काल छत्रपती संभाजीनगर इथं रोजगार सत्याग्रह तसंच
तिरंगा यात्रा काढण्यात आली. थोरात यांनी यावेळी विविध मुद्यांवरून केंद्र सरकारवर
टीका केली.
****
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे
पाटील यांच्या नेतृत्वाखालील मोर्चा उद्या २७ ऑगस्टला मुंबईकडे निघणार आहे. मराठा आणि
कुणबी एकच असून, यासाठीचा
शासन आदेश जारी करावा, ही या मोर्चाची मागणी असल्याचं जरांगे यांनी काल जालना इथं पत्रकार
परिषदेत सांगितलं. सग्यासोयऱ्यांचा आदेश निघून दीड वर्ष झालं मात्र त्याची अंमलबजावणी
अजूनही झाली नाही, ती लवकरात लवकर करावी अशी मागणी त्यांनी केली. आंदोलकांनी मोर्चात
शांतता बाळगावी असं आवाहन जरांगे यांनी केलं.
दरम्यान,
जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी
इथून उद्या निघणारा हा मोर्चा शहागड, पैठण, शेवगावमार्गे पुढे जाणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात
काही मार्गांवरच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, बिडकीन,
पैठण मार्गे शेवगावकडे जाणारा आणि येणारा
मार्ग, तसं
शहागड, नवगाव
मर्गे पैठणकडे जाणारा आणि येणारा मार्ग २८ तारखेला संध्याकाळी
पर्यंत बंद राहणार असून, नागरीकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन वाहतूक पोलिसांनी
केलं आहे.
****
या आंदोलनासाठी नांदेडमधून मराठा समाज
बांधव आज अंतरवाली सराटी इथं पोहोचणार आहेत. या ठिकाणाहून ते मुंबईकडे जाणार असल्याची
माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली.
****
दरम्यान,
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष
विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांच्या या आंदोलनावर टीका केली आहे. गरीब
मराठ्यांना वंचित ठेवणाऱ्या श्रीमंत मराठ्यांना या आंदोलनातून पाठिंबा मिळत असल्याचं
ते म्हणाले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जरांगे यांनी श्रीमंत मराठ्यांना पाठिंबा
दिला होता, आगामी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुन्हा तीच भूमिका घेणार का, असा सवालही आंबेडकर यांनी विचारला.
****
छत्रपती संभाजीनगर इथं काल राज्यस्तरीय
शेतकरी हक्क बैठक घेण्यात आली. या बैठकीला प्रहार संघटनेचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू
कडू, माजी
खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री महादेव जानकर,
यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सुभेदारी विश्राम गृहात झालेल्या या बैठकीत शेतकरी कर्जमाफी, सातबारा कोरा, मुंबई आंदोलन, शेतमालाला हमी भाव, आदी मुद्द्यांवर चर्चा झाली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा परिषदेच्या
उमेद अभियानातल्या महिला बचत गटांनी तयार केलेल्या गणेशमूर्तीचं प्रदर्शन औरंगपुरा
परिसरातल्या जिल्हा परिषद मैदानावर भरवण्यात आलं आहे. हे प्रदर्शन उद्यापर्यंत सुरु
राहणार आहे. या प्रदर्शन आणि विक्री केंद्राला काल जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
तथा प्रशासक अंकित तसंच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास
यंत्रणाचे प्रकल्प संचालक वासुदेव सोळंके यांनी भेट देऊन पाहणी केली. नागरिकांनी या
स्टॉल्सवरुन मूर्ती खरेदी करण्याचं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी केलं...
बाईट- अंकित,मुख्य
कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर
****
अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक
नियमांचं काटेकोर पालन करणं आवश्यक आहे. आगामी गणेशोत्सवात वाहतूक नियम जनजागृती मोहीम
राबवण्याच्या सूचना लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी दिल्या आहेत.
****
बीड जिल्ह्यात केज तालुक्यातल्या धनेगाव
इथल्या मांजरा धरणाचं जलपूजन खासदार बजरंग सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आलं. लातूर
शहर, लातूर
औद्योगिक वसाहत, केज, अंबाजोगाई,
धारूर,
कळंब या शहरांसह ६१ गावं मांजरा धरणातल्या
पाणी पुरवठ्यावर निर्भर आहेत. धरण १०० टक्के भरलं असून,
सध्या दोन दरवाजातून पाण्याचा विसर्ग
सुरु आहे.
****
हवामान
मुंबई आणि पालघरसह कोकण, खानदेश तसंच विदर्भात पुढचे दोन दिवस
यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात हिंगोली तसंच नांदेड जिल्ह्यात आज तर छत्रपती
संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांत उद्या, यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुरुवार तसंच शुक्रवारीही
मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment