Thursday, 14 September 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 14.09.2017 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 14 SEP. 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ सप्टेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.

****

** मराठा आरक्षण मागणीचा अभ्यास करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन

** शासकीय नोकऱ्यांमध्ये क वर्ग कर्मचाऱ्यांची भरती करताना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना प्राधान्य देण्याचा शासनाचा निर्णय

** शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी अर्ज सादर करण्याची मुदत उद्या संपणार; सरसकट कर्जमाफी देण्याची भाजप खासदार नाना पटोले यांची मागणी

** नांदेड जिल्ह्यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचं काटेकोर पालन करण्याचे राज्य निवडणूक आयुक्तांचे निर्देश

आणि

** औरंगाबाद शहर परिसरात काल सायंकाळी मुसळधार पाऊस

****

मराठा आरक्षणाच्या मागणीचा अभ्यास करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना केली. या समितीमध्ये दिवाकर रावते, एकनाथ शिंदे, गिरीश महाजन आणि संभाजी पाटील निलंगेकर यांचा समावेश आहे. मराठा समाजाचे नेते आणि शासन यांच्यात समन्वय राखून, आरक्षणाबाबत तोडगा काढण्याची जबाबदारी या उपसमितीवर सोपवण्यात आली आहे.

****

शासकीय नोकऱ्यांमध्ये गट क वर्गात कर्मचाऱ्यांची भरती करताना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाच्या सर्वच विभागांसाठी हा निर्णय घेण्यात आला असून यासंदर्भातला शासन निर्णय लवकरच जारी होईल, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. परिवहन विभागाच्या गट क च्या भरतीसाठी रावते यांनी हा प्रस्ताव सादर करताना, शासनाच्या सर्वच विभागांसाठी हा निर्णय घेण्यात यावा, असं सुचवलं होतं. त्यानुसार सामान्य प्रशासन विभाग, विधी तसंच न्याय विभाग यांच्या शिफारशीनंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावाला मान्यता दिल्याची माहिती रावते यांनी दिली.

****

नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गासाठी सर्व बँकांनी आर्थिक सहकार्य करावं, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. बँक अधिकाऱ्यांसोबत काल मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. या महामार्गामुळे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येणार असून, लाखो लोकांना रोजगाराची संधी मिळणार असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अनेक राष्ट्रीयीकृत बँकांच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देण्याचं मान्य केलं.

****

राज्यातल्या अन्न आणि कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी तयार करण्यात आलेलं धोरण मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी तातडीनं सादर करावं, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. अन्न आणि कृषी प्रक्रिया उद्योगासंदर्भात तयार करण्यात आलेल्या धोरणाचा आढावा घेण्यासाठी काल मुंबईत बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात प्रक्रिया उद्योगाला चालना मिळावी यासाठी कृषी आयुक्तालयात अन्न प्रक्रिया संचालनालय स्थापन करण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी अर्ज सादर करण्याची मुदत उद्या १५ सप्टेंबरला संपणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठीचे अर्ज अजून सादर केलेले नाहीत त्यांनी आज दिवसभरात अर्ज सादर करावेत, असं आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे. या योजनेसाठी १२ सप्टेंबरपर्यंत ४४ लाख २१ हजार ६६५ शेतकरी कुटुंबांचे अर्ज प्राप्त झाले असून, या अर्जांमधल्या माहितीची छाननी पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती देशमुख यांनी दिली आहे. 

****

कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यापेक्षा राज्यसरकारने सरसकट कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी भंडारा-गोंदियाचे भाजप खासदार नाना पटोले यांनी केली आहे. ते काल मुंबईत मंत्रालयात आयेाजित पत्रकार परिषदेत बोलत होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचं, १० लाख शेतकऱ्यांची खाती बोगस असल्याचं वक्तव्य चीड आणणारं, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारं असल्याचं पटोले यांनी यावेळी नमूद केलं. 

****

राज्यभरात उद्या १५ सप्टेंबरला एकाच दिवशी १० लाखा पेक्षा अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत. क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. १७ वर्षाखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर हे आयोजन करण्यात आलं आहे. "महाराष्ट्र मिशन एक मिलियन" योजनेअंतर्गत राज्यभरात सुमारे ३० हजार शाळांमध्ये प्रत्येकी तीन याप्रमाणे एक लाख फुटबॉलचं वाटप केलं जात असल्याचं तावडे यांनी सांगितलं. शालेय विद्यार्थ्यांचा इ-गॅझेटकडे वाढता ओढा कमी होऊन, मैदानी खेळांचा आनंद घ्यावा, हा या मागचा उद्देश असल्याचं, तावडे म्हणाले.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

राजभाषा हिंदी दिन आज साजरा करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या वतीनं विविध मंत्रालयात, विभागात आणि कार्यालयात राजभाषेचा उत्कृष्ट वापर करणाऱ्या प्रमुखांना विज्ञान भवन, नवी दिल्ली इथं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. यावेळी देशातल्या विविध भाषेतून हिंदी भाषा शिकण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मोबाइल ॲपचं लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे.



हिंदी राजभाषा दिनानिमित्त आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रामध्ये आजपासून ‘राजभाषा हिंदी पंधरवडा’ साजरा करण्यात येणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या हिंदी विभागातले प्राध्यापक डॉक्टर सुधाकर शेंडगे यांच्या हस्ते आज सकाळी अकरा वाजता या पंधरवड्याचं उद्घाटन होणार आहे. या पंधरवड्यादरम्यान कर्मचाऱ्यांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात येणार आहे.

****

नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत आणि नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणूक शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी निवडणूक आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करावं, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी दिले आहेत. ते काल नांदेड इथं यासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम हाती घ्यावी, थेट सरपंचपदासाठी यावेळी पहिल्यांदाच मतदान होत असल्यानं यासंदर्भातही मतदार जागृती करावी, असं  सहारिया यावेळी म्हणाले.

****

औरंगाबाद शहराला काल सायंकाळी मुसळधार पावसानं झोडपून काढलं. विजेच्या कडकडाटासह सुमारे दीड तास झालेल्या पावसानं शहरातले रस्ते जलमय झाले, तर अनेक घरात दुकानांमध्ये पाणी शिरून नुकसान झालं. अवघ्या पाऊण तासात शहरात ५० ते ७५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सायंकाळी साडेसहा नंतर अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे रस्तावर तुंबलेल्या पाण्यात वाहनं अडकून काही भागातली वाहतूक ठप्प झाली होती. गारखेडा, शिवाजीनगर, सातारा परिसरात पावसाचा जोर अधिक होता. सातारा परिसरातल्या नाल्याला पूर आल्यानं, दोन दुचाकीस्वार वाहून गेले त्यातल्या एकाला वाचवण्यात यश आलं मात्र दुसरा अद्याप बेपत्ता आहे.

*****

गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे उस्मानाबाद शहराला पाणी पुरवठा होणारा तेरणा प्रकल्प काल ओसंडून वाहू लागला. जिल्ह्यातले निम्न खैरी, हातोला प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

लातूर जिल्ह्यातही तावरजा प्रकल्पासह १३ बंधारे शंभर टक्के भरले असून, मांजरा प्रकल्पातही मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे.

पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठाही जवळपास ८४ टक्के झाला आहे. धरणात काल सुमारे साडे सात हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू होती.

****

लातूर इथं काल दोन विद्यार्थ्यांचा सारोळा तलावात बुडून मृत्यू झाला. काल सकाळच्या सुमारास या मुलांचे मृतदेह तलावावर तरंगत असल्याचं आढळून आलं. सातव्या आणि नवव्या वर्गात शिकणाऱ्या या दोघांची दप्तरं तलावाच्या काठावर आढळून आल्यानं, त्यांची ओळख पटली आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

****

परभणीच्या तहसीलदार आणि तलाठ्यांना अपमानास्पद वागणूक दिलेल्या पोलिसांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी काल महसूल अधिकारी कर्मचारी संघटनेच्या संयुक्त कृती समितीनं औरंगाबादसह मराठवाड्यात अनेक ठिकाणी लेखणीबंद आंदोलन केलं. कारवाई न केल्यास आंदोलन चालूच राहील असा, इशारा समितीनं दिला आहे.

****

सहकारी संस्थांनी वसूली आणि पारदर्शक कारभारावर भर देऊन आपली संस्था नफ्यात ठेवण्यासाठी काम करण्याचं आवाहन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केलं आहे. बागडे यांच्या हस्ते काल औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ठेवीदार आणि कर्जदारांना रुपे किसान क्रेडिट कार्डचं वाटप करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. सहकारी संस्था आर्थिकदृष्या बळकट राहिल्यास,गरजू आर्थिक दुर्बल घटक आणि शेतकऱ्यांना सावकाराच्या जाचक दडपणापासून दूर ठेवून वेळेवर आर्थिक मदत करणं शक्य होईल, असं ते म्हणाले.

****

केंद्र शासानाच्या पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाच्या वतीनं स्वच्छ संकल्पसे स्वच्छ सिद्धी अंतर्गत जिल्हास्तरावर निबंध आणि लघुपट स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचे निकाल काल जाहीर झाले. दोन्ही गटात जिल्हास्तरावर पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकांना अनुक्रमे १५ हजार, १० हजार आणि पाच हजार रुपये बक्षीस मिळणार असून, राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेसाठी त्यांची निवड होणार आहे.

****




No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 09 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...