Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 OCT. 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ ऑक्टोबर २०१७ सकाळी ६.५० मि.
****
** गटशेती योजनेच्या उपक्रमातून शेतकऱ्यांच्या जीवनात
परिवर्तन आणण्यासाठी, दोनशे कोटी रुपयांची तरतूद- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
** एस. टी. कर्मचाऱ्यांच्या संपाला मध्यरात्रीपासून प्रारंभ;
खाजगी वाहतूकदारांना प्रवाशांची वाहतूक करण्यास, राज्य सरकारची परवानगी
** देशातल्या
पहिल्या इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टरची औरंगाबादमध्ये स्थापना
आणि
** राज्यातल्या तीन हजार ६६६ ग्राम पंचायतींसाठीच्या मतदानाची
आज मोजणी
****
गटशेती योजनेच्या उपक्रमातून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन
आणण्यासाठी राज्य शासनानं, दोनशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी सांगितलं. जालना जिल्ह्यातल्या देळेगव्हाण इथं काल ॲग्रो इंडिया गटशेती
संघ पुरस्कृत, इंडिको फॉर्मर प्रोड्युसर कंपनीच्यावतीनं आयोजित, द्वादशी मेळावा आणि
गटशेती पाहणी कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.
जालन्याचा गटशेतीचा प्रयोग राज्य सरकारनं स्वीकारला असल्याचं
सांगत, त्यांनी गटशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना एक कोटी रुपयापर्यंतच्या कृषि योजनांचा
लाभ दिला जाईल, असं जाहीर केलं. उद्यापासून शासकीय कापूस खरेदी सुरु करण्यात येणार
असून, शेतकऱ्यांनी हमी भावापेक्षा कमी भावात व्यापाऱ्यांना कापूस विक्री करु नये, असं
आवाहन त्यांनी यावेळी केलं. यावेळी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष
खासदार रावसाहेब दानवे, गटशेतीचे प्रणेते डॉ. भगवानराव कापसे यांनी आपले विचार मांडले.
जालना शहरात काल झालेल्या विकास परीषदेलाही मुख्यमंत्री
उपस्थित होते. यावेळी बोलतांना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत
कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्या पासून पैसे जमा होण्यास
प्रारंभ होणार असल्याचं सांगितलं.
आपल्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले.
मला सांगताना आनंद वाटतो, की पहिली बॅच कर्जमाफीची १८ तारखीला
त्यांच्या खात्यांमध्ये आम्ही पैसा जमा करणार आणि त्यानंतर रोज आम्ही हा पैसा जमा करत-करत
महिनाभराच्या आत, त्याच्याहीपेक्षा कमी कालावधीमध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये
हे पैसे जमा होतील आणि त्यातनं आमच्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याच कामदेखील राज्य
सरकारच्या वतीनं होणार आहे.
दिल्ली - मुंबई औद्योगिक मार्गिका - डी एम आय सी अंतर्गत
भौतिक सुविधा उपलब्ध झाल्यावर या ठिकाणी मोठे उद्योग येतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी
व्यक्त केला. जालना शहराच्या वळण रस्त्यासह इतरही अनेक प्रश्नांसंदर्भात बोलताना, जालना
शहराच्या विकासाला प्राधान्य देत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
****
देशातल्या युवा उद्योजकांना स्वाभिमान मिळवून देण्याचं
काम, प्रधानमंत्री मुद्रा योजनेनं केलं आहे.
त्यामुळे मुद्रा योजना ही नव्या भारताची नवी आकांक्षा असल्याचं प्रतिपादन, केंद्रीय
मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल पुण्यात केलं. प्रधानमंत्री मुद्रा
योजनेच्या प्रसारासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या योजनेच्या लाभार्थ्यांविषयी
बोलतांना ते म्हणाले
महाराष्ट्रामध्ये ४० लाखांपेक्षा जास्त रोजगार कर्ज मिळाल्यामुळे
निर्माण झाले आणि त्यांनी लावलेली नौकरी जर पाहिली तर जवळ-जवळ ७०-८० लाख लोकांना याच्यात
काम मिळालं आणि म्हणून आश्या पध्दतीनं प्रत्तेक योजनेमध्ये ज्यावेळेला समाजापर्यंत
जेव्हा पैसा जाईल, गरिबांपर्यंत पैसा जाईल. त्यावेळेला गरिब स्वताःच्या पायावर अभा
राहील त्याला सावकारितून मुक्त करायचं त्यातून वाचवण्यासाठी बँकांची ही योजना आहे आणि
म्हणून या बँकेच्या योजनेचा सगळ्यांनी फायदा घ्या आणि म्हणून मुद्रा योजना हा नव्या
भारताची नवी आकांशा आहे. नव्या भारताची नवी योजना आहे.
सरकारच्या विविध योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेशाचं वाटपही यावेळी
करण्यात आलं.
****
राज्य परीवहन महामंडळ- एस. टी. कर्मचाऱ्यांच्या संपाला
काल मध्यरात्रीपासून प्रारंभ झाला. वेतनवाढ आणि अन्य मागण्यांसाठी हे कर्मचारी संपावर
गेले आहेत. या संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं खाजगी वाहतूकदारांना प्रवाशांची
वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे.
दरम्यान, काल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध एस टी कर्मचारी संघटनांबरोबर मुंबईत बैठक
घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांनी एस टी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत सरकार सकारात्मक
असल्याचं सांगत, नियोजित संप मागे घेण्याचं आवाहन केलं. एस टी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ
देण्यासाठी, परिवहन विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल,
असं त्यांनी सांगितलं.
बैठकीदरम्यान, एस टी कामगारांना सातवा आयोग लागू करण्याची
लेखी हमी देऊन, कामगारांना दहा हजार रुपये हंगामी वाढ द्या, ही एस टी कामगार युनियनची
मागणी अमान्य झाल्यामुळे संपावर जाण्याचा निर्णय कायम असल्याचं, महाराष्ट्र स्टेट कामगार
संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी स्पष्ट केलं.
****
देशातल्या पहिल्या इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टरची स्थापना,
काल औरंगाबाद इथल्या शेंद्रा औद्योगिक वसाहतीत करण्यात आली. चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज
ॲण्ड ॲग्रीकल्चर च्या माध्यमातनू सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर उभारण्यात येणाऱ्या,
देवगिरी इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टरचं भूमिपूजन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते
काल करण्यात आलं. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे, यांच्यासह
अन्य मान्यवर उपस्थित होते.
****
शेतकऱ्यांच्या गोठ्यात जाऊन जनावरांचे उपचार करता यावेत,
याकरता राज्य शासन अत्याधुनिक पशुवैद्यकीय सोयी-सुविधांनी सज्ज असलेल्या, ३८९ मोबाईल
व्हॅन उपलब्ध करून देणार असल्याची माहिती,
पशुसंवर्धन, आणि दुग्धविकास मंत्री महादेव
जानकर यांनी दिली. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यातील मौजे हंडरगुळी इथल्या पशुबाजाराच्या
उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
राज्यातल्या १८ जिल्ह्यातल्या तीन हजार ६६६ ग्राम पंचायतींसाठी
काल झालेल्या मतदानाची आज मोजणी होणार आहे.
काल या सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरी ८१ टक्के मतदान झालं. यात थेट सरपंचपद आणि
सदस्यपदांसाठीच्या मतदानाचा समावेश होता, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया
यांनी काल मुंबई इथं दिली. उस्मानाबाद जिल्ह्यातही १६१ ग्रामपंचायतीसाठी सरासरी ८०
टक्के मतदान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राज्यातल्या सार्वजनिक ग्रंथालयाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी
राज्य सरकार सकारात्मक असून, या संदर्भात दिवाळी नंतर राज्य संघाचे पदाधिकारी यांची
मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार असल्याचं, कामगार मंत्री संभाजी पाटील
निलंगेकर यांनी सांगितलं आहे. लातूर इथं आयोजित महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या ५४व्या अधिवेशनाचं
उद्घाटन निलंगेकर यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
या पूर्वनियोजित कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांनी पाठवलेल्या संदेशाचं वाचनही निलंगेकर यांनी केलं.
****
औरंगाबाद महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ करणाऱ्या एम.आय.एम. च्या दोन नगरसेवकांचं नगरसेवक पद कायमस्वरूपी
रद्द करण्याचे आदेश काल महापौर भगवान घडामोडे यांनी दिले. त्यांच्याविरूद्ध गुन्हा
दाखल करण्यासही त्यांनी आयुक्तांना सांगितलं आहे. शहरात सर्वत्र समान पाणी वाटपावरून
सभागृहात गोंधळ झाला, या दरम्यान या नगरसेवकांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण केली तसंच
खुर्च्यांची फेकाफेक केली.
****
औरंगाबाद इथले प्रसिद्ध नाट्य कलावंत राधाकृष्ण उर्फ राजाभाऊ
दांडगे यांचं काल सकाळी निधन झालं, ते ७८ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून फुफ्पुसात
संसर्ग झाल्यानं, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान, काल सकाळी
त्यांचं निधन झालं, त्यांच्या पार्थिव देहावर काल सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
औरंगाबाद शहरात काल झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात चार
जण जागीच ठार झाले. दिवाळीसाठी
गावी जात असलेल्या अमित पाटील आणि डॉ.
हरिकिशन पाटील या तरुणांच्या मोटारसायकलचा बीड रोडवर अपघात झाला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर ब्रेक निकामी झाल्यामुळे एसटी
महामंडळाच्या बसनं तीन रिक्षांना चिरडलं, तसंच, एका मोटारीला धडक देत दोन जणांचा बळी घेतला. ही घटना सिडको बसस्थानक
सिग्नल जवळ काल संध्याकाळी घडली.
****
No comments:
Post a Comment