Friday, 13 October 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 13.10.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 13 October 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १३ ऑक्टोबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

देशात नवनवीन कल्पना, संसाधने आणि क्षमता कमी नाही, मात्र प्रशासनातल्या त्रुटीमुळे काही राज्ये आणि विभाग मागे पडल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित राज्यपालांच्या संमेलनाचा आज समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते. देशाची अखंडता कायम राखण्यासाठी राज्यपालांनी एक भारत श्रेष्ठ भारत, रन फॉर युनिटी अशा योजनांमध्ये सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.  

****

राज्याच्या समतोल विकासासाठी शासनानं ‘केळकर’ समितीचा अहवाल जाहीर करावा, अशी मागणी मराठवाडा अनुशेष निमूर्लन आणि विकास मंचचे अध्यक्ष डॉ. संजय लाखेपाटील यांनी केली आहे. ते आज जालना इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या तुलनेत  मराठवाडा प्रत्येक क्षेत्रात मागे असल्यानं, शासनाने विदर्भ-मराठवाडा आणि उर्वरीत महाराष्ट्रात विभागनिहाय केलेल्या कामांची श्वेतपत्रिका काढावी, विकास कामांबाबत मराठवाड्याचा सर्व क्षेत्रातला वाटा निश्चित करून देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणीही लाखेपाटील यांनी केली. येत्या सोमवारी जालना दौऱ्यावर येत असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांनी मराठवाड्याच्या अनुशेषाबाबत चर्चा करण्यासाठी व्यापक बैठक घ्यावी, असंही ते म्हणाले.

****

भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ - आय आर सी टी सीनं रेल्वे प्रवाशांसाठी भारत दर्शनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पुणे, कोल्हापूर, नाशिक आणि सावंतवाडी इथून पाच विशेष रेल्वे सोडण्यात येणार असून त्यातील चार रेल्वे पुणे मार्गे धावणार आहेत. ही प्रत्येक गाडी  १५ डब्यांची असून सुरक्षा, खानपान, स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रवाशांनी आयआरसीटीसी टुरिझम डॉट कॉम या संकेतस्थळावर आरक्षण आणि अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

****

रायगड जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर तालुक्यातल्या पारले इथं आज दुपारी झालेल्या अपघातात पाच जण ठार तर सातजण जखमी झाले. खासगी प्रवासी वाहन आणि ट्रकची समोरा समोर धडक होऊन ही दुर्घटना घडली. जखमींवर पोलादपूर आणि महाडच्या ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

राज्य सरकारकडून शाश्वत शेती, परवडणारी घरे आणि कौशल्य विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना स्वीडनमधल्या विविध आघाडीच्या उद्योगसमुहांचं सहकार्य लाभणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज स्टॉकहोम इथं याबाबतच्या विविध सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या दौऱ्यात आतापर्यंत विविध उद्योगांशी सामंजस्य करार करण्यात आले आहेत.

****

माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती १५ ऑक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात ग्रंथ वाचन तास आणि ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. १५ ऑक्टोबरला रविवार असल्यानं राज्यभरात इतरत्रही आज वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. 

****

ज्या विभागीय वन अधिकाऱ्याच्या वन क्षेत्रात दारुच्या भट्टया आढळून येतील त्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. मुंबई इथं अवैध मद्य निर्मिती, वाहतूक, विक्री, अवैध मद्य बाळगणे, आयात-निर्यात यावर कडक उपाययोजना करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.

****

केंद्रीय वस्त्रोद्योग आणि माहिती प्रसारण मंत्रालयाच्या वतीने अहमदनगर इथं आयोजित एक दिवसीय हस्तकला शिबिराचं उद्घाटन खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते करण्यात आलं. राष्ट्रीय हातमाग विकास महामंडळाचे उपव्यवस्थापक पी एल सिंघल यावेळी उपस्थित होते. विणकर आणि हस्तकलाकारांसाठी मुद्रा योजनेअंतर्गत सहा टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून, ग्राहक विक्रेता मेळावा भरवून उत्पादनाला बाजारपेठ ही मिळवून दिली जाणार असल्याचं, सिंघल म्हणाले.

****

सरकारनं आज नवी दिल्ली इथं संपूर्ण विमा ग्राम योजनेची सुरुवात केली, तसंच टपाल जीवन वीमा योजनेचा विस्तार केला. संपूर्ण वीमा ग्राम योजनेअंतर्गत देशातल्या प्रत्येक जिल्ह्यातून कमीत कमी शंभर कुटुंब निवडून त्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला ग्रामीण टपाल वीमा योजनेचा लाभार्थी बनवणार असल्याचं दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी सांगितलं. या योजनांमुळे नागरिकांना वीमा संरक्षण मिळण्याबरोबरच, आर्थिक समावेशही वाढणार आहे.

****

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान तीन ट्वेंटी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतल्या शेवटचा सामना आज हैदराबाद इथं होणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही संघ या मालिकेत एक एकनं बरोबरीत आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 07.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 07 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...