Monday, 16 October 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 16.10.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 16 OCT. 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ ऑक्टोबर २०१७ दुपारी १.०० वा.

****

विशाखापट्टणम इथल्या नौदलाच्या गोदीत बांधण्यात आलेली पाणबुडीनाशक युद्वनौका आय.एन.एस. किलतान आज समारंभपूर्वक नौदलाच्या सेवेत समाविष्ट झाली. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन आणि नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल सुनील लांबा यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. नौदल आरेखन संचालनालय आणि गार्डनरिच अभियांत्रिकी संघटनेच्या वतीनं विकसित कामोर्टा श्रेणीच्या चार युद्वनौकांपैकी ही तिसरी नौका आहे.

****

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी नामांकनपत्रं दाखल करण्याची प्रक्रिया आज सुरु झाली. इच्छुक उमेदवारांना येत्या २३ तारखेपर्यत आपली नामांकनपत्र सादर करता येतील, असं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी पुष्पेंदर राजपूत यांनी सांगितलं. येत्या नऊ नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात सर्व ठिकाणी मतदान होणार आहे. 

****

राज्यातल्या तीन हजार ७०० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान शांततेत सुरु आहे. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातल्या १५८ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ३० टक्के तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज तालुक्यात सुमारे ३५ टक्के मतदान झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.

****

ग्रामपंचायतींना त्यांच्या पद्धतीनं विकास कार्याची योजना तयार करण्यासाठी सरकारनं ग्रामपंचायतींना थेट निधी देणं सुरु केलं असल्याचं केंद्रीय सूचना आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी सांगितलं आहे. जयपूर नजिक खाडव गावात खासदार आपल्या दारी या कार्यक्रमात ते बोलत होते. गावाच्या लोकसंख्येनुसार निधी पाठवण्यात येत असून, ग्रामीण भारताला अधिक सक्षम करण्यासाठी दरवर्षी या निधीत वाढ केली जात असल्याचं, त्यांनी सांगितलं.

****

आयुर्वेदात शास्त्रीय पद्धतीनं संशोधन होणं आवश्यक असल्याचं उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी म्हटलं आहे. पुणे इथं आयुर्वेदाग्राम या आयुर्वेदिक उपचाराशी निगडित सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देणाऱ्या मॉलचं उद्घाटन करताना ते बोलत होते.

दरम्यान, केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे देण्यात येणारा यंदाचा धन्वंतरी पुरस्कार डॉ. सदानंद सरदेशमुख यांना जाहीर झाला आहे. उद्या धनत्रयोदशी निमित्त दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

****

देशातली मोठी सरकारी तसंच खासगी विद्यापीठं जागतिक दर्जाची बनवण्यासाठी केंद्र सरकारचं धोरणात्मक काम सुरू असल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंग यांनी म्हटलं आहे. छत्तीसगढमध्ये बिलासपूर इथल्या गुरु घासीदास केंद्रीय विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. पाच वर्षात दहा सरकारी आणि दहा खाजगी विद्यापीठं जागतिक दर्जाची करण्यासोबतच त्यांना स्वायत्तता देण्यासाठी दहा हजार कोटी रुपये देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच केली आहे.

****

औरंगाबाद इथले प्रसिद्ध नाट्य कलावंत राधाकृष्ण उर्फ राजाभाऊ दांडगे यांचं आज सकाळी निधन झालं, ते ७८ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून फुफ्पुसात संसर्ग झाल्यानं, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान, आज सकाळी त्यांचं निधन झालं, त्यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी साडे पाच वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. लोकनाट्य चळवळीत भरीव योगदान दिलेल्या दांडगे यांनी चित्रपटांतूनही भूमिका साकारल्या होत्या. तालवादक शरद दांडगे आणि रंगकर्मी शोभा दांडगे यांचे ते वडील होत.

****

वारंवार आश्वासनं देऊनही माथेरानची मिनी ट्रेन सुरू होण्याची कोणतीही लक्षणं दिसत नसल्यानं माथेरान इथं नागरिकांनी येत्या एक नोव्हेंबर रोजी नेरळ इथं रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मे २०१६ मध्ये लागोपाठ झालेल्या दोन अपघातांनंतर माथेरानची मिनी ट्रेन बेमुदत काळासाठी बंद केली होती. माथेरानचं पर्यटन आणि अर्थव्यवस्था या रेल्वेवर अवलंबुन असल्यानं ही रेल्वे पूर्ववत सुरु करण्याची मागणी माथेरानच्या नागरिकांकडून करण्यात येत आहे.

****

१७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक अजिंक्यपद स्पर्धेत आज दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू मैदानात बाद फेरीतले दोन सामने खेळले जाणार आहेत. आज सायंकाळी पाच वाजता कोलंबिया विरुद्ध जर्मनी, तर रात्री आठ वाजता अमेरिका विरुद्ध पॅराग्वे हे सामने होणार आहेत.

दरम्यान, २०११ च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या तुलनेत प्रेक्षकांच्या दृष्टीनं ही विश्वचषक स्पर्धा अधिक यशस्वी झाल्याचं या स्पर्धेचे संचालक झेवियर सेप्पी यांनी सांगितलं. आगामी २० वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेसाठी भारत दावेदार ठरू शकतो, असं त्यांनी कोलकाता इथं वर्ताहरांशी बोलताना सांगितलं.

****

महिलांच्या आशिया हॉकी स्पर्धेत सहभागी होणार्या १८ सदस्यीय भारतीय संघाची कर्णधार म्हणून रानी रामपालची निवड करण्यात आली आहे. जपानमधल्या काकामिगाहारा इथं येत्या २८ ऑक्टोबरपासून ही स्पर्धा सुरु होणार असून, भारताचा पहिला सामना सिंगापूर विरुद्ध होणार आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 05.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 5 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्...