Sunday, 15 October 2017

Text-AIR News Bulletin HLB, Aurangabad 15.10.2017 11.00


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

१५ ऑक्टोबर २०१७ सकाळी ११.०० वाजता

****

माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची आज जयंती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलाम यांना श्रद्धांजली अर्पण केली. डॉ. कलाम यांचं व्यक्तीमत्व लाखो लोकांची प्रेरणा असल्याचं पंतप्रधानांनी ट्विटरवरच्या संदेशात म्हटलं आहे.

अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस राज्यभरात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो.

****

जम्मू काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यात पाकिस्ताननं काल रात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला. या गोळीबारात चार स्थानिक नागरिक जखमी झाल्याचं संरक्षण प्रवक्त्यानं सांगितलं. त्यानंतर दोन्ही बाजुंनी सुमारे दोन तास गोळीबार सुरु होता. 

****

महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचं ५४ वं राज्यस्तरीय अधिवेशन आजपासून लातूर इथं होत आहे.  दुपारी तीन वाजता ग्रंथदिंडीनं अधिवेशनाला प्रारंभ होणार असून, उद्या सकाळी साडे नऊ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अधिवेशनाचं औपचारिक उद्घाटन होणार आहे. या अधिवेशनात 'ग्रंथालयांसमोरील समस्या आणि ग्रंथालय कर्मचारी वेतनश्रेणी, सेवाशर्ती' या विषयावरील परिसंवाद होणार आहे.

****

डच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू अश्विनी पोनप्पा आणि सात्विक साईराज या जोडीचा मिश्र दुहेरीच्या उपान्त्य सामन्यात पराभव झाला. इंग्लंडच्या मार्क्स एलिस आणि लारेन स्मिथ या जोडीनं अश्विनी आणि सात्विकचा १४-२१, १८-२१ असा पराभव केला.

****

राज्यात काल अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. मुंबईसह ठाणे, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग, गडचिरोली, सातारा इथं पाऊस झाल्याचं वृत्त आहे. मराठवाड्यातही काल जवळपास सर्वच जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. औरंगाबाद शहरात सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. जालना शहरातही चांगला पाऊस झाला, शहराला पाणी पुरवठा होत असलेला घाणेवाडी जलाशय  पावसानं ओसंडून वाहत आहे, गेल्या पाच वर्षात प्रथमच हा तलाव भरला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 06 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...