Wednesday, 15 November 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 15.11.2017 01.00PM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 15 November 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  १५ नोव्हेंबर २०१ दुपारी १.०० वा.

*******

पंतप्रधान नरेंद्र मोदी फिलिपाईन्सच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावरून स्वदेशात परत आले आहेत. फिलिपाईन्सची राजधानी मनिला इथे पंतप्रधानांनी तीन शिखर संमेलनांमध्ये भाग घेतला आणि जागतिक नेत्यांबरोबर पाच द्विपक्षीय बैठका केल्या. पंतप्रधानांनी आशियान समूहाच्या सर्व दहा देशांना, येत्या पंचवीस जानेवारीला नवी दिल्लीत होणार असलेल्या भारत-आशियान स्मृती शिखर संमेलनासाठी आमंत्रित केलं आहे.

****

महान स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या औचित्यानं, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. मुंडा यांच्याकडून प्रेरणा घेत, आदिवासी जमातींच्या सबलीकरणासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

खासदारांनी आपल्या विकास निधीचा वापर करून रेल्वेस्थानकांवर प्रवाशांसाठी बाक बसवावेत, असं आवाहन रेल्वेमंत्रालयानं केलं असल्याची माहिती रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दिली आहे. ते काल नवी दिल्लीत बोलत होते. स्थानकांवर प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्यानं त्यांना जमिनीवर बसावं लागतं, ही स्थिती लक्षात घेत मंत्रालयानं हे आवाहन केल्याचं त्यांनी सांगितलं. अशा बाकांवर जाहिरातींना परवानगी देऊन त्यातून उत्पन्न निर्माण करण्याची मंत्रालयाची योजना असल्याचंही गोयल यांनी सांगितलं.

****

इंटरनेट ही केवळ काही लोकांची मक्तेदारी असू शकत नाही, कारण ते जागतिक माध्यम आहे असं प्रतिपादन इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी केलं आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवणं हा सरकारचा प्रमुख उद्देश असल्याचं सांगत, सायबर सुरक्षेत सुधारणा होतील अशा नवीन कल्पना देणाऱ्या स्टार्ट अप्ससाठी  सरकार पाच कोटी रुपयांचं अनुदान मंजूर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात पाकिस्तानच्या सैनिकांनी आज पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. आज सकाळी आठच्या सुमाराला शाहपूर सेक्टरमध्ये भारतीय चौक्या आणि नागरी वसाहतींना लक्ष्य करत पाकिस्ताननं अकारण गोळीबार सुरू केला. भारतीय सैन्य त्याला चोख प्रत्युत्तर देत आहे.

****

घाऊक किमतीवर आधारित महागाई दरात गेल्या महिन्यात वाढ होऊन तो तीन पूर्णांक एकोणसाठ टक्के इतका नोंदला गेला. गेल्या सहा महिन्यातला हा सर्वाधिक महागाई दर आहे. यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यात हा दर दोन पूर्णांक सहा टक्के इतका होता. ऑक्टोबर महिन्यात कांदे आणि भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली तर डाळी आणि बटाट्यांच्या दरात घसरण झाली असल्याचं सरकारनं प्रसिद्ध केलेल्या माहितीतून स्पष्ट झालं आहे.

****

जलयुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट योगदानाबद्दल दिले जाणारे, वर्ष २०१५-१६ साठीचे पुरस्कार जाहीर झाले असून, औरंगाबाद विभागात उस्मानाबाद जिल्ह्यानं प्रथम क्रमांक मिळवला आहे. औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यांना दुसरा क्रमांक विभागून देण्यात आला आहे. या वर्षात या अभियानाच्या कामांसाठी एकूण एक हजार सहाशे ब्याऐंशी गावांची निवड करण्यात आली होती.

****

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करण्यासाठी आवश्यक असलेल्या जॉबकार्डचं आधार क्रमांकाशी संलग्नीकरण करण्याच्या शासनाच्या मोहिमेत बुलढाणा जिल्ह्यानं राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. या जिल्ह्यात मनरेगासाठी एक लाख तेहतीस हजार चारशे अट्ठ्याऐंशी नोंदणीकृत मजूर असून त्यातल्या नव्व्याण्णव पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के मजुरांच्या जॉबकार्डांचं आधार क्रमांकाशी संलग्नीकरण पूर्ण झालं आहे. राज्यात या कामात यवतमाळ जिल्हा दुसऱ्या तर नागपूर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.

****

बालकांना तंबाखू सेवनापासून वाचवण्यासाठी, सिगारेट आणि अन्य तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ तसंच बाल न्याय अधिनियमाअंतर्गत असलेल्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उपाययोजना आखल्या जाणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली आहे.

“तंबाखू पासून मुलांचे संरक्षण या विषयावर मुंबईत काल झालेल्या एका चर्चासत्रात  ते बोलत होते. तंबाखूची अवैध  विक्री रोखण्यासाठी लवकरच एक हेल्पलाईन सुरू केली जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. तंबाखू सेवनापासून मुलांना लांब ठेवण्यासाठी शाळांसोबतच पालकांनी देखील  काळजी घेणं गरजेचं  असल्याचं पाटील यांनी यावेळी नमूद केलं.

*******

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 12.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 12 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...