Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 December 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ डिसेंबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
ओखी चक्रीवादळाची तीव्रता
वाढली असून, दक्षिण केरळ, दक्षिण तामिळनाडू आणि लक्षद्विपमध्ये वादळी वाऱ्यासह
जोरदार पाऊस सुरु आहे. कन्याकुमारी जिल्ह्यात आणि नजिकच्या परिसरात मदतकार्य सुरु आहे.
गेल्या १२ तासात हे चक्रीवादळ ताशी २५ किलोमीटर वेगानं नैऋत्य अरबी समुद्राकडे
सरकलं असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे लक्षद्वीप, केरळ, आणि तामिळनाडूच्या
दक्षिण भागात
सर्वत्र पाऊस पडेल, तसंच तुरळक ठिकाणी जोरदार वृष्टी होण्याची शक्यता
विभागानं वर्तवली आहे.
****
एचआयव्ही एड्सग्रस्त मुलांवर वेळेवर उपचार करणं गरजेचं
असल्याचं संयुक्त राष्ट्र बाल निधी - युनिसेफनं म्हटलं आहे. जागतिक एड्स दिनानिमित्त
युनिसेफनं एड्सग्रस्त मुलाचा एक अहवाल जारी केला. या आजारावर वेळेवर उपचार न मिळाल्यानं
मृत्यू झालेल्या मुलांची संख्या अधिक असून, ४३ टक्के एचआयव्ही बाधित मुलांनाच सुरवातीपासून
उपचार मिळाले असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.
****
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा बहाल
करण्यासाठीचं विधेयक पुन्हा संसदेच्या आगामी हिवाळी आधिवेशनात लोकसभेत मांडण्याचा
मार्ग मोकळा व्हावा याकरता आवश्यक आधिकृत दुरुस्त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळानं
मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या
मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. एकशे तेविसावं घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत यापूर्वी संमत झालं होतं. मात्र
राज्यसभेनं ते काही दुरुस्त्यांसह समंत केल्यानं दोन्ही सभागृहात एकाच विधेयकाच्या
दोन वेगळया आवृत्या संमत झाल्या आहेत. आता हे विधेयक नव्यानं संमत
झाल्यानंतर मागासवर्गीयांचे हक्क आणि अधिकारांचं हितरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय
मागासवर्गीय आयोगाला पूर्ण आधिकारी प्राप्त होणार आहेत.
****
रस्ते अपघातात होणारे मृत्यू पाहता सर्वोच्च
न्यायालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना, रस्ते
सुरक्षेच्या संदर्भातले नवीन आदेश जारी केले आहेत. देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात
ट्रॉमा सेंटर उभारण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. ज्या
राज्यांनी अद्याप रस्ते सुरक्षा धोरण आखलेलं नाही, त्यांनी
जानेवारी २०१८ च्या अखेरपर्यंत ते तयार करावं आणि पूर्ण गांभीर्यानं आणि
काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी करावी असं न्यायमूर्ती एम. बी. लोकुर
यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं म्हटलं आहे. अपघातानंतर
तात्काळ मिळालेल्या उपचारांमुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात हे लक्षात घेऊन सर्व
राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांनी या आदेशाचं पालन करावं असं पीठानं आपल्या
आदेशात म्हटलं आहे.
****
राज्य सरकारनं बलात्कार आणि अन्य घटनांमध्ये पीडित महिलांना
देण्यात येणारी आर्थिक मदत वाढवून दहा लाख रुपये करण्यासंदर्भातल्या मनोधैर्य या योजनेची
अधिसूचना जारी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. ऑक्टोबर २०१३ मध्ये
सुरु केलेल्या या मुळ योजनेमध्यें सुधारणा करण्यात येईल, असं सरकारनं न्यायालयात सांगितलं.
या योजनेअंतर्गत बलात्कार आणि अन्य लैंगिक अत्याचार झालेल्या पीडित महिला आणि मुलींना,
तसंच मृत झालेल्या महिलांच्या वारसांना दहा लाख रुपये मदत देण्याची तरतुद आहे.
****
केंद्र सरकारच्या रोखरहित व्यवहारांना चालना देण्यासाठी
रेल्वेनं आजपासून यूपीआय आणि भिम ॲपच्या माध्यमातून तिकीटाची रक्कम देण्याची व्यवस्था
सुरु केली आहे. आरक्षित तिकीटांसाठी तिकीट खिडकीवर आणि मासिक तिकीटांसाठी अनारक्षित
तिकीट खिडकीवर ही सुविधा उपलब्ध आहे. ऑनलाईन तिकीट नोंदणी करताना ऑनलाईन पैसे भरण्याची
सुविधा याआधीपासूनच उपलब्ध आहे, आता खिडकीवर तिकीट खरेदी करतानाही ही सुविधा उपलब्ध
झाली आहे.
****
जालना जिल्ह्यात
भोकरदन तालुक्यातल्या पिंपळगाव रेणुकाई इथल्या महिला बचत गटांसह अन्य महिलांनी दारूबंदीसाठी
आक्रमक पवित्रा घेतला असून, काल दारू दुकानासमोर सुरू केलेलं आंदोलन आजही सुरूच आहे.
जोपर्यंत दारू विक्रीचं दुकान कायमचं बंद होत नाही तोपर्यंत माघार न घेण्याचा निर्णय
या महिलांनी घेतला आहे.
****
बांग्लादेशात ढाका इथं झालेल्या अशियाई तिरंदाजी
स्पर्धेत भारताच्या तिरंदाजांनी तीन सुवर्ण, चार
रौप्य आणि दोन कांस्य पदकं पटकावले. या कामगिरीमुळे दोन तिरंदाजांनी २०१८ मध्ये होणाऱ्या युवा ऑलिंपिकसाठी आपला प्रवेश निश्चित
केला आहे. हरियाणाची हिमानी कुमारीनं मंगोलियाच्या खेळाडूचा सात - एक असा पराभव करत, आणि हरियाणाच्याच आकाशनं आंध्र प्रदेशाच्या धीरज बोम्मादेवरा
याचा सहा - चार असा पराभव करत युवा ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवला. अभिषेक
वर्मानं कोरियाच्या किग जाँघोवर मात करत सुवर्ण पदक पटकावलं, तर महिला
संघिकमधे ज्योती सुरेखा वेन्नम, त्रिशा देव आणि परविना यांच्या संघानं सुवर्ण पदक
जिंकलं.
****
No comments:
Post a Comment