Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 1 December 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १ डिसेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
राष्ट्रीय पोषण मिशनची स्थापना करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं
आज मान्यता दिली आहे. याअंतर्गत एक तज्ज्ञांचा गट देशभरात पोषणासंबंधी एक लक्ष्य निर्धारित
करुन त्याविषयी मार्गदर्शन आणि निरीक्षण करणार आहे. देशातल्या प्रत्येक मुलाला, गर्भवतींना
आणि स्तन्यदा मातांना योग्य पोषण आहार पुरवण्यास सरकार कटीबद्ध असल्याचं केंद्रीय महिला
आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
कुपोषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय पोषण मिशन एक महत्वाचं पाऊल असल्याचं केंद्रीय
आरोग्य मंत्री जे पी नड्डा यावेळी म्हणाले.
****
सशस्त्र सेना दलाच्या
योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संरक्षण मंत्रालयानं आजपासून येत्या सात
डिसेंबरपर्यंत सशस्त्र सेना सप्ताह म्हणून
जाहीर केला आहे. राष्ट्रासाठी प्राणांची पर्वा न
करता कोणत्याही संकटाला सदैव सज्ज असलेल्या देशाच्या या शूरपूत्रांना आणि
शूरकन्यांना सलाम करण्याचं आवाहन संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी
देशवासियांना केलं आहे.
****
‘मौखिक कर्करोग मुक्त राज्य’ करण्याचा सार्वजनिक आरोग्य
विभागाचा प्रयत्न असून यासाठी राज्यस्तरीय मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेचं आयोजन
करण्यात आलं आहे. या मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन
आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी केलं आहे. मुंबई इथं टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या सहकार्यानं
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं आजपासून ते येत्या ३१ डिसेंबर पर्यंत
राज्यस्तरीय मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोहिमेचे उद्घाटन
आज सावंत यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते
बोलत होते.
****
सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या
मन:स्थितीत नाही, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. यवतमाळ इथं
यवतमाळ ते नागपूर पदयात्रेनिमित्त आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभेत ते आज
बोलत होते. शेतकऱ्यांना सोयाबीन खूप कमी भावात विकावा लागत असल्याचं ते म्हणाले. विधान
परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे यावेळी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची जबाबदारी मुख्यमंत्र्यांचीच असल्याचं मुंडे यावेळी म्हणाले.
खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावेळी सरकारच्या विविध धोरणांवर टीका केली.
****
डॉ नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे या
विचारवंतांच्या हत्या होऊन तीन वर्ष उलटली तरी तपास यंत्रणा ठोस निष्कर्षापर्यंत
पोहोचलेली नाही, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक
चव्हाण यांनी म्हटलं आहे. ते आज कोल्हापूर इथं गोविंद
पानसरे यांच्या कुटंबिंयांची भेट घेतल्यानंतर बोलत होते. सनातन संस्थेवर बंदी
घालण्याबाबत सरकार गंभीर नाही असा आरोप त्यांनी यावेळी केला. राज्यातल्या
ढासळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत विधीमंडळ आधिवेशनात काँग्रेस पक्ष सरकारला
जाब विचारेल आणि त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल असं ते म्हणाले.
****
मुंबईत आझाद मैदानाजवळ असलेल्या
मुंबई कॉंग्रेस कार्यालयाची आज सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी तोडफोड केली. मुंबई
प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांचंही कार्यालय त्याठिकाणी आहे. कार्यालयाच्या काचा आणि
सामानाची तोडफोड झाली असून, या हल्ल्याची जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं
घेतली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत
आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात शेंदरी बोंड आळीच्या
प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी,
अशी मागणी पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे उपाध्यक्ष भागवत देवसरकर
यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. लाल्या रोग आणि सोयाबीनच्या
लष्करी अळीच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक नुकसान भरपाई दिली होती, याच
धर्तीवर राज्य सरकारनं जिल्ह्यातल्या सर्वच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई
देऊन आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
****
जालना जिल्ह्यातही शेंदरी बोंड आळीचा
मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यानं पुढील हंगामात अळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात
ठेवण्यासाठी या हंगामात करण्याच्या उपाययोजनांची माहिती जिल्हा कृषी विभागानं दिली
आहे. सर्व शेतकऱ्यांनी डिसेंबर अखेरपर्यंत कापूस काढून शेत स्वच्छ करण्याचं आवाहन विभागानं
केलं आहे.
****
हिंगोलीचे पालकमंत्री दिलीप कांबळे
यांच्या हस्ते हिंगोली इथं आज विविध विकास कामांचं लोकार्पण करण्यात आलं. हिंगोली नगर
परिषदेचं स्पर्धा परीक्षा आणि मार्गदर्शन केंद्र, अण्णाभाऊ साठे वाचनालय, महात्मा गांधी
चौकाचं सुशोभिकरण आणि नगर परिषद बालक मंदिराच्या नवीन इमारतीचं लोकार्पण यावेळी करण्यात
आलं.
****
No comments:
Post a Comment