Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 15 February 2018
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ फेब्रुवारी २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
गारपीटग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही,
असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. बीड जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र
नारायणगड इथल्या २५ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि कोनशिलेचं अनावरण,
तसंच वृक्षारोपण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं, तत्पूर्वी लातूर विमानतळावर
आले असता, ते वार्ताहरांशी बोलत होते. राज्यात प्रथमच दोन दिवसात गारपीटग्रस्त शेतीचे
पंचनामे पूर्ण झाले असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
पुणे जिल्ह्यातल्या आळंदी इथं आयोजित सातव्या सरपंच महापरिषदेचं
उद्घाटनही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. पायाभूत सुविधा, सामाजिक सुविधा आणि आर्थिक विकास
हीच आदर्शग्राम विकासाची त्रिसूत्री असल्याचं सांगून त्यांनी, सरपंच हा पंचायत राज व्यवस्थेच्या
विकासाचा पाया असल्याचं नमूद केलं. शेती आणि ग्रामविकास याला सरकार प्राधान्य देत असून,
चौदाव्या वित्त आयोगामुळे गावांच्या
विकासासाठी सरपंचाच्या खात्यात विकासासाठी थेट निधी जमा केला जात असल्याचं ग्रामविकास
मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं.
****
तिहेरी तलाक पद्धत रद्द करण्याचा
कायदा हा कोणत्याही धार्मिक भावनेनं घेतलेला निर्णय नसून, समाजातल्या चुकीच्या प्रथा
नष्ट करण्यासाठी घेतल्याचं, केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी
यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. काँग्रेस पक्षानं या
विधेयकाला लोकसभेत पाठिंबा दिला, मात्र राज्यसभेत देत नसल्यावरुन त्यांनी नाराजी व्यक्त
केली.
****
केंद्रीय अर्थ मंत्रालयानं सक्तवसुली
संचालनालयाकडून नीरव मोदी प्रकरणाचा अहवाल मागितला आहे. हिरे व्यापारी असलेल्या नीरव
मोदीवर पंजाब नॅशनल बँकेच्या एका शाखेकडून परदेशात कर्जपुरवठा करण्यासाठी बनावट करारपत्र मिळवून
११ हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी बँकेनं आपल्या १० अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे.
दरम्यान, हा घोटाळा २०११ साली पहिल्यांदा
उघडकीस आला होता आणि याची माहिती संबंधित यंत्रणांना कळवली होती, असं पंजाब नॅशनल बँकेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी सुनिल मेहता यांनी आज वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
****
राज्य शासनानं जाहीर केलेली कर्जमाफीची
रक्कम अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नसून, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची नुसतीच
घोषणा सरकारनं केली असल्याची टीका, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी
यांनी केली आहे. ते आज लातूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. आगामी निवडणुकीत आपला पक्ष
भारतीय जनता पक्षासोबत युती करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
****
औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले
यांनी, सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणारे महापालिकेचे कनिष्ठ अभियंता जयंत खरवडकर
यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. आज झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौरांनी
हे आदेश दिले. महापालिकेच्या गेल्या आठवड्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक राजेंद्र
जंजाळ आणि राज वानखेडे यांनी खरवडकर यांच्या पोस्टसंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता,
त्यानंतर प्रशासनानं त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
****
अन्न आणि प्रशासन विभागानं परभणी
आणि हिंगोली जिल्ह्यातल्या ३५ औषधी दुकानांचे परवाने निलंबित केले आहेत, तर सात औषधी
दुकानांचे परवाने कायमचे रद्द केले आहेत. औषधांची बिलाशिवाय विक्री, मुदतबाह्य औषधीची
विक्रीयोग्य औषधीसमवेत साठवणूक, विनाफार्मासिस्ट औषधीची विक्री अशा कारणांमुळे ही कारवाई
केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या एक लाख लोकांना
योजनांचा लाभ देण्याचं उद्दिष्ट समाधान शिबीराच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार
असून, यासाठी सर्व शासकीय यंत्रणेबरोबरच पदाधिकारी आणि नागरिकांनी सक्रिय सहभागी व्हावं,
असं आवाहन राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलं आहे.
परभणी इथं आज विस्तारित समाधान शिबिराच्या पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
****
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या
वतीनं येत्या २६ फेब्रुवारीला लातूर इथं आणि २७ फेब्रुवारीला उस्मानाबाद इथं मराठा
आरक्षणासाठी जिल्हा स्तरावर खुली जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. या जनसुनावणीमध्ये
लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातले नागरिक, संस्था आणि संघटनांच्या प्रतिनिधींकडून मराठा
आरक्षणासंदर्भात लिखित स्वरूपात निवेदनं स्वीकारण्यात येणार आहेत. यावेळी कोणाशीही
व्यक्तिगत अथवा शिष्टमंडळांशी तोंडी चर्चा केली जाणार नसल्याचं राज्य मागासवर्ग आयोगाचे
सदस्य डॉ.राजेश करपे यांनी सांगितलं आहे.
****
No comments:
Post a Comment