Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 12 April 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
१२ एप्रिल
२०१८ सकाळी ६.५०
मि.
*****
v विरोधी पक्षांच्या नकारात्मक राजकारणाचा निषेध नोंदवण्यासाठी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह
भारतीय जनता पक्षाचे खासदार आज एक दिवसाचं उपोषण करणार
v जम्मू काश्मीरमध्ये कृष्णा घाटीत पाकिस्तानी सैनिकांनं केलेल्या
गोळीबारात औरंगाबाद जिल्ह्यातले फकिराबादवाडीचे जवान किरण थोरात शहीद
v मराठवाड्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह
पाऊस; तुळजापूर तालुक्यात वीज अंगावर कोसळून एका महिलेसह दोन जणांचा मृत्यू
v औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर नगरपालिका निवडणुकीची आज मतमोजणी
आणि
v राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजीच्या डबल ट्रॅप प्रकारात भारताच्या श्रेयसी सिंहला सुवर्णपदक
*****
विरोधी पक्षांच्या असहकारामुळे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या
दुसऱ्या भागात काहीही कामकाज होऊ शकलं नाही, विरोधी
पक्षांच्या या नकारात्मक राजकारणाचा निषेध नोंदवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी
हे नवी दिल्लीत, तर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा हे कर्नाटकातल्या
हुबळी शहरात आज उपोषण करणार आहेत. याशिवाय भारतीय जनता पक्षाचे देशभरातले खासदार आपापल्या मतदारसंघात उपोषण करणार आहेत. विरोधकांमुळे
हे सत्र पूर्ण वाया गेलं असून, कामकाजाचं प्रमाण चार ते आठ टक्क्यांपर्यंत घसरलं, सगळी
महत्त्वाची विधेयकं प्रलंबित राहिली, आणि जनतेच्या सुमारे दोनशे कोटी रुपयांचं
नुकसान झालं, आणि यासाठी काँग्रेस पक्ष जबाबदार आहे, असं
भाजपनं म्हटलं
आहे.
****
जम्मू काश्मीर मधल्या पूंछ जिल्ह्याच्या कृष्णा घाटीमध्ये
पाकिस्तानी सैनिकांनं केलेल्या गोळीबारात मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातले वैजापूर तालुक्यातल्या
फकिराबादवाडी इथले रहिवासी असलेले एकतीस वर्षीय जवान किरण थोरात काल शहीद झाले. काल
दुपारी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पूंछ जिल्ह्यातल्या कृष्णा घाटीमध्ये पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार
सुरू केला. यावेळी या भागात गस्त घालणाऱ्या भारतीय जवानांनी त्याला प्रत्युत्तर दिलं.
यामध्ये थोरात गंभीर जखमी झाले, त्यानंतर त्यांना वीरमरण आलं. सोमवारीही पाकिस्ताननं
केलेल्या गोळीबारात दोन भारतीय जवान मृत्युमुखी
पडले होते.
****
आगामी तीन महिन्यात जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांमध्ये
जागतिक दर्जाच्या सर्व सोयी-सुविधा पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं, केंद्रीय पर्यटन सचिव रश्मी वर्मा यांनी
सांगितलं. वेरूळ लेण्यांना भेट दिल्यानंतर या ठिकाणांच्या विकास कामांचा औरंगाबाद इथं
आढावा घेतांना काल त्या बोलत होत्या. वेरुळ, आणि अजिंठा या स्थळांना जोडण्यासाठी, हेलिकॉप्टर सेवा सुरु करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचं त्यांनी
सांगितलं.
****
धार्मिक स्थळांच्या रस्त्यांवर दुतर्फा उभारण्यात
येणाऱ्या स्वागत कमानींना नियंत्रित करणारी
नियमावली, यंत्रणा किंवा धोरण अस्तित्वात आहे का, अशी विचारणा, मुंबई उच्च न्यायालयाच्या
औरंगाबाद खंडपीठानं काल राज्य सरकारला केली. अशा कमानींमुळे रस्त्यांवर अतिक्रमण होतं,
आणि रस्त्यांचं विद्रुपीकरण होतं अशा आशयाच्या जनहितार्थ याचिकेच्या सुनावणी दरम्यान
न्यायालयानं ही विचारणा केली. या याचिकेत शासनाला दोनदा शपथपत्र दाखल करण्यास सांगूनही
शपथपत्र दाखल न केल्यानं, ग्रामविकास आणि नगरविकास खात्याच्या सचिवाविरूद्ध कारवाई
का करण्यात येऊ नये, अशी नोटीस उच्च न्यायालयानं जारी केली आहे. या याचिकेची पुढील
सुनावणी १७ एप्रिल रोजी होणार आहे.
****
राज्यात करण्यात आलेली प्लास्टिक बंदी ही कायद्याला
धरुन असल्याचा दावा राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात केला आहे. प्लास्टिक बंदीच्या
निर्णया विरोधात काही संघटनांनी दाखल केलेल्या याचिकेवर काल सुनावणी झाली. यासंदर्भातला
सरकारचा युक्तिवाद अर्धवट राहिल्यानं आजही न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे.
****
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसतर्फे
राज्यव्यापी परिवर्तन यात्रा काढली जाणार असल्याची माहिती, पक्षाचे नेते राधाकृष्ण
विखे-पाटील यांनी दिली. ते काल कोल्हापूर इथं बोलत होते. ह्या यात्रेचा शुभारंभ कोल्हापूरमधून
होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं राज्यभर हल्लाबोल आंदोलन
केलं.त्यानंतर आता काँग्रेस पक्षही निवडणुकांना सामोरं जाण्याची तयारी करत असल्याचं
सांगून, दोन्ही पक्ष ही निवडणूक एकत्रितपणे लढणार असल्याचं, विखे पाटील यांनी स्पष्ट
केलं.
****
मराठवाड्यात काल अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस
झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात काल सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला, तुळजापूर
तालुक्यात एका महिलेसह दोन जणं वीज अंगावर कोसळून मरण पावले. हिंगोली जिल्ह्यात काल
तिसऱ्या दिवशीही पावसानं हजेरी लावली. कळमनुरी, कनेरगाव, आखाडा बाळापूर, कडोळी, नांदापूर,
पोत्रा, कौठा, वसमत आणि साटंबा परिसरात जवळपास तासभर पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे. बीड जिल्ह्यात काल विजेच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी पाऊस झाला तसंच गारपीटही
झाली. केज तालुक्यातल्या कासारी गावात गारांचा पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं.
लातूर शहर आणि परिसरातही साडे आठच्या सुमारास वादळासह रिमझीम पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात
धारासूर गाव आणि परिसरात गारांचा पाऊस झाला. या पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर
नुकसान झालं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना काल देशभर अभिवादन करण्यात आलं. दिल्लीत राष्ट्रपती
रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली. जालना इथं नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, हिंगोलीत अपर
जिल्हाधिकारी जगदीश मिणियार यांनी फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अपर्पण करून आदरांजली
वाहिली.
औरंगाबाद इथं औरंगपुऱ्यातल्या
महात्मा फुले यांच्या पुतळ्याला विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या वतीनं अभिवादन
करण्यात आलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर
नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाची आज मतमोजणी करण्यात येणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी
पाच तर नगरसेवकपदासाठी ५४ असे एकूण ५९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.
****
परभणी इथल्या विविध रस्ते विकास कामाचं ई भूमिपूजन
येत्या १९ तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते
विकास आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या
हस्ते होणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. यामध्ये
परभणी-गंगाखेड, कोल्हा-नासारपुर आणि पाथरी-सेलू - देवगाव फाटा या एकूण १३०
किलोमीटर रस्त्यांच्या कामाचा समावेश आहे. यासाठी एकूण ७०० कोटीहून अधिक रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
****
एकविसाव्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला बारावं सुवर्णपदक मिळालं आहे. नेमबाजीच्या
डबल ट्रॅप प्रकारात भारताच्या श्रेयसी सिंहनं हे सुवर्णपदक मिळवलं. तर, पुरुषांच्या पन्नास मीटर पिस्तूल नेमबाजीमध्ये भारताच्या
ओम मिथरवालनं कांस्य पदक जिंकलं आहे. महिला मुष्टीयुद्धात एम.
सी. मेरीकोम अट्ठेचाळीस किलो वजनगटाच्या अंतिम
फेरीत पोहचली आहे. तर
नेमबाजीच्या डबल
ट्रॅप प्रकारात भारताच्या अंकुर मित्तल यानं कांस्य पदक जिंकलं आहे.
दरम्यान, या राष्ट्रकूल क्रीडा
स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या राज्यातल्या खेळाडूंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्रीडा
मंत्री विनोद तावडे यांनी अभिनंदन केलं आहे. पदक जिंकणाऱ्या राज्यातल्या सर्व खेळाडू,
आणि त्यांच्या मार्गदर्शकांना रोख पारितोषिकंही राज्य सरकारनं घोषित केली आहेत.
****
२००५ नंतर सेवेत आलेल्या सगळ्या शिक्षकांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात यावी, आणि २३ ऑक्टोबर २०१७ चा याबाबतचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा, या
मागणीसाठी जुनं पेन्शन हक्क संघटनेच्यावतीनं काल नांदेडच्या
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला शिक्षक सेनेनं पाठिंबा दिला आहे.
****
लातूर महानगरपालिकेच्या गेल्या
सहा वर्षांच्या व्यवहाराचं विशेष लेखापरिक्षण करावं, आणि
या कालावधीतल्या कामकाजाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत चौकशी करावी, अशी मागणी नगरसेवक प्रकाश पाठक यांनी विधीमंडळाच्या अंदाज समितीकडे केली आहे.
पाठक यांनी काल एका लेखी निवेदनाद्वारे ही मागणी केली. विधी मंडळ अंदाज समिती दोन दिवसांच्या लतूर दौऱ्यावर आहे.
****
राष्ट्रीय आरोग्य अभियानातल्या
कंत्राटी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी कालपासून
औरंगाबाद जिल्हा परिषदेसमोर बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलं. त्यामुळे जिल्ह्यातल्या
आरोग्य सेवा आणि लसीकरणावर परिणाम झाला आहे.
****
परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या अंबरवाडी
आणि किनी इथं, पाणी फाउंडेशनच्यावतीनं आयोजित वॉटर कप स्पर्धेत ४० गावातले नागरिक सहभागी
झाले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या मेघना बोर्डीकर यांच्या पुढाकारानं
गाव दुष्काळी मुक्त करण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर या स्पर्धेत उतरले असल्याचं,
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment