Thursday, 12 April 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 12.04.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१२ एप्रिल २०१८ सकाळी ११.०० वाजता

****

विरोधी पक्षांच्या असहकारामुळे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या भागात काहीही कामकाज होऊ शकलं नाही, विरोधी पक्षांच्या या नकारात्मक राजकारणाचा निषेध नोंदवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी दिल्लीत, तर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा हे कर्नाटकातल्या हुबळी शहरात आज उपोषण करणार आहेत. याशिवाय भारतीय जनता पक्षाचे देशभरातले खासदार आपापल्या मतदारसंघात उपोषण करणार आहेत.

****



 ग्रामीण भागातल्या गरिबांना सशक्त करण्यासाठी देशभरात येत्या १४ एप्रिलपासून ग्रामस्वराज अभियान राबवलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाचे खासदार, आमदार तसंच लोकप्रतिनिधींशी श्राव्य माध्यमातून या अभियानाविषयी चर्चा केली. गावांचं बळकटीकरण आणि विकास यामुळेच नव्या भारताचं स्वप्न साकार होईल, असं पंतप्रधान म्हणाले. हे अभियान पाच मे पर्यंत चालणार आहे.

****

 तूर खरेदी गोदामा अभावी अडू नये यासाठी, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अखत्यारितील गोदामांसह, जिल्हास्तरावर खासगी गोदाम जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ताब्यात घेण्याचे निर्देश, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुंबई इथं तूर खरेदी आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्यभरात नऊ एप्रिलपर्यत, १९१ खरेदी केंद्रांवर २१ लाख ५० हजार ६४५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असल्याची, माहिती यावेळी देण्यात आली. तूर साठवणुकीसाठी एक हजार टनांपेक्षा कमी साठवणूक क्षमता असलेली, लहान गोदामंसुध्दा ताब्यात घेण्याचे निर्देशही देशमुख यांनी दिले.

****

 रास्तभाव दुकानांमधून धान्य मिळण्यापासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी संबंधितांना दिले आहेत. रास्तभाव दुकानातील पॉस मशीनद्वारे कुटुंबातल्या  कोणत्याही एका सदस्याच्या आधार कार्डची वैधता झाल्यास त्या कुटुंबाला धान्य वितरण होणार असल्याचं बापट यांनी सांगितलं.

****



 औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाची आज मतमोजणी करण्यात येणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी पाच तर नगरसेवकपदासाठी  ५४  असे एकूण ५९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 07.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 07 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...