Friday, 13 April 2018

Text - AIR NEWS BULLETIN AURANGABAD 13.04.2018 6.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 13 April 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १३  एप्रिल २०१८ सकाळी ६.५० मि.

*****

·       दिल्लीतल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन

·       विरोधी पक्षांच्या असहकाराविरूद्ध भारतीय जनता पक्षाचं देशभर उपोषण

·       राज्यातल्या निवडणूक झालेल्या सहा पैकी चार नगरपालिका- नगरपंचायती भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात

·       औरंगाबाद जिल्ह्यातल्या शहिद जवान किरण थोरात यांच्या पार्थिव देहावर आज फकीराबादवाडी इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

आणि

·       गोल्डकोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये बीडच्या राहुल आवारे आणि सुशील कुमारला सुवर्ण पदक

****

दिल्लीत अलीपूर मार्गावर उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. डॉ. आंबडेकर यांचं महापरिनिर्वाण स्थळ असलेल्या ठिकाणी, त्यांच्या जीवनकार्याचा आणि योगदानाचा परिचय करून देणारं हे स्मारक उभारण्यात आलं आहे. स्मारकाला पुस्तकाचा आकार देण्यात आला असून या ठिकाणी डॉ. आंबेडकरांची १२ फुटांची कांस्य प्रतिमा, प्रदर्शन स्थळ, तथागत गौतम बुध्दांची ध्यानस्थ प्रतिमा स्थापन करण्यात आली आहे. याशिवाय ध्यान केंद्र, बोधी वृक्ष आणि कारंजे ही आहेत.

****

विरोधी पक्षांच्या असहकारामुळे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या भागात काहीही कामकाज होऊ शकलं नाही, याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं काल देशभरात उपोषण करण्यात आलं. मुंबईत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार पूनम महाजन, किरीट सोमय्या, आशिष शेलार हे उपोषणाला बसले होते. औरंगाबाद इथं भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, आमदार अतुल सावे यांनी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह उपोषण केलं. लातूर इथं खासदार सुनिल गायकवाड यांच्या नेतृत्वात, जालना इथं आमदार संतोष दानवे यांच्या, तर उस्मानाबाद इथं प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वात उपोषण करण्यात आलं. कोल्हापूर इथं खासदार अमर साबळे यांनी, सोलापूर इथं खासदार शरद बनसोडे यांनी उपोषण केलं. राज्यातल्या अन्य जिल्ह्यातही स्थानिक भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्यात आलं.

****

राज्यात झालेल्या सहा नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षानं वर्चस्व सिद्ध केलं. सहापैकी चार नगराध्यक्षपदं आणि सर्वाधिक पन्नास नगरसेवक भाजपचे निवडून आले असल्याचा दावा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाच्या शिल्पा परदेशी या एक हजार ७६४ मतांनी विजयी झाल्या. मात्र नगरसेवकांमध्ये शिवसेनेनं २३ जागांपैकी १३ जागा जिंकल्या. भाजपनं नऊ आणि काँग्रेस पक्षानं एक जागा जिंकली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजप आणि ताराराणी आघाडी प्रणित आजरा शहर विकास आघाडीनं नगराध्यक्ष पदासह नऊ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आघाडीला सहा, तर परिवर्तन आघाडीला एका जागेवर समाधान मानावं लागलं.

कणकवली नगर पंचायत निवडणुकीत नगराध्यक्षपद महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीकडे गेलं.आघाडीला १७ पैकी ११ जागांवरही विजय मिळाला आहे. स्वाभिमान पक्षाला १०, तर राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळाली. शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी तीन जागांवर विजय मिळवता आला.

रत्नागिरी जिल्ह्यातल्या देवरूखच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या मृणाल शेट्ये दोन हजार ४३५ मतं मिळवून विजयी झाल्या. तर गुहागरच्या नगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीचे राजेश बेंडल विजयी झाले.

****

राज्यात एक हजार पाचशे नवीन आरोग्य उपकेंद्र सुरू करण्यात येतील आणि या आरोग्य उपकेंद्रांमध्ये आयुर्वेदिक डॉक्टरांची नियुक्ती केली जाईल, असं मुख्य सचिव सुमित मलिक यांनी काल सांगितलं. आरोग्य, महिला आणि बालविकास तसंच  आदिवासी विकास विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या डॉक्टरांच्या नियुक्तीचे अधिकार देण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

****

कोणत्याही परिस्थितीत कोकणात वादग्रस्त नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारला जाऊ देणार नाही असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. रत्नागिरीत वादग्रस्त नाणार प्रकल्प उभारण्यासाठी केंद्र सरकारनं विदेशी कंपन्यांसोबत केलेल्या कराराच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बोलत होते. या प्रकल्पामुळे कोकणातली वनसंपदा धोक्यात येऊ शकते असं स्थानिक जनतेचं म्हणणं आहे. जनतेच्या या म्हणण्याशी शिवसेना सहमत असल्याचं ठाकरे यांनी म्हटलं आहे.

****

राज्य परिवहन महामंडळाच्या शयन व्यवस्था असलेल्या बिगर वातानुकुलित बसेस राज्यात लवकरच सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे.राज्यात सध्या बिगर वातानुकूलीत शयन बसेस चालवण्यास परवानगी नाही, मात्र, राज्य सरकारनं राज्य परिवहन महामंडळास या नियमातून सवलत दिली असल्याचं रावते यांनी सांगितलं.लांब पल्ल्याचा प्रवास अधिक आरामदायी होण्याच्या उद्देशानं ह्या बसेस सुरु केल्या जात असल्याचं रावते म्हणाले.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातल्या फकिराबादवाडी इथले रहिवासी असलेले जवान किरण थोरात यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी आठ वाजता फकीराबादवाडी इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. जम्मू काश्मीर मधल्या पूंछ जिल्ह्याच्या कृष्णा घाटीमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात त्यांना वीरमरण आलं. काल सायंकाळी त्यांचं पार्थिव विमानानं औरंगाबादच्या विमानतळावर आणण्यात आलं, त्यावेळी त्यांना १६९ मिडीयम रेजिमेंटच्या सैनिकांच्या तुकडीनं मानवंदना दिली. यावेळी पालकमंत्री डॉक्टर दीपक सावंत, महापौर नंदकुमार घोडेले, आमदार इम्तियाज जलील, आमदार अतुल सावे, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर शहीद थोरात यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी नेण्यात आलं.

****

ऑस्ट्रेलियात गोल्डकोस्ट इथं सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत काल भारतानं दोन सुवर्ण, तीन रौप्य आणि एका कांस्य पदकाची कमाई केली. कुस्तीमध्ये सुशील कुमारनं ७४ किलो वजनी गटात, तर बीडच्या राहुल आवारेनं ५७ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलं. महिलांच्या कुस्तीमध्ये बबिता कुमारीनं ५३ किलो वजनी गटात, नेमबाजीत ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात महाराष्ट्राच्या तेजस्विनी सावंतनं, तर थाळीफेक मध्ये सीमा पुनिया हिनं रौप्य पदक जिंकलं. थाळीफेकमध्येच नवजीत धिल्लो हिनं कांस्य पदक पटकावलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे.

कुस्तीपटू राहुल आवारेनं सुवर्ण पदक मिळवल्यानं बीड जिल्ह्यातल्या पाटोदा या त्याच्या गावी जल्लोष करण्यात आला.

****

औरंगाबाद शहरातला कचऱ्याचा प्रश्न पावसाळ्यापूर्वी सोडवणं आवश्यक असून यासाठी महापालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी झपाटून काम करायला हवं अशी अपेक्षा प्रभारी पालिका आयुक्त जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी व्यक्त केली. घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळेत काल ते बोलत होते. पावसाळ्यामध्ये कचऱ्याची आणखी बिकट समस्या निर्माण होऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन नियोजन करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले.

****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७व्या जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक समता सप्ताहानिमित्त परभणीतल्या बसस्थानक परिसर तसंच भीमनगर इथं काल स्वच्छता अभियान कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आगारप्रमुख धर्माधिकारी यांच्या हस्ते तर भीमनगर येथे बौध्दविहाराजवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास उपासिका राणुबाई वायवळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन स्वच्छता करण्यास सुरुवात करण्यात आली.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या डोंगरकडा इथल्या जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक विजयकुमार केंद्रे याला चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहात पकडलं. क्रीडा प्रशिक्षकाला मानधनाचा धनादेश देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

****

अहमदनगरच्या जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी अटकेत असलेले भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पोलिस कोठडीत एका दिवसाची वाढ करण्यात आली आहे. महापालिकेच्या पोटनिवडणुकीच्या वादातून शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना सोडण्याची मागणी करत कर्डिले यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात तोडफोड केली होती.

दरम्यान, शिवसेना नेत्यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह अन्य चार आरोपींच्या पोलीस कोठडीत न्यायालयानं १६ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.

//*************//


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 07.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 07 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...