आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२४ मे २०१८ सकाळी ११.०० वाजता
*****
स्थानिक स्वराज्य
संस्थांमधून राज्य विधान परिषदेवर निवडून द्यायच्या सहा पैकी पाच जागांसाठीची
मतमोजणी आज होत आहे. उस्मानाबाद-लातूर-बीड या मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी
निवडणूक आयोगानं पुढे ढकलली आहे. परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था
मतदारसंघात शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीचे विप्लव बजोरीया ३५ मतांनी विजयी झाले.
बजोरीया यांना २५६ ते सुरेश देशमुख यांना २२१ मतं मिळाली. नाशिक स्थानिक स्वराज्य
संस्था मतदारसंघात शिवसेनेचे नरेंद्र दराडे, तर रायगड - रत्नागिरी - सिंधुदुर्ग
मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनिल तटकरे विजयी झाल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जम्मू काश्मीरमधल्या बारामुल्ला जिल्ह्यात सीमा रेषेवर
पाकिस्तानी सैन्यानं मध्यरात्री पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. उरी सेक्टरमधल्या
कामलकोट गावात पाकिस्तानी सैन्यानं अंदाधुंद गोळीबार केला. भारतीय जवानांनीही या हल्ल्याला
चोख प्रत्यूत्तर दिलं. सकाळपर्यंत दोन्ही बाजुंनी गोळीबार सुरु होता, या हल्ल्यात कोणत्याही
जीवित हानीचं वृत्त नाही.
****
सांगली जिल्ह्यात सर्व ७३६ गावांमध्ये सात बारा संगणकीकरण
शंभर टक्के पूर्ण झालं आहे. एकूण आठ लाख डिजीटल स्वाक्षऱ्यांपैकी दीड लाख डिजीटल स्वाक्षऱ्या
पूर्ण झाल्या असून, उर्वरित डिजीटल स्वाक्षऱ्या २० जूनपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना
यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. यामध्ये सांगली जिल्हा पुणे विभागात प्रथम आहे. या
माध्यमातून शेतकरी आणि सामान्य नागरिकांची मोठी सोय होणार असल्याचं जिल्हाधिकारी वि.
ना. काळम यांनी म्हटलं आहे.
****
मराठवाड्यात काही भागात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ
वातावरण आहे. येत्या पंचवीस आणि सव्वीस तारखेला विदर्भातल्या काही ठिकाणी तीव्र तर
काही ठिकाणी अतितीव्र उष्णतेची लाट राहील, तर मराठवाड्यातल्या परभणी, हिंगोली, नांदेड,
उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी येत्या चोवीस तासात वादळी वाऱ्यासह
पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
****
शासकीय निवासस्थान सोडण्यापूर्वी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना
वीजबिलाची कुठलीही थकबाकी नसल्याचं प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे. निवासस्थान उपलब्ध
करून देणाऱ्या सक्षम अधिकाऱ्याकडे हे प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक असेल, यासंदर्भातलं
परिपत्रक राज्य शासनानं जारी केलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment